येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते घेत जागांचे द्विशतक पार केले होते. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाने ४५ टक्क्यांपर्यंत मजल मारली होती. आधीच्या जागा टिकवून नव्याने किमान सत्तर जागा मिळवण्याचे मोठे आव्हान घेऊन देशाचे गृहमंत्री व भाजपाचे निवडणूक रणनीतीकार “चाणक्य” अमित शाह पंधरा दिवस बंगालमध्येच तळ ठोकून आहेत. किमान १५० मतदारसंघांमध्ये अधिकची अडीच ते तीन हजार मते कशी मिळवता येतील याचे अतिशय बारकाईने नियोजन करून भाजपा कामाला लागली आहे.

बंगालमधील थेट आलेली माहिती असे सांगते की, निवडणुका जाहीर होण्याआधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किमान दहा हजार कार्यकर्ते बंगालमध्ये गावोगावी फिरत होते. लहानलहान अशा एक लाख सभा त्यांनी घेतल्यादेखील. बंगालचे जे चार भौगोलिक विभाग पडतात त्या प्रत्येकासाठी एक ज्येष्ठ मंत्री व एक संघटनमंत्री भाजपाने नियुक्त केला असून त्यांच्या अधिपत्त्याखाली सूक्ष्म नियोजन व अंमलबजावणीचे काम सुरु आहे. २०२१ला भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात थेट प्रचाराची राळ उठवली होती. “दीदी ओ दीदी” असा पुकारा मोदी प्रत्येक सभेत करत होते. तर “पिशी जाओ” म्हणजे आत्याबाई आता निघा, ही रणगर्जना होती. पण त्याचा थोडा उलटाच परिणाम होऊन ममतांवरचा हल्ला थेट बंगाली अस्मितेवरील हल्ल्याशी जोडला गेला. त्याचवेळी भाजपाच्या आक्रमतकेमुळे अल्पसंख्यांक मतांचे धृवीकरण तृणमूलच्या बाजूने झाले. अनेक मतदारसंघांत वाढून चाळीशीपार गेलेला मताचा टक्काही भाजपाचा विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही.

२०२६च्या निवडणुकीत मात्र भाजपाने ममतांवर हल्ला करणे टाळले आहे. मुस्लीम पक्षाला निवडणुका लढवून ममतांना पाडण्यासाठी मोठा पैसा भाजपाने दिला हा आरोप करणारा व्हडिओ चांगलाच व्हायरल झाला. पण भाजपाने त्यावर तीव्र प्रतिक्रिया देणे जाणीवपूर्वक टाळले. यावेळी, ममतांच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे, सरकारी योजनांचे पुरेसे लाभ लोकांना न मिळणे आणि हिंदुत्वाच्या नावे आक्रमक प्रचार न करणे असे पथ्य भाजपाने बाळगले आहे. सहाजिकच अतिशय आक्रमक प्रचार करणाऱ्या ममतांनाही रणनीती बदलून अलिकडच्या तीन आठवड्यात बचावात्मक प्रचार करावा लागत आहे, हे भाजपाच्या मोहिमेचे यशच मानावे लागेल. गेल्या निवडणुकीत भाजपाने चाळीस जागा दहा हजारांपेक्षा कमी मताधिक्याने गमावल्या तर वीस जागांमध्ये विजेत्यांनी भाजपा उमेदवारापेक्षा पाच हजारांहून कमी मते घेतली होती. पाठोपाठ आलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने यातील थोड्या जागा परत मिळवल्या. दरम्यान अमित शाहांचे खास विश्वासू सुनील बन्सल यांच्याकडे बंगालचे पक्षप्रभारी म्हणून जबाबादरी सोपवली गेली. त्यांच्या जोडीने अनुभवी संसदपटू सी. पी. जोशी, महेश शर्मा, संजय भाटिया आहेत. यंदाच्या निवडणुकीत तिकीटे देतानाही भाजपाने रणनीती बदलली. बाहेरून आलेल्या आणि चमकदार चंदेरी चेहऱ्यांपेक्षा जो उमेदवार प्रत्येक बूथवर दोनशे ते तीनशे मते घेऊ शकतो अशांनाच प्राधान्य दिले गेले.

बंगालमध्ये बहुसंख्य मतदारसंघांत पंधराशे ते दोन हजार मतांच्या फरकाने विजयाचे भवितव्य ठरते. प्रत्येक मतदारसंघात सुमारे अडीचशे ते तीनशे बूथ असतात. प्रत्येक बूथवर पंधरा ते वीस मते अधिकची मिळवा हा शाहांचा कानमंत्र आहे. भाजपाची पन्नाप्रमुख रचना बंगालमध्ये व्यवस्थित राबवली गेली आहे. प्रत्येक पन्नाप्रमुख कार्यकर्ता पन्नास ते साठ मतदारांची जबाबदारी घेत असतो. या प्रत्येकाला वारंवार भेटणे, परिचय वाढवणे, त्यातील जे भाजपाला मते देतात त्यांना योग्य माहिती संदेश पोचवणे आणि जे मतदार नव्याने जोडायचे आहेत, त्यांना भेटत राहणे, मते वळवणे ही जबाबदारी या पन्नाप्रमुखांनी सांभाळलेली असते. प्रत्येक बूथवर फक्त पंधरा ते वीस अधिकची मते मिळवा हा अमित शाहांचा संदेश आहे. तसे झाले तरी प्रत्येक मतदारसंघांत एकंदर मते तीन हजारांपर्यंत वाढतात, हा यातील लक्षणीय मुद्दा आहे. अर्थात हे वाटते तितके सोपे नाहीच. ममता बॅनर्जी या फायटर राजकारणी आहेत. तृणमूल काँग्रेसचीही प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट आहे. म्हणून तर स्थानिक नेत्यांच्या मदतीला भाजपाने अन्य राज्यांतील खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आदींना प्रचारात जुंपले असून लहानलहान गावांत, वस्त्यांपर्यंत भाजपाचा संदेश नेण्याचा प्रयत्न आहे. त्यातच हरलेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या टोकाच्या प्रचाराचीही धार भाजपाने जोडली आहे. भाजपाच्या सूक्ष्म नियोजनानुसार शंभर ते एकशेवीस जागा नक्की जिंकंता येतील आणि ८० ते शंभर लढतीत आणता येतील अशा जागांवर मोहीम तीव्र चालवली आहे. राज्यभरात तीन ते चार टक्के मतदान भाजपाकडे अधिकचे वळले तर १५० जागांचे लक्ष्य साधता येईल. त्यात ते कितपत यशस्वी झाले हे मात्र ४ मे रोजी निकालानंतरच समजेल!
(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

