तुम्हालाही माहित्येय आज मराठी व हिंदी चित्रपट, मालिका, रियॅलिटी शो, वेबसिरीज, ओटीटी, जाहिराती, इव्हेंटस इतकेच नव्हे तर अगदी सोशल मीडियातील “रिल स्टार” यातून सतत इतके आणि असे जुने आणि नवीन चेहरे समोर येताहेत की, त्यातील ओळखीचे चेहरे नावासह माहीत असतात. पण साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी म्हणा अथवा अगदी आताआता म्हणा पण समोर येत असलेल्या चेहऱ्याचे नाव काय बरे हेच माहीत होत नाही, तोपर्यंत आणखी एक रिल स्टार इन्स्टाग्रामवर दिसतो… कलाकार म्हणा, सेलिब्रिटीज म्हणा, काही म्हणा आज जर खरंच स्वतःला सिद्ध करायचं असेल तर “काहीतरी वेगळं करा.” आजुबाजूच्या गर्दीत दिसून याल. नावही अधिक फोकसमध्ये येईल. संस्कृती बालगुडे अगदी अशीच ठळकपणे दिसून येतेय.
तिला मी सर्वप्रथम वरळी सी फेसवरील एका तारांकित स्पाॅटवर सतीश राजवाडे दिग्दर्शित “सांगतो ऐका” या चित्रपटाच्या भरदुपारच्या इव्हेंटसमध्ये पहिल्यांदा पाहिलं. सचिन पिळगावकर या चित्रपटात नायक होते. तो इव्हेंट सलमान खानच्या ग्लॅमरमुळे चर्चेत राहिला. या चित्रपटातील तिचे भन्नाट नृत्य पाहून इम्प्रेस झालो होतो. त्यानंतर तिची भूमिका असलेल्या शाॅर्ट कट, निवडुंग, एफयू मैत्री अनलिमिटेड, भय, सर्व लाईन व्यस्त आहेत, चौक इत्यादी चित्रपटांच्या इव्हेंटसमध्ये तिची औपचारिक भेट होई. तिचे काही चित्रपट पाहून होत. डिजिटल युगात मराठीत “एका वर्षात शंभर वा जास्त मराठी चित्रपट” यात काहीच आश्चर्याचे राहिलेले नाही. (अपवाद कोरोना काळ) आणि यात नवीन चेहरेही अनेक आले वा येताहेत. त्यात टिच्चून टिकून राहण्यात ज्यांना यश प्राप्त झाले त्यात संस्कृती बालगुडे नक्कीच आहे.

तिचं वेगळेपण कशात? तर तिची भूमिका असलेला “करेज” हा इंग्रजी चित्रपट थेट न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डच्या (क्वार्टर फायनलिस्ट)मध्ये पोहोचला आहे. बरं तिने इंग्रजी भाषेतील चित्रपटात भूमिका साकारत ही झेप घेतली आहे आणि या चित्रपटाचा अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग असतानाच तिच्या वागण्या/बोलण्यात सहजता आणि अधिकाधिक आत्मविश्वास आला असल्याचे मध्यंतरी तिच्या मुलाखतीची संधी मिळाली असता जाणवलं. मला ते जास्त कौतुकास्पद वाटते. आतापर्यंत आपण मराठी मनोरंजन विश्वातील एखादे नामांकन मिळाले नाही अथवा नामांकन मिळूनही पुरस्कार प्राप्त झाला नाही म्हणून खट्टू होत होतो ते किती चुकीचे होते हे या “करेज” चित्रपटाच्या निमित्ताने जाणवले असे ती म्हणाली. ही तिची परिपक्वता खूप खूप महत्त्वाची वाटते. असा सकारात्मक परिणाम इतरही मराठी सेलिब्रिटीजमध्ये असतोच. पण असा दिसायला हवा. संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ या पहिल्यावहिल्या इंग्रजी सिनेमाचे वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये खास स्क्रिनिंग पार पडलं होतं. चित्रपट महोत्सव आपल्या मुंबईतील असो, राज्यातील असो किंवा जगभरातील कोणत्याही देशातील असो, त्यात आपली भूमिका असलेला मराठी चित्रपटही सहभागी झाला तरी होणारा आनंद भन्नाट असतो. अशा चित्रपट महोत्सवातील पुरस्कार म्हणजे केवळ आपल्या सुशोभित कपाटात आणखी एक बाहुली आली असा नसतो तर असा “मानाचा पुरस्कार” त्या सेलिब्रिटीजचा आत्मविश्वास वाढवतो आणि कळतनकळतपणे इतरांवर मात केल्याचा आनंदही देतो.
