Homeमाय व्हॉईसपंतप्रधान, राष्ट्रपतींनाही उडवून...

पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही उडवून लावणाऱ्या ममतापर्वाचा अस्त!

सर्व देशाचे लक्ष पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे होते. स्ट्रीट फायटर म्हणून ओ‌‌ळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या ममता यांचा दारूण पराभव त्यांच्याच पूर्वीच्या निकटवर्तीय सहकारी असलेल्या सुवेंधू अधिकारी या भाजपाच्या उमेदवाराने केला. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले म्हणून भाजपाने देशभर मिठाई नि जिलेबी वाटून व फटाक्यांच्या माळा लावून विजयोत्सव साजरा केला. देशात गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भाजपाचे कमळ फुलले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या  मुख्यालयात अभिमानाने सांगितले. मोदी-शाह आणि भाजपाला सतत आव्हान देणाऱ्या ममता दीदींचा पऱाभव झाल्याने भाजपाचा एक मोठा विरोधक दूर झाला आहे, ममता यांच्या पराभवाने भाजपाविरोधी इंडिया आघाडीतील ताकदवान बुरूज ढासळला आहे.

भाजपाच्या महाप्रंचड ताकदीपुढे व जबरदस्त नियोजनापुढे ममता व त्यांच्या पक्षाचा निभाव लागला नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्या सुधारणा करताना ९१ लाख मतदार वगळले होते. २७ लाख मतदारांना अपात्र ठरवले होते. निवडणूक काळात केंद्रीय सुरक्षा दलाचे साडेतीन लाख पोलीस तैनात केले होते. प्रशासन व पोलीस दलातील पाचशेहून अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. इडी व निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा अहोरात्र कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेऊन होते. सर्व पातळीवर सर्व प्रकारची मुबलक रसद पक्षाला पुरवली गेली. जाहिराती आणि सोशल मीडियावरून तृणमूल काँग्रेसविरोधात दोन महिने प्रचाराचा धुमधडाका चालू होता. प्रचारात तृणमूल काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी करण्यात भाजपाने अचूक रणनिती राबवली.

बांगलादेशच्या सरहद्दीवर कुंपण घालण्यासाठी जागा संपादन करून बीएसएफकडे द्या, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे ममता यांनी दुर्लक्ष केलेच, पण त्यासाठी राज्याला आर्थिक दंड सोसावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राज्यात आल्या असताना, त्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून ममता गैरहजर राहिल्याच, पण त्यांचे स्वागत करायला विमानतळावरही गेल्या नव्हत्या. पंतप्रधानांनी निमंत्रित केलेल्या ऑनलाईन बैठकीलाही मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. पंतप्रधान राज्यात आले असताना राजशिष्टाचार म्हणून त्यांच्या स्वागताला ममता स्वत: गेल्या नाहीत तर त्यांनी एका मंत्र्याला पाठवले. राज्यात एसआयआर कार्यक्रम राबवला जात असताना त्यांनी अनेकदा अडथळे आणले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना कित्येक तास ओलीस ठेवले होते, तेव्हा त्या मूकपणे सर्व पाहत राहिल्या. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला कडाडून विरोध करून ते हाणून पाडण्यात तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. गेल्या दहा वर्षांत ममता आणि मोदी सरकार यांच्यात दरी वाढली होती. ममता यांच्या दृष्टीने भाजपा हा त्यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू होता. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत भाजपाला गेल्या बारा वर्षांत पाय रोवता आले नव्हते, ही मोदी-शाहंची मोठी खंत होती. म्हणूनच सर्व आघाड्यांवर जोर लावून भाजपाने निवडणूक लढवली व तृणमूल काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या गडाला सुरूंग लावला.

ममता यांच्या पंधरा वर्षांच्या सरकारला अँटी-इनकम्बन्सीचा सर्वात मोठा फटका बसला. २०२१मध्ये तृणमूल काँग्रसने राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरवले होते. पक्षाचा प्रत्येक उमेदवार म्हणजे मीच आहे असे समजून मतदान करा, असे आवाहन तेव्हा ममता यांनी केले होते. गेल्या निवडणुकीत मोदी-शाहंनी ओ दीदी.. किंवा ए ममता.. अशा शब्दांत टीका केल्याने ममता संतापल्या होत्या. त्यांनी बंगालमध्ये येऊन महिलेचा अवमान केला, असे भांडवल ममता यांनी केले होते. बंगाली अस्मिता व महिलेचा अपमान या मुद्यावर ममता यांना मोठी सहानुभूती मिळाली. यावेळी मात्र ममता यांना कोणी ओ दीदी.. किंवा ए ममता.. असे म्हणण्याची चूक केली नाही. बंगालचा विकास व महिलांची सुरक्षा यावर भाजपाने प्रचारात भऱ दिल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपाला मतदान झाले, हेच निकालानंतर स्पष्ट झाले.

