राष्ट्रवादी, या मासिकाच्या ताज्या अंकात संपादकीय लेख आला. त्यातून अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यात जुंपली आहे. “अजितदादांवर दबाव होता, कटकारस्थानाने झाली, म्हणूनच त्यांना शरद पवारांची साथ सोडावी लागली आणि मग ती “चूक सुधारण्याचा” प्रयत्न अजितदादा अलिकडे करत होते. पण दुर्दैवाने त्याबाबतचा निर्णय़ घेण्याआधीच काळाने झडप घातली…” असा दावा रा.काँ.श.प. पक्षाचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकाच्या संपादकियात केला आहे. दादा बाहेर पडले हे शरद पवार पक्षाच्या दृष्टीने चुकीचे पाऊल असू शकते. पण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने ती अजिबात चूक नव्हती! असेच आणखी दावे रोहित पवारांनी पुन्हा केले आहेत. सध्या त्यांनी अजितदादांच्या मृत्यूचे पुरेसे राजकीय भांडवल करण्याचा चंगच बांधलेला दिसतोय. दररोज नव्या पद्धतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते, “अपघात नव्हता, घातपात होता” यावर काथ्याकूट करत आहेत. पण अलीकडच्या पत्रकार परिषदेतून त्यांची खरी मळमळ बाहेर पडली.
काकी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने काही मंडळी निराश नक्कीच झालेली आहेत. शिवाय राहुलसारख्यांचे मंत्रीपदावर चढण्याचे स्वप्नही त्यातून भंगलेले दिसते. “दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीन व्हावेत असा प्रयत्न दादा करतात, म्हणूनच की काय कोणी त्यांच्या जिवावर उठले होते का…” अशी भयंकर, केवळ शंका नव्हे तर समाजमनात विष कालवण्याची मोहीम रोहित पवारांनी हाती घेतलेली दिसते. त्यांनी असाही तर्क मांडला आहे की, पुणे जिल्ह्यातील शिवनेरी परिसरातील रा.काँ.श.प. पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना दादा एकत्रित पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करणार होते. “दादा करणार होते” असे म्हणताना रोहित, शरद पवारांच्या मतांना एकत्रित पक्षात काहीच किंमत नसेल असे सूचित करतात! पण ही बाब त्यंच्या ध्यानीही आलेली नाही. शिवाय अमोल कोल्हेंमध्ये इतके मोठे नेतृत्त्वगुण होते तर मग जयंत पाटलांनंतर कोल्हेंनाच प्रांताध्यक्ष करण्याचा आग्रह रोहित यांनी का बरे धरला नसेल? की त्यांच्या आग्रहाला रा.काँ.श.प. श्रेष्ठींनी कवडीची किंमत दिली नव्हती?

“दोन्ही रा.काँ.चे एकत्रिकरण केल्यानंतर दादांना विरोधात बसण्याची इच्छा होती…” असेही एक तर्कट रोहित मांडतात. ते तर निव्वळ हास्यास्पद ठरते. काँग्रेस शिवेसनेच्या मविआपासून फारकत घेऊन भाजपासोबत युती आघाडी करा, हाच आग्रह अजितदादा व त्यांचे सारे सहकारी शरद पवारांकडे धरत होते. पवारसाहेबांना ते अजिबात मान्य होत नव्हते. म्हणूनच तर पक्ष तुटला होता ना! पण या महत्त्वाच्या सत्याकडे लबाड लोक आता दुर्लक्ष करत आहेत. खरेतर महायुतीसोबत जाण्यासाठीच अनेकदा थोरल्या पवारांच्या सल्ल्याने दादा, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आदि नेते अहमदाबादला व दिल्लीला जाऊन अमित शाहांना भेटले. त्यांनी भाजपा नेत्यांबरोबर चर्चा केल्या. अजितदादांनी स्वतःच अनेकादा या बाबी सांगितल्या. २०१४ ते २०२३ या कालावधीत किमान तीन वेळा तसे प्रयत्न झाले. शेवटचा प्रयत्न म्हणजे, २३ नोव्हेंबर २०१९ रोजी, फडणवीस व अजितदादांचा तो विख्यात पहाटेचा (खरेतर सकाळी सात-साडेसात वाजताचा) शपथविधी राजभवनात पार पडला. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून “पुन्हा परतले” होते. पण विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी फडणवीस-दादांचे ते औटघटकेचे सरकार कोसळले. तेव्हापासून दादा नाखुषीनेच शरद पवारांसोबत परतले होते.