Homeब्लॅक अँड व्हाईटपुस्तक पानसरेंचे, थयथयाट...

पुस्तक पानसरेंचे, थयथयाट गायकवाडांचा! महाराज वेठीला!!

कम्युनिस्ट विचारवंत व लेखक गोविंद पानसरेंनी ८०च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तिका प्रकाशित केली. पंच्याहत्तर पानी सुधारित आवृत्तीची किंमतही फक्त पाच रुपये ठेवली होती. पहिली आवृत्ती हातोहात विकली गेल्यानंतर पहिल्याच वर्षी १९८८मध्ये तीन वेळा पुस्तक छापले गेले. नंतर त्याच्या डझनावारी आवृत्त्या निघाल्या. त्यातील चौथ्या आवृत्तीपर्यंत अनेक सुधारणा करून त्यातल्यात्यात बिनचूक पुस्तक साधारणतः १९९१मध्ये तयार झाले. सध्या जी आवृत्ती कोल्हापुरात छापली गेली व वितरीत केली जात आहे ती साधारणतः ३८वी आवृत्ती वा पुनर्मुद्रण म्हणावे लागेल! आजवर याच्या दीड लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. पानसरेंच्या काळापासून कार्यकर्त्यांच्या विचार प्रबोधनाचे हे पुस्तक अतिशय कमी किंमतीत विकले जात आहे. सध्याच्या पद्धतीनुसार पंच्याहत्तर-ऐंशी पानांची किंमत व्यावसायिक प्रकाशक शंभर रुपयांपर्यंत ठेवतात. पण कोल्हापुरात प्रकाशित सध्याच्या आवृत्तीची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये. गंमत म्हणजे अमेझॉनवर हेच पुस्तक तब्बल दोनशे रुपयांना विकले जात आहे!

गोविंदराव पानसरे कोल्हापुरात स्थायिक झाले असले तरी ते मूळचे नगर जिल्ह्यातील. नगर जिल्हा हा एकेकाळी राज्यातील लाल जिल्हा म्हणूनच प्रसिद्ध होता. तिथे काँग्रेसच्या बरोबरीने किंवा काही तालुक्यांत काँग्रेसपेक्षाही अधिक ताकदीने कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामात पुढे राहिले. ती परंपरा पानसरेंनी लहानपणापासूनच पुढे नेली. सहाजिकच मुळात हे पुस्तक त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांचे  प्रबोधन व्हावे याच दृष्टीने तयार केले होते. १९८६-८७मध्ये पानसरेंनी या विषयावर एक दीर्घ भाषण दिले होते. कार्यकर्त्यांनी त्याचे पुस्तक तयार करण्याचा आग्रह धरला, तेव्हा पानसरेंनी अनेक तज्ज्ञांची मदत घेतली. जुने संदर्भ पुन्हा नव्याने वाचून काढले आणि जवळपास वर्षभरानंतर पुस्तक तयार झाले. याचे वर्णन स्वतः पानसरे हे ग्रंथ वगैरे करत नाहीत. ही पुस्तिका आहे हीच त्यांची भूमिका होती. हे विविध ऐतिहासिक संदर्भांचे संकलन म्हणता येईल. पण कार्यकर्त्यांनी, वाचनप्रेमींनी त्याचे वर्णन महत्त्वाचे पुस्तक असेच केलेले दिसते. आता पुस्तिका आल्यानंतर चाळीस वर्षांनी आणि स्वतः गोविंद पानसरे यांचा भीषण खून झाल्यानंतर दहा वर्षांनी, पानसरेंचा आणि त्यांच्या प्रकाशकांच्या कुळांचा, “उद्धार” करीत, शाब्दिक हिंसक हल्ला एका कथित पुढाऱ्याने केला आणि तो महाराष्ट्रात वादाचा विषय ठरला आहे.