राज्यात वाढलेली मुस्लिमांची लोकसंख्या, बांगलादेशातून सतत होणारी घुसखोरी यामुळे बंगाली लोक त्रस्त झाले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांना तिथे राहणे मुश्किल करतात, तेथील मंदिरांवर सतत हल्ले होतात म्हणून राज्यातील हिंदू जनतेत संताप आहे. राज्यात भाजपाची सत्ता आली तर सडेतोड उत्तर दिले जाईल व हल्लेखोरांना व घुसखोरांवर धाक वाटेल अशी हिंदूंमधे भावना आहे. याच भावनेतून हिंदू व्होट बँक भाजपाच्या पाठिशी उभी राहिली. प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतदार तृणमूल काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करीत होता. पूर्वी मुस्लिम मतदार कम्युनिस्टांना मते देत असत, नंतर तो समाज तृमणूलकडे सरकला. आता हाच मतदार काँग्रेसकडे वळला असल्याचे दिसून आले. मुस्लिम व महिला मतदार हीच ममता यांची मोठी पुंजी होती, त्यात यावेळी मोठे विभाजन झाले. त्याचा परिणाम तृणमूलच्या मतांवर झाला. ममता यांच्या कारकिर्दीत राज्यात लहानमोठे उद्योग आले नाहीत, उद्योग-व्यवसायात गुंतवणूक नाही. तरूण मुलांना रोजगार-नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. बंगालमधील तरूणांचे तांडे रोजगारासाठी दिल्ली, मुंबई, गुजरातकडे सतत जात आहे. तरूणांमध्ये नैराश्य आहे. दीदींच्या काळात सर्व पातळीवर भ्रष्टाचार वाढला. पंचवीस हजार शिक्षक भरती घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले, राज्याची देशभर बदनामी झाली. सरकारी शाळांची दयनीय स्थिती असल्याने हजारो मुलांना खाजगी शाळांत शिकावे लागत आहे.

राज्याची अवस्था निराशाजनक असताना ममता राष्ट्रीय नेता होण्याची का महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत? दिल्लीतून मोदी सरकारला आपल्याला हटवायचे आहे अशा घोषणा त्यांनी प्रचारात दिल्या, त्याचे त्यांच्यावरच बूमरँग झाले. राज्यात भाजपा सत्तेवर आली तर लोकांना मासे, मांस, अंडी खायला मिळणार नाहीत, असा ममता यांनी प्रचार केला. त्याला उत्तर म्हूणून भाजपाच्या नेत्यांनी मासे व भात खाण्याचे प्रदर्शन केले. ममता यांचा पराभव झाल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांना मासे भाताचे जेवण दिले गेले. ममता या कॉलेजच्या विद्यार्थिनी असतानापासून युवक काँग्रेसची लढाऊ कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर आंदोलन करीत. आणिबाणी उठल्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण कोलकाता येथे आले तेव्हा त्यांची गाडी अडवून मोटारीच्या बोनेटवर चढून ममतांनी घोषणा दिल्या होत्या. जनता पक्षाचे सरकार असताना पंतप्रधान मोरारजी देसाई कोलकत्यात आले तेव्हा त्यांच्या गाडीसमोर जाऊन काळे झेंडे फडकवले होते. १९८४मध्ये मार्क्सवादी पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा जाधवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव करून जाएंट किलर म्हणून त्यांनी सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. काँग्रेसचे नेते कम्युनिस्टांविरोधात लढत नाहीत म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अनेकदा तक्रारी केल्या. १९९०च्या दशकात त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. काँग्रेस व कम्युनिस्ट नको म्हणून तेव्हा वाजपेयी-अडवाणी यांच्या भाजपाशी त्यांनी जवळीक साधली. वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये त्या दोन वेळा केंद्रात मंत्री होत्या. स्वत: वाजपेयी कोलकाता येथे आले असताना त्यांनी ममता यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. बंगालमध्ये डाव्यांशी लढताना व मुस्लिम व्होट बँक संभाळताना अडचण नको म्हणून त्यांनी नंतर भाजपाशी साथ सोडली. २०११मध्ये बंगालमधील ३४ वर्षांची डाव्यांची सत्ता त्यांनी उलथवून टाकून इतिहास घडवला व तेव्हापासून त्या मुख्यमंत्री झाल्या. ममता यांनी तीस वर्षांपूर्वी भाजपाला कोलकात्यात प्रवेश मिळवून दिला, त्याच भाजपाने त्यांची सत्ता २०२६मध्ये उलथवून टाकली.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्रातच मराठी माणूस हतबल…

 एक मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा ६७वा वर्धापनदिन महाराष्ट्रात सर्वत्र साजरा झाला. लोकभवनात तर महाराष्ट्रदिनाबरोबर गुजरातदिनही साजरा झाला. मुंबई महाराष्ट्राला कदापि मिळता कामा नये म्हणून ज्या गुजरातने प्रयत्न केले त्या राज्याचाही महाराष्ट्राने आपल्या जन्मदिनाला सरकारी पातळीवर सन्मान केला. महाराष्ट्र मनाने...

‘ऑपरेशन लोटस’ हा भाजपाचा छंद!

देशात विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात 'ऑपरेशन लोटस', मोहीम राबविणे हा भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) छंद आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातही ऑपरेशन लोटस राबवून विरोधी पक्ष खिळखिळा करणे हासुद्धा या पक्षाचा अजेंडा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची तोडफोड करणे, विरोधी...

अपात्र लाडक्या बहिणींकडची वसुली होणार तरी किती?

महिला व्होट बँक डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील महायुती सरकारने २०२४मध्ये महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू केली. दरमहा पंधराशे रूपये थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींची या योजनेत नावनोंदणीसाठी सर्वत्र झुंबड उडाली. अर्ज केला की पैसे मिळणार, असा समज...
Skip to content