Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी रिक्षा रांगेत उभ्या करून रस्ता अडवलेलाआहे. संतापाची बाब म्हणजे या बश्या रिक्षांपैकी अनेक रिक्षा एकतर कंडम झालेल्या तरी आहेत किंवा वर्षभरात त्यांना रस्ताच दाखवलेला नाही, अशा अवस्थेत आहेत. आपला परिसर कसा ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे रात्री-अपरात्री परिसराला भेट देत असत याची आठवण काही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी करून दिली. पोलीस हवालदार वा वाहतूक पोलीस काही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा परिसरातील स्वघोषित भाईमंडळी टारगट पोरांना हाताशी धरून ‘बवाल’ निर्माण करतात अशी तक्रारही काहींनी केली. महापौर शर्मिलाताईंनी या परिसराला भेट देऊन (न कळवता) परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

अलीकडेच ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकारांच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथराव म्हणाले होते की, पत्रकारांनी थंड वातावरणातून आता बाहेर पडून थोडे ‘गरम’ झाले पाहिजे. म्हणजेच आता पालिका कारभारावर टीका करणारेही काहीतरी सडेतोड लिहा. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा सरळ अर्थ कारभारावर टीका करा, असाच होतो. ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करायलाही हजार गोष्टी सहजी सापडतील. त्याही अगदी मुख्यालयाच्या इमारतीपासूनच! इमारत परिसराचे सोडा. पण इमारतीच्या आतही सर्वत्र धूळच

दिसते. बेसमेंटमध्ये तर आरामात ५० घमेली धूळ केव्हाही मिळू शकते. पत्रकार कक्षाशेजारील प्रसाधनगृहातील नळच कुणीतरी काढून घेऊन गेलेले आहेत. इमारत परिसरातील रस्ते व पदपथही म्हणावे तसे नाहीत. समतल हा शब्द महापालिका अभियंत्यांना जणू माहीतच नसावा, इतके शहरातील रस्ते उंचसखल आहेत. उदाहरण म्हणून गावदेवी व गोखले रस्ता परिसरातील रस्त्याचे घेता येईल. मी पैज लावायला तयार आहे की, या दोन्हीपैकी किमान दोन फूट रस्ता खड्ड्याविना दाखवावा व माझ्याकडून २०० रुपये घेऊन जावेत. (गरीब श्रमिक पत्रकार इतकेच देऊ शकतो.) पदपथाची अवस्था तर शहरभर दुर्दशा या शब्दानेच व्यक्त करावी लागेल.

माजी मुख्यमंत्री व आजी उपमुख्यमंत्र्यांच्या वागळे इस्टेट, किसन नगर वा विस्तारित सावरकर नगरातील अवस्था तर अधिक बिकट आहे. विस्तारित सावरकर नागराच्या आधी असलेल्या लोकमान्य नगरात तर पार्किंग केलेल्या गाड्या व बाईक्स पायी नागरिकांचे चालणे मुश्किल झाले आहे. कंडम झालेल्या रिक्षाही अनेकांनी दुर्मिळ वस्तू सांभाळाव्या तशा बाळगल्या आहेत. वानगीदाखल वर उल्लेख केलेले दोनच भाग व त्यातील ही काही अंश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्यथा कोपरीपासून ते वाघबीळपर्यंत तसेच बाळकूमपासून वर्तकनगरपर्यंतचे अनेक भाग असे काढून दाखवता येतील की, जणू काही महापालिका प्रशासनाचे अस्तित्त्वच नाही. बाळकूममधील अशोकनगर भागात तर केव्हाही जा तुमचे स्वागत कचऱ्याच्या ढिगानेच होईल. घोडबंदर रोडवरील शेकडो इमारतीत नियमित पाणीपुरवठाच होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारींचा पाढा तरी वाचू किती? घशाला कोरड पडेल…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

पूर्णेकरांवर झाडलेल्या गोळ्या पप्याच्या ‘घोड्या’तूनच!

प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या 'घोड्या'तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे. "थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू...

ठाण्यात पोलिसांसमोरच तुडवले जाते तर नेते पाहतही नाहीत सूर्योदय!

एखादी ओटीटीवरील सिरीज पाहतोय असं तर वाटतं नाही? मलाही प्रथम असच वाटत होतं. पण ठाणे शहरात घटनाच अशा घडत आहेत की ओटीटी निर्मात्यांनीही तोंडात बोटे घालावीत! कालच्या गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे पोलिसांचे जणू ग्रहच बदललेत असं वाटतं. शुक्रवार-शनिवार गणपती विसर्जनात...

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...
Skip to content