पानसरे

पुस्तकाचा प्रचंड खप हे त्याच्या वाचकप्रियतेचे गमक मानले तरी या पुस्तकाची लोकप्रियता स्पष्ट होते. आता हे असे वाचकप्रिय गाजलेले पुस्तक बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी वाचले नाही हा काही पानसरेंचा दोष असू शकत नाही. वा प्रकाशकांचाही तो गुन्हा नाही. आधी वाचा व मग बोला, अभ्यासून प्रकटावे हे काही गायकवाडांना मान्य नाही. सरकारी कर्मचाऱ्याने काम केले नाही तर त्याला तिथेच हाणणे, कँटिनचे जेवण पसंत पडले नाही तर वेटरलाच धुणे, असले उद्योग करणाऱ्या गायकवाडांनी कोल्हापूरच्या प्रकाशक मुलाला धमकावणे यात आश्चर्य काहीच नाही. प्रशांत आंबी हे सध्याचे शिवाजी कोण होता?, या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी, रात्री एकच्या सुमारास गायकवाडांचा फोन आला. त्यात शिवीगाळ आणि धमक्या दिल्या गेल्या. त्याची ऑडिओ टेप दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ऐकली. कोल्हापूर पोलिसांनी अद्यापी त्याबाबत आमदार गायकवाडांवर गुन्हा नोंद केलेला नाही. आश्चर्य याचे वाटते  की अशा लोकप्रतिनिधीला त्याचा पक्ष, त्याचे नेते काही बोलत नाहीत हे कसे? की अशा वागण्या-बोलण्याला एकनाथ शिंदेंचा, शिवसेनेचा पाठिंबा आहे का? पक्ष गायकवाडांच्या मागे ठाम उभा आहे, अशी जर भूमिका शिंदेंची असेल तर मग प्रश्नच संपले.

न्यू एज प्रिंटिंग व लोकवांग्मय गृह, या कम्युनिस्ट विचारांच्या संस्थांनी मूळचे, “कोण होता शिवाजी?” हे पुस्तक वा त्याला पानसरे म्हणतात तसे पुस्तिका छापली व १९८८मध्ये प्रकाशित केली. त्याच्या शीर्षकावरून या आमदाराचे डोके फिरले. जे लोक पुस्तके न वाचताच टीका करत सुटतात आणि वर आम्हीच छत्रपतींचे खरे अभिमानी आहोत असे मिरवतात, त्यांची कीव करावी लागेल. शिवरायांचा आदराने उल्लेख करतानाही अनेकदा एकवचनाचा वापर इतिहासकाळातील लेखकांनी केला आहे. याचा अर्थ ते शिवाजीद्वेष्टे होते का? की त्यांना महाराजांच्या कार्यकर्तृत्त्वाची जाणीव नव्हती? असे नक्कीच म्हणता येणार नाही. गेल्या शतकातील लेखनाची ढब आणि पद्धतीत, “राजा शिवाजी” इतके म्हणणेही पुरेसे आदरार्थी ठरत होते. हा त्या काळाचा महिमा आहे. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी शककर्ता शिवाजी ग्रंथ लिहिला. न्या. महादेल गोविंद रानडेंनी राईज ऑफ मराठा पॉवर, हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. श्रीशिवछत्रपती ग्रंथाचे कर्ते प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि संस्कृत तसेच इंग्रजी, मराठीचे विद्वान भाषाप्रभु श्रीपाद अमृत डांगे अशा अनेकांनी शिवाजी राजे असेच उल्लेख लिखाणात केले आहेत. या सर्वांना गायकवाडांसारखे गणंग नेते दूषणे देणार आहेत का? हाही सवाल आहेच.

