Homeटॉप स्टोरीउद्या सम्राट सरकारचा...

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य ‘मेगा रोड शो’देखील आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे हे होत असतानाच बिहारच्या शेजारीच असलेल्या पस्चिम बंगालमध्ये उद्याच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अधिकारपदाचा अखेरचा दिवस असेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी हार मानायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी लोकभवनावर जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलेला नाही. परंतु प. बंगाल विधानसभेची सध्याची मुदत उद्याच संपत आहे. त्यामुळे राज्यपाल ती विधानसभा विसर्जीत करतील. पर्यायाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्या सत्तेवरून पायऊतार व्हावेच लागेल.

१५ एप्रिल रोजी सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मात्र इतर राज्यांतील निवडणुकांमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. उद्याच्या या शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार आणि एनडीएचे इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण २७ नवीन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांच्या संमतीने ठरलेल्या सूत्रानुसार, भाजपच्या कोट्यातून १२, तर संयुक्त जनता दलाच्या (जदयू) कोट्यातून ११ मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. याशिवाय चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) २, तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला (आरएलएम) प्रत्येकी १ मंत्रीपद देण्यात येणार आहे. बिहार विधानसभेच्या संख्याबळानुसार जास्तीतजास्त ३६ मंत्री असू शकतात, मात्र भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन ६ पदे सध्या रिक्त ठेवली जाणार आहेत.

सम्राट

मंत्रिमंडळात जुन्या अनुभवी नेत्यांसह काही नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळण्याचे संकेत आहेत. जदयूकडून अशोक चौधरी, श्रावण कुमार आणि लेसी सिंह यांसारख्या जुन्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर भाजपकडून विजय सिन्हा, मंगल पांडे, श्रेयसी सिंह आणि रामकृपाल यादव यांच्या नावांची चर्चा आहे. या विस्तारामुळे बिहारमध्ये आता खऱ्या अर्थाने पूर्णवेळ सरकार कार्यरत होणार असून, प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाटणा शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून गांधी मैदानावर भव्य तयारी करण्यात आली आहे.

तिथे प. बंगालमध्ये विधानसभा विसर्जित झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी कोलकात्यात नव्याने सत्तेत येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपाचा विधिमंडळ गटनेता निवडला जाईल. शनिवारी सकाळी १० वाजता भाजपाच्या नव्या सरकारचा शपथविधी होईल. या गुरूवार ते शनिवारच्या दरम्यान प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट राहते का, याकडेही जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content