जगातल्या तेलसाठ्यांवर आपले वर्चस्व निर्माण करत जगभरात मी सांगेन ती पूर्व दिशा.. अशा थाटात वावरण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वप्न धुळीस मिळाले आहे. इराणवर आपल्या लष्करी सामर्थ्याचा प्रहार करत तिथली खलिफा राजवट उलथवून तिथे आपल्या इशाऱ्यावर नाचणारे कठपुतली सरकार स्थापन करण्याच्या ट्रम्प यांचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याचे चित्र काल समोर आले आहे. इराणमधल्या जनतेला वारंवार आवाहन करूनदेखील तिथल्या जनतेने इराणमध्ये इस्लामिक शासनाविरोधात भूमिका न घेतल्याने हताश झालेल्या ट्रम्प यांनी इराणवर अधिक तीव्र हल्ले केले जातील, अशी घोषणा काल रात्री उशिरा एका पत्रकार परिषदेत केली. लगोलग १२ आखाती देशातल्या अमेरिकी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांतल्या लष्करी तळांवर तसेच दूतावासांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चालूच ठेवले आहेत.
इराण तसेच आखाती देशांतल्या तेलावर आपले नियंत्रण असावे, आपण सांगू त्या देशाला, आपण सांगू त्या किंमतीत त्यांनी तेल विकावे, असा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून सुरू आहे. याच प्रयत्नात त्यांनी काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तिथले राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकेत बंदी बनवले. या भागात चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यापाराचे प्रमुख असल्याचा आरोप करत अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून अमेरिकेत नेले. तेथे त्यांच्यावर खटला दाखल केला जाणार आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी तेथील विरोधी नेत्यांना हाताशी धरून तेथे आपल्याला हवे तसे कठपुतली सरकार बसवले आहे. सध्या तेथे कायद्याने मादुरो हेच अध्यक्ष असले तरी हंगामी अध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज कारभार पाहत आहेत. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेलावर अवलंबून आहे. या तेलावर नियंत्रण मिळवत गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अनेक देशांना व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची गळ घालत आहेत. यासाठी त्यांच्यावरील अमेरिकेचे टॅरिफ कमी करण्याची लालूचही अमेरिकेने दाखवली आहे. रशियाकडून भारताने कच्चे तेल विकत न घेता ते व्हेनेझुएलामधून खरेदी करावे असा प्रयत्नही अमेरिकेने भारताबरोबर व्यापारी करार करण्याच्या चर्चेत केला होता.

व्हेनेझुएलाची राजवट उलथवत तेथे आपल्या मर्जीतले सरकार बसवल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून इराणविरोधात असलेली खदखद व्यक्त करत ट्रम्प यांनी इराणकडे मोर्चा वळवला. इराणमध्ये ४७ वर्षांपूर्वी आयातुल्लाह खोमेनींच्या नेतृत्त्वाखाली इस्लामिक राजवट सत्तेवर आली. तेव्हापासून आजपर्यंत हीच राजवट कायम आहे. या राजवटीत महिलांवर अनेक निर्बंध आहेत. त्याचप्रमाणे इस्लामच्या विरोधात वागण्याचे स्वातंत्र्य नाही. याचा परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जेन झी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा वर्गाने संपूर्ण इराणमध्ये उग्र निदर्शने चालू केली होती. या निदर्शनांना ठेचण्यासाठी तिथल्या खामेनेई सरकारनेही अनेक प्रमुख आंदोलकांना इस्लामिक कायद्यानुसार भरचौकात फासावर लटकवले. या निदर्शनात शेकडो युवा मारले गेले. या निदर्शनांना अमेरिकेचे खुले समर्थन होते. तुम्ही सध्याच्या खामेनेई सरकारला खाली खेचा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे ट्रम्प जाहीरपणे सांगत होते. हीच वेळ आहे, तिथल्या सरकारला खाली खेचण्याची हे गृहित धरून अमेरिकेने इस्त्रायलला मदतीला घेत २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. इराण अण्वस्त्र विकसित करत असल्याचा दावा करत त्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करावी लागली, असे अमेरिकेने म्हटले आहे. पण आज चौथ्या दिवशीही इराणकडून अमेरिका व त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे.

खामेनेई तसेच इराणमधल्या जवळजवळ ४८ प्रमुख नेत्यांच्या मृत्यूनंतर इराणची जनता रस्त्यावर आली. अमेरिका तसेच इस्त्रायलला ही जनता आपल्याला साथ देईल, अशी अपेक्षा होती. परंतु या जनतेने त्यांच्याविरोधातच पवित्रा घेतला. खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल मातम करतानाच त्यांनी खामेनेई यांच्या हत्त्येचा बदला घेण्याच्या शपथा घेतल्या. इस्त्रायलकडून इराणचा सरकारी मीडिया हॅक करून त्यावरून इस्त्रायलचे प्रमुख बेंजामीन नेतन्याहू यांचे इराणी जनतेला सरकारविरोधात रस्त्यावर येण्याचे व्हिडिओद्वारे आवाहनही करण्यात आले. ट्रम्प यांनी दोन वेळा तर नेतन्याहू यांनी तीन वेळा इराणी जनतेला सत्ता उलथवण्याचे आवाहन केले. पण त्यांना यश आले नाही. याऊलट इराणच्या सध्याच्या सरकारनेच खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल ४० दिवसांचा दुखवटा जाहीर केला आणि अमेरिका व इस्त्रायलला आव्हान दिले. सध्या आयातुल्लाह अलीरेझा अराफी यांनी हंगामी प्रमुख म्हणून इराणची सूत्रे स्वीकारली आहेत. खामेनेई यांची लढाई पुढे लढली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
कालपासून इराणने अरब देशांतल्या अमेरिकेच्या तळावरचे हल्ले वाढवले आहेत. अमेरिकेने कुवैत तसेच सौदी अरेबियामधले आपले दूतावास बंद केले आहेत. द. कोरियामधल्या आपल्या तळावरील पेट्रिएट, थाड ही क्षेपणास्त्रे, रिपल ड्रोन अन्यत्र हलवायला सुरूवात केली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांना अमेरिकेला दीर्घकालीन युद्धात ढकलायचे नाही. दरम्यान, आखातातल्या या युद्धात अमेरिकेच्या बाजूने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन या देशांपैकी ब्रिटनने आपण इराणपासून फक्त बचावासाठी हल्ला करू. स्वतःहून त्यांच्यावर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले आहे. फ्रान्सनेही अमेरिकेला आपला लष्करी तळ मर्यादित कारणांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. स्पेनने अमेरिकेला आपला लष्करी तळ वापरण्यास परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानमध्येही अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. काल कराचीत जमावाने अमेरिकेच्या दूतावासावर दगडफेक केली, आग लावली. आज तसाच प्रकार लाहोरमधल्या अमेरिकेच्या दूतावासाबाबत झाला. एकीकडे अफगाणिस्तान तसेच पख्तुनी सैन्याकडून होत असलेल्या हल्ल्याला सामोरे जाताना पाकला गृहकलहालाही तोंड द्यावे लागत आहे.