पानसरे

संजय गायकवाड, हे शिवसेना अखंड असताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात बुलाढाण्यातून प्रथमच आमदार झाले. २०१९च्या निवडणुकीत त्यांनी सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता. २०१४ ते २०१९ या काळात सपकाळ, हे त्या मतदारसंघाचे आमदार होते. पण पुढच्याच निवडणुकीत ते थेट तिसऱ्या स्थानवर फेकले गेले. तर वंचितच्या तिकिटावर लढलेले सेनेचे माजी नेते विजय शिंदे दुसऱ्या स्थानवर राहिले. मात्र गायकवाडांच्या कार्यशैलीमुळे त्यांची मते पुढच्या २०२४च्या निवडणुकीत घटली म्हणा अथवा शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना या लढतीत गायकवाडांचा निसटता विजय झाला. २०२२च्या सेना फुटीत गायकवाड शिंदेंसोबत सत्तेत आले होते. ठाकरेंनी तिथे जयश्री शेळके यांना तिकीट दिले होते. संजय गायकवाड फक्त ८४१ मतांच्या फरकाने जिंकले आणि सध्या आमदार बनलेले आहेत. आता पुढच्या निवडणुकीत त्यांचे काय होईल, हा प्रश्न विचारला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी पानसरेंना लिहिलेले पत्र, कोण होता शिवाजी, पुस्तकात प्रस्तावनेसारखे छापले आहे. न्यायमूर्ती म्हणतात- हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर आणि समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. न्या. सावंतांचे नाव कदाचित गायकवाडांना आठवत असेल. मराठा आरक्षण कशाप्रकारे देता येईल यावर न्या. सावंतांचे मार्गदर्शन अशोक व पृथ्वीराज चव्हाण तसेच फडणवीस सरकारांनाही उपयुक्त ठरले होते. जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर दिलेले आरक्षण टिकू शकले, हा न्या. सावंतांचा तर्कच खरा ठरलेला आहे. हिंदू शिवाजी विरुद्ध मुसलमान औरंगजेब अशा मांडणीच्या विरोधात पानसरेंचे पुस्तक आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी त्यांच्या विचाराच्या सोयीचे ऐतिहासिक लेखनाचेच संदर्भ वापरले आहेत, इतकाच आक्षेप फारतर कुणाला घेता येईल. पण गायकवाडांनी फक्त पुस्तकाचे शीर्षक वाचून संतापण्याचे कारण नव्हते. तितकेच वाचून ते चिडले आणि त्यांनी प्रकाशक मुलाला आई-बहिणीवरून शिवीगाळ करावी हेही समर्थनीय नव्हे. कॉ. गोविंद पानसरेंचाही खून झाला आहे. कोल्हापुरात त्यांना फेब्रुवारी २०२५मध्ये गोळ्या घातल्या गेल्या. त्याआधी दोन वर्षे पुण्यात नरेंद्र दाभोळकरांची हत्त्या अशाचप्रकारे गोळीबारात केली गेली. तीच पद्धत पानसरेंच्या बाबतीत होती. दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपी मोकाट आहे असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दाभोळकर प्रकरणात दोघांना जन्मठेपेची सजा झालेली आहे. पण पानसरेंचे खून प्रकरण अद्यापी शिक्षेपर्यंत गेले नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पहिजे. तिथे हिंसेला वाव असू नये, हेच खरे आहे.

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

गोष्ट तुकडा पडलेल्या एका सफरचंदाची!

सफरचंदाचा एक तुकडा कोणीतरी दातांनी चावून तोंडात टाकल्यावर उरलेले सफरचंद जसे दिसते ते आहे एपल कंपनीचे प्रतीकचिन्ह. एक ट्रिलियन डॉलर्स एव्हढी महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था झालेली नाही. तो टप्पा गाठणे हे सध्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे ध्येय्य आहे, प्रयत्न आहे. आणि...

बंगालमध्ये यावेळी भाजपाने घातली नाही ‘दीदी’ला साद!

येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही...

गडकरींनी राबवले! मोदींनी रेटले!!

आखाती देशात युद्ध पेटल्यापासून जगाची चिंता वाढली आहे. गॅस आणि पेट्रोल, डीझेल यांची टंचाई केवळ भारतातच नाही तर युद्ध पेटवणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही जाणवू लागलेली आहे. अमेरिकन पंप तसे कोरडे वगैरे पडलेले नाहीत, पण तिथेही डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेतच....
Skip to content