Homeब्लॅक अँड व्हाईटकाटकसर नावाची मिळवती...

काटकसर नावाची मिळवती जोडीदारीण!

वसुधैव कुटुंबकम, ही संकल्पना छान आहे. हे विश्वची माझे घर असेही आपण म्हणतो. महाराष्ट्रात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात एसटी बसने जायला बारा तास लागत असतील तर तेवढ्या वेळात माणूस दिल्लीतून पॅरीससुद्धा जाऊ शकतो. मुद्दा आहे तो खर्च करण्यासाठी हाती धन असण्याचा. जेवढी कमाई असते तेवढा खर्च असतो. कारण कमाईनुसार खर्चाचे गणित मांडावे लागते. अशावेळी काटकसर हा शब्द महत्त्वाचा ठरतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे भारतीय जनतेवर प्रतिकूल आणि दूरगामी परिणाम होणे अपेक्षित आहेच. या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खर्च नियंत्रित करण्याचे आवाहन केले. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येणे किंवा टिंगलटवाळी होणे अपेक्षित होते. आर. के. लक्ष्मण यांनी पेट्रोलटंचाईच्या काळात एक व्यंगचित्र काढले होते. त्यात मोटारीचा मालक मोटारीत बसलेला असून दोन बैल मोटार ओढत आहेत असे दाखवले आहे. आपल्या महाराष्ट्रातील एका चमको राजकीय नेत्याने घोड्यावर बसून स्वतःची वरात काढली आणि हा पोरकटपणा वाहिन्यांनी आवर्जून दाखवला. टंचाईची परिस्थिती आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य करण्यास नालायक आहे, असेदेखील बोलले जाऊ लागले.

या सगळ्या गोष्टी अनपेक्षित नसतात. पण माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील असे नसते. एक पिढी मेहनत करुन काही उभे करते तेव्हा पुढच्या पिढीला सुगीचे दिवस येतात. एका नामवंत साहित्यिकाने मेहनत करकरुन त्याच्या हयातीत एक छोटासा पण टुमदार बंगला बांधला होता. बंगल्यात ते बागेत असलेल्या झोपाळ्यावर बसून संध्याकाळी हवा घेत असत. हे साहित्यिक गेल्यानंतर वारसा हक्काने बंगला मुलाकडे आला. त्याने बंगला पाडून तिथे इमारत उभी केली. दुकाने काढली, फ्लॅट बांधले. पण बंगला उभा करताना वडिलांनी केलेली काटकसर, पोटाला काढलेले चिमटे याचा विसर कदाचित मुलाला पडलादेखील असेल. आज देश विकसनशील आहे. शहरीकरण वाढले आहे. नव्या पिढीला पैसा मिळू लागला आहे, पण अजूनही काटकसर करुन जगणारा समाज आजूबाजूला आहेच. आज साठी ओलांडलेल्या लोकांना चाळीस वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती ते आठवेल. आज चौकात जाऊन औषध आणायचे तरी दुचाकी काढून जाणे शक्य आहे. पण सगळ्यांना शक्य नाही. अजूनही लाखो लोक सार्वजनिक बस वापरतात. ज्येष्ठ मंडळींना नक्की आठवेल की घराच्या जवळ असलेल्या बसस्टॉपवर बसमध्ये बसल्यास पाच रुपये आणि पुढच्या बसस्टॉपवर बसल्यास तीन रुपये पडत असतील तर बरेच लोक चालत पुढच्या स्टाॅपवर जाण्याची तसदी घेत असत. दोन रुपये वाचले ते नंतर उपयोगी पडतील म्हणून. आजही पेट्रोल पंपावर दोन प्रकारचे ग्राहक दिसतील. एक ग्राहक चारचाकी गाडी घेऊन आला आहे, तो टाकीत बसेल तेवढे इंधन भरायला सांगतो तर दुसरा दुचाकीवर आलेला कसेबसे पन्नास रुपयांचे पेट्रोल भरतो. तेवढा प्रवास करुन नंतर पुन्हा पेट्रोल भरतो.

