Homeब्लॅक अँड व्हाईटनेपाळी उतरवणार आंबे...

नेपाळी उतरवणार आंबे आणि आम्ही पारावर मारणार ‘होर्मूझ’च्या गप्पा!

वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर एखाद्या वेगळ्या बातमीकडे लक्ष जाते आणि विचारांना वेगळी दिशा मिळते. भारतात शहरीकरण मोठ्या वेगात सुरु आहे, पण तरीही ग्रामीण भागाचे महत्त्व कायम आहे. निवडणुकीच्या संदर्भातील बातमी वाचत असताना भारतीय समाजरचना कशी आहे हे लक्षात आले. कामाच्या शोधात गाव सोडून शहरात जाणारी माणसे हा विषय महत्त्वाचा आहे. त्यापेक्षाही त्यातून निर्माण होणारे काही सामाजिक आणि राजकीय प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. परप्रांतीय हा शब्द बराचसा तिरस्काराने वापरला जाणारा शब्द आहे. महाराष्ट्रात तर या विषयावर अनेक वर्षे राजकीय पोळ्या भाजून पोट भरणारे राजकीय पक्ष आहेत. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील वरिष्ठ पदांसाठी नोकरी करण्यासाठी आपले गाव सोडून जाणे भाग असते. पण अंगमेहनतीची कामे करणारे लोकदेखील आपले राज्य सोडून अन्य ठिकाणी जातात. आज एक बातमी वाचताना ही पार्श्वभूमी लक्षात आली. आसाममध्ये नुकतेच ९ तारखेला विधानसभेसाठी मतदान झाले. त्याचदिवशी केरळमध्येदेखील मतदान झाले. आसाममध्ये मतदान करण्यासाठी देशाच्या अन्य भागात गेलेले कामगार परत गेले होते. त्याचा परिणाम उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये सामाजिक आणि औद्योगिक जीवनात दिसून आला. उत्तर प्रदेशात एका शहरात साफसफाईचे काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या लोकांमध्ये आसाममधील अनेक लोक आहेत. हे लोक निवडणुकीत मतदान करण्यासाठी परत गेले. परिणाम असा झाला की साफसफाई करण्याचे काम रखडले. याचा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर झाला. कोकणातही तशीच स्थिती होती. नेपाळमधल्या निवडणुकीमुळे तेथेही कामासाठी मुले मिळत नव्हती.

कर्नाटकात मुख्यतः कॉफीचे मळे आहेत. कॉफीच्या बिया अलगद वेचून काढणे, झाडांच्या पानांची एकेक करत स्वच्छता करणे हे कौशल्याचे आणि कंटाळवाणे काम आहे. जसे महाराष्ट्रात सिक्युरिटी वगैरे कामासाठी स्थानिक लोक फारसे मिळत नाहीत, त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक आणावे लागतात तसे कर्नाटकात काँफीच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी आसाममधील कामगार येतात. कॉफीचे मळे जपणे हेही महत्त्वाचे काम असते. जागतिक पातळीवर कॉफीची मागणी मोठी आहे. मळेवाले त्यामुळे श्रीमंत झाले आहेत. कर्नाटकातील काही जिल्ह्यांतील लोक अलिकडच्या काळात यामुळे प्रचंड श्रीमंत झाले आहेत. छोटी घरे बाजूला पडून दोनदोन मजली बंगले आणि अत्याधुनिक मोटारी वगैरे आल्या आहेत. दागिने घडवणाऱ्या कंपन्या इकडे शाखा उघडीत आहेत. पण सध्या बरेच मजूर मतदान करण्यासाठी निघून गेले आहेत. त्यामुळे कर्नाटकात मोठी समस्या निर्माण झाली आहे. केरळमध्ये बांधकाम क्षेत्रात अशी परिस्थिती आहे.

विधान

मुद्दा असा आहे की, कोणत्याही राज्यात सर्व प्रकारच्या सेवा प्रदान करु शकेल असा कामगारवर्ग उपलब्ध नाही. अशा काळात वस्तुस्थिती समजावून घेणे आणि त्यासंदर्भात धोरण आखणे महत्त्वाचे आहे. आसाम आणि केरळमध्ये एकाच दिवशी मतदान असल्यामुळे आणि आसाममधील कामगारांना आपण मतदान केले नाही तर आपले नाव मतदारयादीतून बाहेर जाण्याची भीती असल्यामुळे मोठ्या संख्येने कामगार परत गेले. महाराष्ट्रात महानगरे वाढत आहेत. तिथे मोठमोठय़ा इमारती आहेत. तिथे सकाळी गरम पाणी आले नाही, किंवा पाण्याची मोटार चालू करायची राहिली तर सोसायटीच्या ग्रूपवर काँमेंटचा पाऊस पडतो. तिथेही कामे करणारे मोठ्या संख्येने परप्रांतीय आहेत. त्यांच्याविना पान हलत नाही. मग परप्रांतीय म्हणून त्यांचा तिरस्कार कसा करता येईल हा महत्वाचा प्रश्न.

