Homeन्यूज अँड व्ह्यूजतृणमूलच्या विळख्यातून प....

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार, दहशत, हत्त्या, खुनाच्या धमक्या, खंडणी अशा घटनांनी जनता भयभीत होती. ममता यांना सत्तेवरून हटविल्याशिवाय राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याची खात्री पटल्यामुळेच भाजपाने सत्तापरिवर्तनाची हाळी दिली होती. सलग तीन निवडणुकांमध्ये विक्रमी बहुमत मिळविणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करणे भाजपापुढे मोठे आव्हान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची कुशल रणनिती यापुढे तृणमूल काँग्रेसचा निभाव लागला नाही. भाजपाने २०७ जागा जिंकल्या तर तृणमूलला ८० जागा मिळवताना दमछाक झाली. ४ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर ममता यांना टाटा-बायबाय असे अमित शाहांनी केलेल भाकीत खरे ठरले. राज्यातील जनतेची भावना व इच्छा त्यांनी ओळखली होती. ज्या राज्यात दहा वर्षांपूर्वी भाजपाचे जेमतेम तीन आमदार निवडून आले होते. त्या राज्यात या पक्षाचे दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले, कारण बंगालमधील मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या विळख्यातून सुटका करून घ्यायची होती. मतदारांनी भाजपाला पर्याय म्हणून निवडले आहे. मोदी-शाह यांच्या नेतृत्त्वावर विश्वास प्रकट केला आहे.

भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंधु अधिकारी यांनी शपथ घेतली आणि पश्चिम बंगालमध्ये नवी पहाट उगवली आहे. राज्यात भाजपाचे सरकार आले म्हणून ऑटो रिक्षावाल्यापासून ते व्यापारी, विद्यार्थी, युवक, महिला या सर्वांना आनंद झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या दहशतवादापासून सुटका होणार म्हणून नव्या सरकारकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. सुवेंधू अधिकारी यांच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवरील शपथविधी समारंभाला पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शाह स्वत: उपस्थित होते. देशातील भाजपाच्या सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे एनडीएचे वीस मुख्यमंत्री तसेच देशपातळीवरील अनेक नेते या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. पश्चिम बंगालमधील नव्या सरकारच्या पाठिशी केंद्र सरकार, भाजपा, एनडीए सर्व ताकदीनिशी उभी आहे, हाच संदेश या सर्वांच्या उपस्थितीतून दिला गेला. शपथविधीच्या आदल्या दिवशी झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षापुढे शाह यांनी केंद्रीय निरीक्षक म्हणून सुवेंधू अधिकारी यांचे नाव नेतेपदासाठी जाहीर केले तेव्हा सर्व राज्यात आनंदाची लाट दिसून आली. सुवेंधू अधिकारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य निवड आहे व तेच तृणमूलच्या दहशतवादाला चाप लावू शकतील, असा जनतेला विश्वास आहे.

सुवेंधू

महिलांची सुरक्षितता, वाढलेली प्रचंड बेरोजगारी, तरूणांमधील असंतोष, भांडवल गुंतवणूक होत नसल्याने नव्या उद्योग व्यवसायांची कमतरता, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि सर्वात महत्त्वाचे बांगलादेशातून रोज येणाऱ्या घुसखोरांना राज्यात दिले जाणारे संरक्षण, या समस्यांशी भाजपाला सरकारला डोळ्यात तेल घालून लढावे लागणार आहे. ज्याप्रमाणे आसाममध्ये घुखखोरी रोखण्यात तेथील भाजपा सरकारने यश मिळवले आहे, तसेच बंगालमध्ये कठोर उपाय योजून घुसखोरांचा प्रवेशच रोखला पाहिजे. ५६ वर्षांच्या सुवेंधू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना २०२१मध्ये विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात पराभूत केले होते आणि आता २०२६मध्ये भवानीपूर मतदारसंघात पराभूत केले. मुख्यमंत्र्यांचा दोन निवडणुकीत दोन वेळा पराभव करण्याचा विक्रम सुवेंधू अधिकारी यांनी करून दाखवला आहे. सुवेंधू अधिकारी अगोदर विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये होते. सुवेंधू यांचे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वडिल काँग्रेसचे खासदार होते व डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील युपीए सरकारमध्ये मंत्री होते. सुवेंधू हे ममता यांना तृणमूल काँग्रेसच्या सुरूवातीपासून साथ देत होते. तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनात ते आघाडीवर असायचे. बंगालमधील सलग ३४ वर्षे सत्तेवर राहिलेले डाव्या आघाडीचे सरकार ममता यांनी उलथवले त्यात सुवेंधू यांचा सिंहाचा वाटा होता. ममता यांचे निकटवर्तीय म्हणून बंगालमध्ये परिचित होते. पण तृणमूल काँग्रेसचे राज्यात साम्राज्य वाढत गेले तसे ममता यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचे महत्त्व पक्षात वाढत गेले. तिथूनच सुवेंधू अधिकारी नाराज झाले.

ममता यांचे नेतृत्व लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांना आव्हान देणे सोपे नव्हते. पण ते धाडस त्यांनी डिसेंबर २०२०मध्ये दाखवले. तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये सामील झाले. अमित शाह यांनी सुवेंधू यांना विश्वास दिलाच, पण पश्चिम बंगालमधील २०२१च्या निवडणुकीची धुरा त्यांच्यावर सोपवली. त्या निवडणुकीत भाजपाचे ७७ आमदार निवडून आले. या आश्चर्यकारक यशाने भाजपाचा आत्मविश्वास वाढला. आपण ममता यांचा पराभव करू शकतो, २०२६च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवू शकतो, अशी रणनिती भाजपाने आखली. बंगालमधील जनसमर्थन भाजपाबरोबर होते. जनतेला परिवर्तन हवे होते. तेच घडले व निवडणुकीत सर्वत्र कमळ फुलले. सुवेंधू अधिकारी हे एकेकाळी ममता ब’नर्जींचे सेनापती म्हणून ओ‌ळखले जात असत. आता तेच सुवेंधू हे ममता यांचे राजकीय शत्रू नंबर १ बनले आहेत. ज्या नंदीग्रामधे वीस वर्षांपूर्वी ममता यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारला हादरे दिले, त्याच नंदीग्राममध्ये सुवेंधू यांनी २०२१मध्ये ममता यांचा पराभव करून दाखवला. ज्या भवानीपूर मतदारसंघातून ममता यांनी सतत विजय मिळवला त्याच मतदारसंघात सुवेंधू यांनी ममता यांचा यंदा पंधरा हजार मतांनी पराभव केला. एकेकाळी सुवेंधू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचा लढाऊ चेहरा होता. तेच सुवेंधू हे भाजपाचे राज्यातील यशस्वी सारथी ठरले आहेत. मोदी-शाहांचा विश्वास त्यानी संपादन केला आहे. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर वर्षानुवर्षे डाव्या पक्षांच्या व तृणमूल काँग्रेसच्या लाखोंच्या सभा बंगालच्या जनतेने बघितल्या होत्या, त्याच मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा रविवारी संपन्न झाला. नव्या मुक्यमंत्र्यांना शुभेच्छा!

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content