“करेज” या चित्रपटाचे विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झालं असून आता हा चित्रपट न्यूयॉर्क इंटरनॅशनलमध्ये पोहोचला आहे. अमेरिकेत ‘करेज’चे सँटो डोम्निगो फिल्म फेस्टिवल स्क्रिनिंग पार पडले होते. त्यानंतर ‘वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ’मध्येदेखील त्याचा शो झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, वाॅर्नर ब्रदर्स स्टुडिओत चित्रपटाचा शो होणारी संस्कृती बालगुडे पहिली मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. याबद्दल संस्कृती सांगते “२०२३मध्ये चित्रिकरण झालेला “करेज” हा माझा पहिला इंग्रजी चित्रपट होता. नंतर पुढे २०२४-२०२५मध्ये या चित्रपटाचा अनेक चित्रपट महोत्सवात सहभाग होता. अशा पद्धतीने परदेशात जाऊन भारतीय सिनेमाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली. २०२६मध्ये स्वतःचा संभवामि युगे युगे हा डान्स ड्रामा सुरू केला आणि आज “करेज” चित्रपट पुन्हा एकदा नव्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे, याचा खूप अभिमान आहे. जागतिक स्तरावर आपण अभिनेत्री म्हणून ओळखलं जावं ही इच्छा होती आणि ती “करेज”मुळे पूर्ण झाली याचा आनंद तर आहे, पण या गोष्टीचं दडपणसुद्धा तितकंच आहे. २०२६ची सुरुवात एवढी सुंदर झाली आणि अजून येणाऱ्या काळात काय नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतील यासाठी मी उत्सुक आहे.”

संस्कृती बालगुडेच्या या बोलण्यात आत्मविश्वास आणि संयम आहे. आजच्या ग्लोबल युगात कलाकाराने असाच वैश्विक पातळीवर विचार करायला हवा. हे संस्कृती बालगुडेचे वेगळेपण आहे. मराठी कलाकार अशी मोठी झेप घेतो तेव्हा त्याचं नेहमीच कौतुक असते. “करेज” चित्रपटात संस्कृती साकारत असलेल्या भूमिकेचं नाव राणी असे असून तिच्यासह अभिनेता शरीब हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. त्याने या चित्रपटात ‘जयदीप’ ही भूमिका साकारली आहे. अंकुर काकतकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘करेज’चे दिग्दर्शन केलं आहे. त्यालाही दाद द्यायला हवी. आजचे काही महाराष्ट्रीय दिग्दर्शक असा वेगळा विचार करताहेत. आज मराठी चित्रपटातही नवीन पिढीतील पटकथालेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ काही वेगळे करु इच्छिताहेत. प्रबोधन आणि मनोरंजन यांचा उत्तम ताळमेळ घालत आहेत हे काही चित्रपटांतून दिसत आहे. काही सेलिब्रिटीजही साऊथच्या चित्रपटात काम करताहेत, तर काही अशा एखाद्या इंग्रजी भाषेतील चित्रपटात भूमिका करताहेत. त्या सगळ्यांचे कौतुक आहे. आपल्या कलाकारांचे कौतुक आपण करायलाच हवे!
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

