ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल… मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील कैदी धर्मेंद्रसिंह चंदलाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि मग धर्मेंद्रसिंहची चांगल्या वागणूकीबद्दल सुटका झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले… साठ अथवा सत्तरच्या दशकातील चित्रपटाचा शेवट अर्थात क्लायमॅक्स हा नायक नायिकेचे लग्न होते आणि शेवट गोड झाल्याने पडद्यावर अक्षरे झळकत.. समाप्त. (दि एण्ड)..
२०२६ साली ओटीटीच्या युगात याच सत्यघटनेवर चित्रपट निर्माण करायचा तर जेलर आणि कैदी यांचे लग्न होते आणि चित्रपटाचा मध्यंतर होतो. तात्पर्य, गोष्ट येथे संपत नाही. तर ती सुरू होते. कैद्यामधील माणसावर जेलरचे प्रेम बसले ही जागरुक संवेदनशीलता झाली. पण बाहेरच्या जगात वावरताना इतरांच्या नजरेत ‘तो’ गुन्हेगार होता हे दिसत राहते आणि हे पचवणं पत्नीला जड जातं. बाहेरच्या जगात वावरताना पती सतत गोंधळतो, कारण चौदा वर्षांच्या शिक्षेच्या काळात अनेक प्रकारच्या बंधनात जगण्याची त्याला सवय लागली आहे. त्या सवयीतून पत्नी त्याला बाहेर काढण्याचे सतत प्रयत्न करते, हा या चित्रपटाच्या उत्तरार्ध आहे.
हाच चित्रपट मसालामिक्स करायचा तर एखाद्या ठिकाणी काहीही गरज नसताना आपल्या पत्नीची छेडछाड करणाऱ्या गॅन्गचा हा पती खात्मा करतो. त्यांना बेदम मारहाण करतो. त्याच्यातील मूळ गुन्हेगार जागा होतो. खरंतर तो मुळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नसतोच. एका गोष्टीत एका बेसावध क्षणी त्याच्या हातून नकळतपणे एक निरपराध व्यक्ती मारली जाते. आता हे कसं रंगवायचे, खुलवायचे, मांडायचे हे पटकथाकाराचे कसब, कौशल्य आणि करामत. सतना कारागृहातील गोष्टीत चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरीज बनवण्यासाठी जर्म, प्लाॅट, काॅन्सेप्ट, शुद्ध मराठीत सांगायचं तर ‘गोष्ट’ आहे. आणि सत्यघटनेवर आधारित ही सपोर्ट सिस्टीम आहेच.
कैद्याच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग एकदम भारी. ‘धुरंदर’चा त्याचा गेटअप याही व्यक्तीरेखेत एकदम फिट्ट. सुरुवातीला खूप आक्रस्ताळेपणा आणि मग जेलरचा समजूतदारपणा आणि त्यातून तिचं मिळू लागलेले प्रेम, यातून तो निवळत निवळत जातो. जेलरच्या भूमिकेत विद्या बालन अथवा अनुष्का शर्मा हवी. कारण एका वेगळ्या प्रकारच्या पुरुषाला त्या व्यवस्थित समजून, उमजून घेताहेत. हे भाबडे अथवा निरागस प्रेम नाही. कैदी आणि जेलर या वेगळ्या नात्यावर सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम आणि राजकीय क्षेत्रांतून बरीवाईट प्रतिक्रिया उमटणार आहे. सोशल मीडियावर वाह्यात काॅमेन्टस येणार आहेत आणि हे सगळेच आपल्याला पचवायचे आहे याचे त्यांना भान आहे. ही अनोखी प्रेमकहाणी नायिकेच्या दृष्टीकोनातून घडतेय, कारण या नात्यात तिची कसोटी आहे.

या चित्रपटाला नाव काय द्यावे? कैदी नंबर ८७६, कसं वाटतं? ‘एक अनोखी प्रेमकथा’ असं सोपं सुटसुटीत पारंपरिकही चालेल. मल्टीप्लेक्सच्या युगात ‘डेंजर लव्ह कनेक्शन’ असेही चालेल.
चित्रपटात कैदी ही गोष्ट नवीन नाही. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘दो आँखें बारह हाथ’ (१९५८) हा चित्रपट सर्वोत्तम आहे. कैद्यामधील माणसाचा शोध हे त्याचे कथासूत्र. अतिशय उत्कटतेने आणि उत्कंठावर्धक पद्धतीने हा चित्रपट आपल्यासमोर येतो. चित्रपटातील कैदी आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी यात कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ (तीन कैदी पळतात आणि एका कुटुंबात योगायोगाने राहतात), या चित्रपटापासून अनेक चित्रपट आहेत. हाच चित्रपट हिंदीत ‘तीन चोर’ नावाने बनला.
त्यात एक थोडासा वेगळा. खान दोस्त (१९७६). दुलाल गुहा दिग्दर्शित या चित्रपटात, राज कपूर पोलीस हवालदार रामदीन पांडे या भूमिकेत, तर शत्रुघ्न सिन्हा गुन्हेगार रहमान खान या व्यक्तीरेखेत आहे. एका गुन्ह्यात रहमान खानला शिक्षा झाली असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. आणि भोळाभाबडा रामदीन पांडे त्याच जेलमध्ये कामाला आहे. त्यातून त्या दोघांची ओळख होते, ती वाढते, रहमान खान रामदीन पांडेचा विश्वास संपादन करतो आणि त्याला विनवणी करतो की, फक्त एक रात्र मला माझ्या आजारी आईला भेटण्यासाठी जेलमधून बाहेर जायला दे. उजाडण्यापूर्वी मी पुन्हा एकदा गजाआड होईन. रामदीन पांडे यासाठी अजिबात तयार होत नाही. रहमान खान परत आला नाही तर? हा प्रश्न त्याला सतावत असतो. आणि तो प्रश्न योग्यच असतो. पण तरीही रहमान खान त्याच्या गळी ही गोष्ट उतरवतो आणि रामदीन पांडे जेलचा दरवाजा उघडतो. जेलबाहेर पडताच रहमान खान आपल्या गावी पळतो ते थेट झरिनाच्या (मिठू मुखर्जी) कोठ्यावर…
आता आपल्याला विलक्षण उत्सुकता असते… रहमान खान शब्द दिल्याप्रमाणे जेलमध्ये परतणार का? आणि जर परतला नाही तर हवालदार रामदीन पांडेचे काय? ही पटकथा आहे सुभाष घई आणि बी. बी. भल्ला यांची. हा चित्रपट रसिकांना आवडला नाही. पन्नास वर्षांपूर्वी अशी गोष्ट सुचली याला काही दाद द्यावी का? पन्नास वर्षांनंतर काय घडले? जेलर एक स्त्री आहे आणि गोष्ट कैद्याशी मन जुळले याची आहे. सिनेमात जे दाखवतात ती अतिशयोक्ती असते असेही म्हणता येणार नाही आणि प्रत्यक्षात जे घडते ते चित्रपट, नाटक, वेबसिरीजसाठी उपयुक्त ठरते, असेही म्हणता येईल. होय ना? सतना कारागृहसारख्या चित्रपटातल्या अनेक गोष्टींना शेवटच नसतो हेच खरे!
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

