Homeन्यूज अँड व्ह्यूजमुंबई महापालिकेचा 'दिव्याखालीच...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले. आगमनाच्याच दिवशी महापौर रितू तावडे यांच्या नालेसफाई आणि पर्जन्य पाण्याच्या निचऱ्याची खातरजमा करण्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान, त्यांच्याच समोर पालिकेचे एक अधिकारी तुंबलेल्या पाण्याखाली असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. चेंबर जेमतेम तीन फूट खोल असते. आजूबाजूलाही इतर कर्मचारी होते. त्यामुळे या अधिकाऱ्यांना किरकोळ मार लागला. पण, तुंबलेल्या पाण्याखाली असलेल्या उघड्या चेंबर आणि मेनहोलमुळे होत असलेल्या दुर्घटनांकडे पालिका अधिकाऱ्यांचे नव्याने लक्ष वेधले गेले. पण, अशा घटनेने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले गेले असते तर आश्चर्य!

मुंबई

आजच साकीनाका परिसरातल्या खैरानी रोडवरच्या एका उघड्या मेनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या इसमाला आपला जीव गमवावा लागला. दुसऱ्या मेनहोलमध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याआधी दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमध्ये पावसामुळे एक झाड शाळेच्या बसवर कोसळले आणि एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात गेलो होतो. पत्रकार संघाच्या समोरच्या बाजूसच मुख्यालय आहे. शनिवार असल्याने साहजिकच सामसूम होते. सुरक्षारक्षकही निवांत होते. खरंतर सारी पालिका यंत्रणाच जणू निवांत होती. पहिल्या पावसातच मुंबपुरीत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. महापौर महोदयांनी केलेल्या शहराच्या पाहणीतही त्यांना पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून आले होते. इतर ठिकाणच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची अनेक कारणे असतीलही! पण छायाचित्रात निचरा न झालेले पाणी चक्क महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या दरवाजासमोरीलच आहे! याला काय म्हणावे?

या मुख्यालयात शहर अभियंता, मुख्य अभियंता, काही प्रक्लपांचे संचालक (तेही अभियंतेच असतात) अशी अभियंत्यांची मंदियाळी असतानाही इमारतीसमोर पाणी तुंबावे!हर हर… शिवाय ए विभागाचे विभाग अधिकारी (सहाय्यक आयुक्त) दररोज न चुकता येस मॅडम, येस सर करायला येथे येतच असतात. त्यांना तरी हे तुंबलेले पाणी दिसावे ना… (मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना!) त्या सिग्नलपाशी आल्यावर डावीकडे वळून रेल्वेस्थानकात जावे वा बसथांबा गाठावा, या हेतूने पदपथावरून चालावे म्हटले तर तेथील दरवाजात दोन्ही बाजूला दोन-दोन खुर्च्या ठेवून सुरक्षारक्षक (तेही मुख्यालयातील) एकसाथ मान खाली घालून मोबाईल पाहण्यात गर्क! जणू काय ही मंडळी मोबाईल पाहण्यासाठीच पगार घेत असावेत. पालिकेचेच सुरक्षारक्षक असे करतात असे नव्हे तर त्यापुढे असलेल्या उत्पादनशुल्क खाते व सर्वांच्याच चुका दाखवण्यात अग्रेसर असणाऱ्या माध्यम कंपनीचे सुरक्षारक्षकही खाली मान घालून मोबाईल पाहण्यातच धन्यता मानणारे दिसले! पण पालिकेच्या आपत्कालीन विभागात कुणीतरी असणारच. पण त्यांचे काम आपत्ती निवारण्याचे आहे. त्यामुळे आपत्ती घडल्याशिवाय आणि त्यासाठी नियंत्रण कक्षात फोन आल्याशिवाय त्यांचीही हालचाल दिसणार नव्हती.

आपल्याकडील सरकारी खाक्याच असा आहे की ‘तक्रार आलीय का?’ असो. पाणी निचरा न होण्याची ही ‘सत्यकथा’ (सत्यनारायण नव्हे) इथेच संपवतो. घंटानादम कुर्यशस्ती!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

पूर्णेकरांवर झाडलेल्या गोळ्या पप्याच्या ‘घोड्या’तूनच!

प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या 'घोड्या'तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे. "थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू...

ठाण्यात पोलिसांसमोरच तुडवले जाते तर नेते पाहतही नाहीत सूर्योदय!

एखादी ओटीटीवरील सिरीज पाहतोय असं तर वाटतं नाही? मलाही प्रथम असच वाटत होतं. पण ठाणे शहरात घटनाच अशा घडत आहेत की ओटीटी निर्मात्यांनीही तोंडात बोटे घालावीत! कालच्या गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे पोलिसांचे जणू ग्रहच बदललेत असं वाटतं. शुक्रवार-शनिवार गणपती विसर्जनात...

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...
Skip to content