Homeमाय व्हॉईसशिवसेना आणि शिव्यांच्या...

शिवसेना आणि शिव्यांच्या समीकरणात नवे ते काय?

शिवसेना आणि शिव्या हे काही नवे समीकरण नाही. मूळची ठाकरेंची सेना असेल वा आता एकनाथ शिंदेंची मान्यताप्राप्त खरी शिवसेना असेल, सेनेच्या आजी-माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी जाहीरपणाने शिवीगाळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मंत्री असलेल्यांच्याही तोंडी पूर्वी अनेकदा शिव्या आल्याची असंख्य उदाहरणे आहेतच. अशा स्थितीत एखाद्या खासदाराने शिव्या देणे हे माध्यमांना आणि समाजमाध्यमांना का नवे वाटावे, हा मला पडलेला प्रश्न आहे. ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत हेही खासदार आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत भ-मच्या शिव्यांनी पत्रकार परिषदेत अन्य नेत्यांचा उद्धार केलाच होता. आता त्याच भाषेत शिवराळपणाने दुसऱ्या संजयने त्यांना उत्तरे दिली. पण त्यांनी राऊतांना दूषणे देताना समोर आलेल्या पत्रकारांनाही शब्दांनी फटकारले. प्रत्यक्ष मारण्याच्या, उडवण्याच्याही धमक्याही दिल्या.

शिवसेना

गेल्या काही दिवसांत मराठीचा मुद्दा गाजतोय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आशाताई भोसलेंना विधानसभेत श्रद्धांजली वाहताना भरपूर चुका केल्या. उच्चारांच्या, व्याकरणाच्या चुका तर ठीक. पण, आशाताईंच्य वडिलांच्या नावातील चूक ही घोडचूकच ठरते. कुणीतरी नार्वेकर बोलताना किती वेळा चुकले याचा चार्टच फिरवला आहे. २६ प्रकारच्या उच्चारणाच्या, व्याकरणाच्या आणि नावांच्या चुका त्या दोनतीन मिनिटांच्या भाषणात होत्या, असा शोध लागला. त्याबद्दल नार्वेकरांना तर दूषणे मिळालीच. पण तेव्हा विधानसभेत हजर असणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्य पक्षांचे नेते, आमदार वा विधिमंडळातील अधिकारी हे सारेच टीकेचे धनी झाले. कारण यापैकी कोणीच अध्यक्षांना चुका करण्यापासून रोखले नाही. विशेषतः दीनानाथ मंगेशकरांच्या नावाऐवजी दीनदयाळ म्हणणे हे तर तत्काळ रोखणे गरजेचे होते. महाभरातात द्रौपदीचे वस्त्रहरण होतना भीष्म, द्रोण आणि सारे पांडव खाली माना घालून बसल्याचे सांगितले जाते. तसेच काहीसे ते दृष्य होते. मराठीचे वस्त्रहरण होताना सारेच चूप बसले होते. नंतर नार्वेकरांच्याही लक्षात त्या चुका आल्या. त्यावरील माध्यमांचा गहजबही त्यांच्या कानी पडला असणार. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या प्रकाराबद्दल विधानसभेत खेद प्रकट केला. टाईपिंगच्या चुका, लहान टायपांतील अक्षरे यांचा दोष होता, असे ते म्हणाले.

शिवसेना

दोषी कोण याचा शोध ते घेतीलच. अध्यक्षीय कार्यालयात ज्यांनी भाषण लिहिले, ज्यांनी ते टाईप केले त्यांच्यावर कारवाई वगैरेही करतील. पण मराठी भाषा त्यादिवशी लाजली हे मात्र खरे. राज ठाकरेंनी लोकांच्या भावनांना सर्वप्रथम आवाज दिला. याचीही नोंद घ्यावी लागेल. ऑपरेशन टायगरचे जे कवित्व मागे उरले आहे, त्याची परिणती म्हणून मराठी भाषेचे आणखी वाभाडे काढले जात आहेत. जे शब्द लिहायचीही लाज साधारणतः बाळगली जाते त्याची लाखोली जाहीररीत्या टीव्हीच्या पडद्यावरून सुरु झालेली आहे. याची सुरुवात कुठून झाली हे पाहायचे तर संजय राऊतांच्या चिडून चिडून घेतलेल्या पत्रकार परिषदांत मूळ शोधावे लागेल. आधी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात ऑपरेशन टायगरला उत्तर ऑपरेशन तुडवा, आहे असे सांगितले. नंतर भ-मच्या शब्दांचा वापर करीत त्यांनी जे सेना उबाठा गट सोडून गेले त्या खासदारांना लाखोली वाहिली. दूषणे दिली. त्यातील एक खासदार होते संजय दिना पाटील. हे भांडूपचे निवासी. संजय राऊतांचे शेजारीच. हे सख्खे शेजारी आता पक्के वैरी बनल्याचे दिसते आहे.