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसच्या विरोधात लढून भाजपा हाच विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. तेव्हा भाजपा सरकारला बाहेरून समर्थन देण्याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला होता. त्यानंतर २०१६ असेल, २०१७ असेल ते अगदी २०१९चा सकाळचा शपथविधी असेल, त्यावेळेलादेखील अजित पवारांची भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन दोन पक्षांचे स्थिर सरकार बनवावे, अशा प्रकारची होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठनमध्ये २ मे २०२३ रोजी राष्ट्रवादीच्या भवितव्याचा विचार करण्यासाठीच सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदींचा मोठा मेळावा झाला. तिथे महायुतीसोबत जायला हवे, या अजितदादांच्या मताच्या बाजूने कार्यकर्त्यांचा कौल येत असताना, अचानक थोरल्या पवारांनी, “मीच पक्षाचा राजीनामा देतो”, अशी घोषणा केली आणि सारा पक्ष स्वतःभोवती गोळा केला. त्यानंतर अजित पवारांनाच व्हीलन ठरवण्याची पावले राष्ट्रवादीच्या तेंव्हाच्या सर्व धुरीण नेत्यांनी टाकली. अजितदादा पवारांची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर एक चुकीची प्रतिमाही तयार केली जात होती. त्यांची एक इमेज तयार करण्यात आली, हे कुठल्या प्रकारचे षडयंत्र त्यावेळेला त्या पक्षामध्ये होते? नंतर लगेचच २०२३च्या जुलै महिन्यात २ तारखेला अजित पवारांनी अंतिम निर्णय़ घेतला. या वेळेस दादांसमवेत राष्ट्रवादीचे चाळीस आमदारही बाहेर पडले आणि इतिहास घडला.

दादांच्या पक्षालाच राष्ट्रवादी हे नाव, गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले. शरद पवारांकडे, “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” हे पक्ष नाव व “तुतारी फुंकणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह आले. पण त्यांच्याकडचे आमदार खासदार खूष नव्हते. त्यांना अजितदादांबरोबर सत्तेत जाण्याचीच ओढ होती. दादांच्या पक्षाची शेपटी पकडून जयंत पाटील शशिकांत शिंदेसह सारे आमदार, खासदार महायुतीच्या सत्तेत जाण्यासाठी उतावीळ होते. पण बारामतीत २८ जानेवारीच्या सकाळी जो भीषण विमान अपघात घडला त्यातून या साऱ्या राजकीय हालचाली बंद पडल्या. त्यांना वेगळे वळण लागले. सुनेत्रा वहिनींनी तातडीने दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व स्वीकारले. त्या लगोलग उपमुख्यमंत्रीही बनल्या. त्यातून शरद पवारांबरोबरचे काही घटक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. थोरल्या पवारांची तब्ब्येतही तितकीशी ठीक नाही. त्यामुळेही पुढच्या निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांना त्यांचा सोईचा मार्ग शोधणे भाग आहे. शरद पवारांच्या बहुतेक सर्व जुन्याजाणत्या समर्थकांना तो मार्ग म्हणजे अजितदादांबरोबर सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात या विचाराला बळकटी आली. दादांचा अग्निसंस्कार व्हायच्याआधीच शरद पवार गटाच्या नेत्यांनी २८ तारखेला रात्रीच मुलाखती द्यायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र या दुःखातून अजूनही डुबलेलाच होता आणि यांनी विलिनीकरणाची आवई उठवून दिली. स्वतः शरद पवारांनी त्या प्रकाराला खतपाणी घातले. १५ जानेवारी रोजीच बारामतीत स्वतः अजित पवारांनी रा.काँ.श.प.च्या नेत्यांना विलिनीकरणाचा शब्द दिला असा व्हिडिओही पवार साहेबांनी जारी केला. जयंत पाटील म्हणाले की, माझ्याची ११ वेळा दादांनी विलिनीकरणाच्या चर्चा केल्या. पण इतका मोठा निर्य़ण दादा आपल्या मंत्रिमडंळातील ज्येष्ठ सहकारी हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदिंना डावलून, पटेल-तटकरेंनाही पत्ता न लागू देता घेऊ शकतील यावरच कुणाचा विश्वास नाही. आता दोन्ही बाजूंनी सांगण्यात येत आहे की, विलिनीकरणाच्या चर्चा सध्या नाहीत. जयंत पाटील यांनी तर हा विषय संपल्याचेच जाहीर केले आहे. त्यानंतर तो पुन्हा चर्चेला येणार नाही, असे नाही. म्हणजेच हा विषय संपलेला नाही. केवळ थबकलेला आहे इतकेच!
(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