काटकसर

घरामध्ये काटकसर करण्याची अंगभूत सवय भगिनींना असते. उधळपट्टी करणारी महिला प्रगतीच्या आड येऊ शकते. जिथे इंधनाचा कायम तुटवडा असायचा तिथे खेड्यात सिलिंडरमधून गॅस अगदी काही वर्षांपूर्वी आलेला आहे. त्याआधी तिथे चुली होत्या. लाकडे, कोळसा याचा वापर करावा लागत असे. अंघोळीला लागणारे पाणी तापवण्यासाठी पालापाचोळा वापरतात येत असे. निसर्गात सगळे उपलब्ध असते. फक्त ते ओरबाडून काढण्याऐवजी अलगद काढले तर बरे असते. संसारात आणखी काटकसर म्हणजे अन्नाचा योग्य पद्धतीने वापर करणे. घरात किती माणसे जेवायला आहेत याचा अंदाज घेऊन दोन घास कमी झाले तरी हरकत नाही, पण वाया जायला नको ही भूमिका असायची. आज घरोघरी फ्रीज असूनही अन्न वाया जाण्याचे प्रमाण बरेच आहे. शहरी भागात कचरा नेणाऱ्या या गाड्या बघितल्या तर याचा प्रत्यय येईल. एवढे कशाला, मोठ्या शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या मोठमोठ्या हाॅटेलमध्ये सगळ्या गोष्टी भव्य प्रमाणात आहेत. कौतुकाने घरातील चारपाच माणसे जेवायला गेली तर तिथले वातावरण बघून भारावून जातात. मेन्यू कार्ड भलेमोठे असते. शेकडो पदार्थ असतात. मग भाताचा एखादा प्रकार सांगितला की, तो आधी भरपूर महाग असतो आणि भल्यामोठ्या भांड्यात तो येतो. एकटा माणूस खाऊ शकत नाही. इतरांना हवा असेल असे नाही, त्यांनी त्यांच्या आवडीचा पदार्थ सांगितलेला असतो, तोच त्यांना झेपत नाही. परिणाम असा होतो की प्रत्येक टेबलवर असा न संपलेला माल उरतो आणि तो भरुन नेण्यासाठी एक ढकलगाडी येते. सकाळच्या वेळी हाॅटेलच्या बाहेर प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये असा वाया गेलेल्या पदार्थांचा ढीग असतो. ट्रक भरभरुन हा माल शहराच्या बाहेर जातो. जाताना ट्रकच्या बरोबर कावळ्यांचे थवे त्यांच्या भोजनाची आयती तरतूद झाली म्हणून आनंदाने विहार करीत असतात.

अशा हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करायला जाण्याची हुक्की आली तर आधी दरपत्रक बघावे. खूप किंमत असते. पोहे म्हणत नाहीत, पोहा असा उल्लेख असतो. किंमत १२० रुपये. हेच पोहे वीस-पंचवीस रुपयांनादेखील मिळतात. पण इथे बाऊल भरभरुन वाहत असतो. घरात चार माणसे नाष्टा करायला असतील तर जेवढे पोहे पुरतील तेवढे एकाच प्लेटमध्ये येतात. नूडल्स वगैरे मागवल्या तर त्यादेखील भल्यामोठ्या टंपरमध्ये येतात. नाईलाजाने खाणे भाग पडते आणि मग एकदा वजन वाढण्याची प्रक्रिया सुरु झाली की आपलेच गाल आपल्याला मोठे झाले आहेत हे जाणवते. मग गाल कमी करण्याऐवजी आपण मोठा आरसा आणतो. अशी एकंदर गंमत असते. तर राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर एकशेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लोकांनी कसे वागावे किंवा कोणत्या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करण्याची यंत्रणा नाही. तशा सूचना असतात, पण वेगवेगळे प्रांत आणि वेगळी संस्कृती असलेल्या देशात अशा गोष्टी सोप्या नाहीत. सरकारी आदेश त्या-त्या विभागापुरते ठीक असतात. पण आपल्याकडे नियम आणि कायदे टांगणीला बांधतात तिथे संकेत वगैरे गोष्टी विसरणे बरे. पण देशात राजकीय तटबंदी आहे, प्रत्येक सत्ताधारी आपली सत्ता कशी टिकेल यावर भर देत आहे तर विरोधी पक्ष सरकार एकदाचे अपयशी झाले की मग आपणच आहोत या भावनेत आहेत. पण उपलब्ध साधनसंपत्ती योग्यप्रकारे वापरावी, भविष्यात, म्हणजे उतारवयात उपयुक्त ठरतील अशा गोष्टी कराव्यात. बचत करावी. उधळपट्टी न करता धनाचा योग्य वापर करावा. दानधर्म करावा, दुसऱ्याला मदत करावी हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. ती संस्कृती जपली की आयुष्य समाधानी होते. कोणी आवाहन करण्याची गरज काय? आपले आपल्याला समजते की!

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वैयक्तिक स्वार्थ, हा काँग्रेसला जडलेला आजार!

राजकीय पक्षांनी सतत निवडणुकीच्या तयारीत असावे हे अपेक्षित आहेच. पण नियोजन बरेच आधी करणे आवश्यक असते याचा विसर राजकीय पक्षांना पडणे धोक्याचे असते. दीर्घकालीन योजना आखून राजकारण करण्याची नवी पद्धत भाजपने सुरु केली आहे. पण संघटनात्मक बांधणी करण्याची संकल्पना...

पवारांचा राजकीय आवाका राज्यसभा तर ठाकरेंचा विधानपरिषदेपर्यंतच!

उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये घाईघाईने किंवा घिसाडघाई करुन मुख्यमंत्री होण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याचवेळी आणि त्यानंतर अनेकदा मी हा निर्णय अखंड शिवसेनेस महाग पडेल असे म्हटले होते. आता उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीअर्ज दाखल करायचा नाही असा...

घुसळण चिदंबरम यांच्या मनातली!

काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम, हे वर्तमानपत्रात साप्ताहिक सदर चालवत असतात. श्रीमंत राजकारणी आहेत आणि काँग्रेस पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे. आजच्या देशातील राजकीय परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी लिहिलेला लेख आवर्जून वाचला. ते भाजपचे टीकाकार आहेत आणि आमच्या काळात सगळे...
Skip to content