शिवसेना

राऊतांनी दिलेल्या शिव्याशापांना संजय पाटील  काय उत्तरे देतात, काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता माध्यमांना होतीच. तसे काही माध्यमवीर पत्रकार पाटलांच्या घरी गेले होते. जसे राऊतांच्या भांडूपमधील घराबाहेर दररोज कॅमेरे लागतात, तशाच प्रकारे संजय पाटलांच्या घराखालीही दररोज जमावे असे बुहधा टीव्हीवाल्यांनी ठरवले होते. पण दोन दिवसांतच पाटील वैतागले. मुळात ते फारसे बोलण्यासाठी व त्यातही चांगले बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीतच. त्यांचे वडील दीना बामा पाटील मुलुंड-भांडूप परिसरातील एक आक्रमक ऊग्र कामगार नेते होते. त्यांचा दरारा वा दहशत मोठी होती, हे परवा संजय पाटलांनीच ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या चालीवर  सांगितले. आमच्यावर चालून आलेल्या पाच जणांना कायमचे ढगात पाठवले… वगैरे ते बोलले. पिस्तुले, बाँब वगैरे आपली रोजची साधने आहेत, असे सामान आपल्याकडे असतेच वगैरेही त्यांनी सुनावले. राऊतांनी स्वतः समोर यावे. मग कोण कुणाला तुडवतो, असे त्यांचे आव्हान होते. ज्या व्हीडिओवरून पत्रकार चिडले त्यात सुरुवातीला ते अनेकदा सांगतात की, जाऊदे तो विषय.. मला काही बोलायचे नाही.. वगैरे. आपल्याला संजय राऊत काय म्हणतात त्यावर बोलायचे नाही, असेही खासदार संजय दीना पाटील सुचवतात. पण बहुधा पुन्हा पुन्हा तेच ते प्रश्न पत्रकार विचारत होते, म्हणून ते वैतागून म्हणतात की कॅमेरे बंद करा. निघून जा. परत माझ्याकडे येऊ नका, तुम्हाला मारीन वगैरे…

शिवसेना

एकनाथ शिंदेंना, उदय सामंतांना, संजय शिरसाटांना संजय पाटलांच्या या विस्फोटक वक्तव्याचा ताप झाला. त्यांना उत्तरे द्यावी लागली. माध्यमांत सतत दिसणे ही या नेत्यांची सवय आहे. गरजही आहे. संजय पाटलांमुळे हे कुणीच माध्यमांशी वैर घेणार नाहीत, हे ध्यानी आल्यावर संजय पाटलांनीही दिलगिरी वगैरे व्यक्त केली. जे बोलायचे असते तितकेच ते बोलून निघून जायचे ही कला संजय पाटालांना उमजलेली नाही. त्यांनी सरळ धोपटपणाने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच आगपाखड केली. त्यांचे बरेच काही चुकले. त्यांनी शिव्या देणे, धमक्या देणे हे करायला नको होते हे तर खरेच आहे. पण वारंवार तेच ते प्रश्न विचारून नेत्याच्या संयमाची परीक्षा पाहणे हे अधिकार पत्रकारांना तरी कोणी दिले? संयम महत्त्वाचा. पण तो दोन्हीकडून हवा. आपल्याकडील माधम्यांतील अँकरचे ओरडणे व अंगावर येणे हे प्रेक्षकांनाही अनेकदा इरिटेट करते. कसाबच्या हल्ल्यावेळी आपली माध्यमे नको तितका तपशील देऊन पोलीस, लष्कर काय करतेय याचे चित्रिकरण दाखवत रहिली होती. त्याचा फायदा अतिरेक्यांनी घेतला. बीबीसीच्या अशा प्रसंगाचे कव्हरेज आणि आपल्याकडील अशा आणीबाणीचे कव्हरेज यात आपण पुष्कळच बालीश ठरतो. नव्हे सुरक्षायंत्रणांच्या गळ्यातील धोंड ठरतो, याचेही भान मीडियाने बाळगायला हवे.

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आभासी माध्यमाद्वारे अमेरिकेतून भारतात हिट केले गेलेले स्लोगन ‘कॉक्रोच’!

प्रत्येक कालखंडात एखादे वाक्य, एखादी चमकदार शब्दरचना जनमन मोहवते. लोक त्याच स्लोगनभोवती विचार करतात. त्यातून त्या वाक्यार्थाचे वलयही वाढते. “इंदिरा इज इंडिया”, असे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष सत्तरच्या दशकात म्हणाले. तेव्हा त्याविरोधातील लोक, नेते, पक्ष एकत्र आले होते.  गरिबी हटाव,...

सत्तेपाठोपाठ ममतांची तृणमूलवरची पकडही गेली!

देशाच्या राजकारणात तब्बल पन्नास वर्षांनंतर अशी स्थिती आली आहे की, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एकाच पक्षाचे राज्य आले आहे. १९७७मध्ये पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे, हे मुख्यमंत्री होते तर दिल्लीत इंदिरा गांधींचे काँग्रेसचे राज्य सुरु होते. त्यानंतर...

पुस्तक पानसरेंचे, थयथयाट गायकवाडांचा! महाराज वेठीला!!

कम्युनिस्ट विचारवंत व लेखक गोविंद पानसरेंनी ८०च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तिका प्रकाशित केली. पंच्याहत्तर पानी सुधारित आवृत्तीची किंमतही फक्त पाच रुपये ठेवली होती. पहिली आवृत्ती हातोहात विकली गेल्यानंतर पहिल्याच वर्षी १९८८मध्ये तीन वेळा पुस्तक छापले गेले. नंतर...
Skip to content