एकंदरित आपण विकसित देश होण्याकडे वाटचाल करीत आहोत हे खरे. परंतु परिणाम असा होतो आहे की, आरामदायी आयुष्य जगण्याची सवय नव्या पिढ्यांना लागत आहे. यातून दुसरा अत्यंत चांगला अर्थ असा काढता येईल की, भारतात विविधतेत एकता आहे आणि एकमेकांवर आपण सगळे अवलंबून आहोत. आज प्रसारमाध्यमे प्रभावी झाल्यामुळे भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांची ओळख आपल्याला होऊ लागली आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार व्यक्तिमत्त्व घडते. नाकीडोळी सगळे सारखे असू शकत नाहीत. याचे सामाजिक परिणाम आपण अनुभवले आहेत. पण बरेचसे गैरसमज त्यामागे होते. पूर्वोत्तर राज्यांमधील लोक गोरेगोमटे आहेत, पण त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जरा वेगळी आहे. याचा साईड इफेक्ट काही वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाला होता. आपल्या परिसराच्या संदर्भात लोक जागरुक असतात. कोणीतरी आपले लुबाडून नेईल ही भीती असते. त्यातून काही गोष्टी घडत असतात. सोसायटीत रिकाम्या फ्लॅटमध्ये कोणी नवा भाडेकरु आला तरी प्रारंभी तो नकोसा वाटतो काहींना.. तिथे घरात अधिक माणसे असतील तरीही इतरांना अस्वस्थ वाटते. हे आता लवकर पाणी संपवणार म्हणून कोणी आपल्या घरात नवी टाकीदेखील बसवत असतील. हा मानवी स्वभाव असतो.

विधान

आता महाराष्ट्रात कोकणात आंबा सीझन सुरु आहे. या काळात आंबे खाली उतरवून खोक्यात भरण्यासाठी माणसे येतात ती नेपाळमधून. आमचे स्थानिक लोक पारावर बसून गप्पा मारण्यात आणि अमेरिका-इराण युद्धाचे विश्लेषण करण्यात मग्न असताना नेपाळी पोरं दोन महिन्यांत लाखभर रुपये घेऊन जातात. पुढे गावातच काम मिळाले की कशाला परत जातील? म्हणजे देशातील सगळे प्रांत एकमेकांवर अवलंबून आहेत हे लक्षात घेतले तर भारताची ताकद काय हे लक्षात येईल. फक्त याचा राजकीय वापर करुन सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची युक्ती भविष्यात चालणारी नाही. परप्रांतीय वेगळे आणि शेजारच्या देशातून येणारे घुसखोर वेगळे. घुसखोरांना इथे स्थान मिळणे कायद्याने शक्य नाही. त्याचे धोके आहेतच. परप्रांतीय या विषयात तसे धोके नाहीत, तरीही योग्य पद्धतीने याची नोंद असणे आवश्यक आहे. कोणत्याही राज्याचे भौगोलिक स्वरुप बदलण्याचा विषय येत नाही. कोणीही आपली इंचभर जमीन सोडणार नाही, परंतु राजकीय स्वरुप बदलण्याची भीती लोकांच्या मनात असते. महाराष्ट्रात सध्या परप्रांतीय हा विषय फारसा चर्चेत नाही. पण अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात योजनाबद्ध पद्धतीने माणसे आणून संदर्भ बदलण्याचे उद्योग होत नाहीत असे नाही. भाषिक तत्त्वावर राज्यांची मांडणी झालेली आहे. त्यामुळे भविष्यात तसे स्वरुप कायम राहणे योग्य ठरेल. म्हणून विविधतेत एकता जपत असताना हे संदर्भदेखील महत्त्वाचे ठरतात.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राजकारणात राबवले जातेय ‘अनुकंपा’ धोरण, तेही ‘बिनविरोध’!

पुण्यात २००९मध्ये मनसेच्या तिकिटावर रमेश वांजळे खडकवासला मतदारसंघात आमदार झाले होते. स्वतः वांजळे वारकरी पंथातले. मनमोकळ्या स्वभावाचे. दाक्षिणात्य चित्रपटातील एका नामवंत कलाकारासारखे व्यक्तिमत्त्व होते. राज ठाकरे यांचा त्या निवडणुकीत बोलबाला होता. त्यांच्या एका सभेने आणि वांजळे यांच्या लोकप्रियतेमुळे खडकवासला...

पालीतला तो एसटी बसस्टँड आणि फाजील अपेक्षा!

एसटी प्रवास हा माझ्या आवडीचा विषय. विशेषतः लाल परी अधिक चांगली. दाणकन आपटल्याशिवाय दरवाजा लागत नाही. अचानक दरवाजा उघडण्याची भीतीदेखील कमी असते. आता लाल परीच्या जागी आरामदायी बस आल्या आहेत. हा एक बदल आहेच. मला मोटारीने प्रवास करणे आवडत...

‘आई रिटायर होतेय..’ ‘काका’ कधी होणार?

अशोक पाटोळे यांनी लिहिलेले "आई रिटायर होतेय" हे नाटक चाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. भक्ती बर्वे यांच्या मुख्य भूमिकेने ते गाजले होते. बाळ कर्वे यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण प्रभाव भक्ती बर्वे यांचा राहिला. सध्या चर्चा सुरु असलेल्या एका...
Skip to content