Homeब्लॅक अँड व्हाईटसंयमाचं प्रात्यक्षिक दाखवणारा...

संयमाचं प्रात्यक्षिक दाखवणारा ‘जंटलमन’!

क्रिकेट जगतात “जंटलमन” क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणारा न्युझिलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि त्यांच्या फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या ३५ वर्षीय केन विल्यम्सनने नुकतेच, इंग्लंड‌ दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटीनंतर अचानक आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. आज क्रिकेट हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही. पण केन विल्यम्सन मात्र‌ त्याला नक्कीच अपवाद आहे. तब्बल १६ वर्षं न्युझिलंड संघाला आपले सर्वस्व दिल्यानंतरही फलंदाजीत सूर गवसत नसल्यामुळे अखेर केनने आपली बॅट म्यान करण्याचा निर्णय घेतला. संघासाठी आपण शंभर टक्के योगदान देऊ शकत नसाल‌ तर जागा अडवून ठेवणे योग्य नाही, ही केनची प्रतिक्रिया त्याची खेळाप्रती असलेली प्रामाणिकता सिद्ध करते.

न्युझिलंडसाठी केनने विक्रमांची अनेक शिखरे सहज पार केली. २०१० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करणाऱ्या केनने थोड्याच अवधीत आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा ठसा उमटवला. अचूक टायमिंग, संयम, फटक्यांची योग्य निवड, भक्कम बचाव आणि प्लेसमेंट ही केनच्या फलंदाजीची खासियत होती. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना खेळण्यात केन माहिर होता. भारतीय संघाचा शैलीदार फलंदाज आणि ‘द वॉल’, या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडच्या फलंदाजीचा वसाच जणू केनने पुढे चालवला. केनच्या फलंदाजीत राहुल द्रविडच्या फलंदाजीची झलक बघायला मिळते. ३७८ आंतरराष्ट्रीय सामन्यात केनने १९,३४६ धावा फटकावल्या. त्यामध्ये ४८ शतके आणि ६ द्विशतकांचा समावेश आहे. टी-२० सामन्याच्या लोकप्रियतेमुळे आक्रमक फलंदाजीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले असतानादेखील केनने आपल्या सुरेख फलंदाजीची छाप पाडली.

न्युझिलंडचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाज अशी दुहेरी उपाधी केनच्या नावापुढे सहज लागू शकते. शांत स्वभाव म्हणून केन नेहमीच इतरांपेक्षा वेगळा भासतो. शतक झाल्यानंतर अथवा एखादा सामना जिंकल्यानंतर आपण काही मोठे यश मिळवलेय, असा अविर्भाव केनच्या चेहऱ्यावर कधीच नसायचा. शांत वृत्ती, विनम्रता त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ केनचा नेहमीच आदर करायचे. आंतरराष्ट्रीय सामन्यातील पर्दापर्णानंतर विल्यम्सनने न्युझिलंड संघाला एक वेगळी झळाळी प्राप्त करून दिली. क्रिकेटविश्वातील एक धोकादायक संघ म्हणून केनने न्युझिलंड संघाची प्रतिमा निर्माण केली. न्युझीलंड संघासाठी तो नेहमीच संकटमोचक म्हणून उभा राहिला. सुसंस्कृत आणि संयमी व्यक्तिमत्व असलेल्या विल्यम्सनने खेळाडूने मैदानात कसे वागावे याचा उत्तम आर्दश घालून दिला. मैदानावर किती तणाव असला तरी केनच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कधी मावळले नाही. स्लेजिंग आणि वादापासून दूर राहून क्रिकेट खेळात महान बनता येते, हे केन विल्यम्सनने साऱ्या क्रिकेट जगाला दाखवून दिले.

२०२१मध्ये केनच्या नेतृत्त्वाखाली न्युझिलंडने पहिल्यांदा आयसीसी “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप” जिंकण्याचा पराक्रम केला. दैवाची साथ केनला मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या न्युझिलंडला आयसीसीच्या चार स्पर्धांत उपांत्य फेरीत तर चार स्पर्धांत अंतिम फेरीत हार खावी लागली. २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत केनने सर्वोतम खेळाडूचा मान मिळवला होता. त्याअगोदर २०१८मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार विल्यम्सनला मिळाला होता. न्युझीलंड क्रिकेट संघटनेचा सर्वोतम खेळाडूचा पुरस्कार केनला ४ वेळा मिळाला. न्युझिलंडमध्ये केनने नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघाचे बरीच वर्षे प्रतिनिधित्व केले. इंग्लंड‌मध्ये ग्लुस्टशायर, यॉर्कशायरतर्फेदेखील केन खेळला. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या व्यवसायिक टी-२० लिग स्पर्धेतदेखील केनने आपली जादुई फलंदाजी पेश केली. केनच्या निवृत्तीमुळे न्युझिलंड संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन येणे कठीण आहे. पुढच्या युवा क्रिकेटपटूंसाठी केन विल्यम्सन हा नक्कीच‌ एक आर्दश राहू शकतो.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

फुटबॉलमधल्या ‘जायंट’ जर्मनची वाताहात…

यंदाच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत एका जमान्यातील महासत्ता असलेल्या जर्मन फुटबॉल संघाला सलग तिसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात पॅराग्वेकडून जर्मन संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हार खावी लागली. या स्पर्धेच्या इतिहासात पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत...

श्रीजेशला बाहेरचा रस्ता तर मनिका ‘राखीव’! काय चाललंय?

आगामी सप्टेंबर महिन्यात जपान येथे होणाऱ्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने‌ दहा खेळाडूंच्या भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. या निवडलेल्या भारतीय संघातून भारताची बुजूर्ग स्टार महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्राला अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने वगळल्याने...

रागावर नियंत्रण ठेवल्यास मीरा ठरेल सरस!

यंदाच्या वर्षातील दुसऱ्या फ्रेंच ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत टेनिस विश्वाला नवे विजेते मिळाले. पुरुष गटात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने तर महिला विभागात रशियाच्या मीरा आंद्रेवाने विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे या दोघांचे ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद होते....
Skip to content