Homeमाय व्हॉईसमुंबई महापालिकेत महिलाराज!

मुंबई महापालिकेत महिलाराज!

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ह्यांची नेमणूक झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे ह्यांची नेमणूक झाली आणि महापालिकेत एकप्रकारे महिला राज सुरू झाले. कारण महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर तसेच महापालिका सचिव मंजिरी देशपांडे, असा सगळा महिलांचा कारभार आहे. त्याशिवाय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी जोशी आहेतच.

मुंबई ही जगातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे, ज्याचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी असतो. अशा महापालिकेची सूत्रे एका कर्तृत्त्ववान महिलेकडे आली आहेत, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. अर्थात अश्विनी भिडे ह्यांनी हयाआधीही अनेक आव्हानात्मक पदांवर काम केले आहे. पण त्यांची गाजलेली कामगिरी म्हणजे मेट्रो ३, ह्या आरे ते कफ परेड ह्या भूमिगत रेल्वेची बांधणी आणि मुंबई कोस्टल रोडची उभारणी. त्यामुळेच त्यांना मेट्रो वूमन हे नाव पडले. पण हे काम सोपे नव्हते. आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्यावरून मोठा वाद निर्माण झाला.  अनेक पर्यावरणप्रेमीनी त्याला विरोध केला. तिथे मोठे आंदोलन झाले. प्रकरण न्यायालयात गेले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्यासाठी वृक्षतोडीस परवानगी दिली.  तरीही विरोध मावळला नाही. दरम्यान महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.  मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पहिला निर्णय घेतला तो या मेट्रोचे काम थांबवण्याचा.

महिला

अश्विनी भिडे ह्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. नंतर मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाल्यावर त्यांच्यावर कोरोना साथीवर उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली.  कारण मुंबई हे कोरोनाचे केंद्रस्थान झाले होते. नंतर वरळी ते नरीमन पॉइंट ह्या कोस्टल रोडची जवाबदारी देण्यात आली. त्यांना जे जे काम दिले ते त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून दाखविले. नंतर २०२२मध्ये पुन्हा सत्तापालट झाला. फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्यांचे सरकार स्थापन झाले. अश्विनी भिडे ह्यांना पुन्हा मेट्रो ३ची जबाबदारी देण्यात आली. काम पुन्हा सुरू झाले आणि ते विक्रमी वेळात पूर्ण झालेही. आज मुंबईकर ह्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत. वरळी ते नरीमन पॉइंट ह्या कोस्टल रोडचाही लाभ घेत आहेत.

त्या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होत्या. अश्विनी भिडे हे नाव घेतले की त्यांनी हाती घेतलेले किंवा त्यांना सोपवलेले काम नीट पूर्ण करणारच ह्याची हमी आहे. अर्थात त्यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यामध्ये वाद होते, संघर्ष होता, बदली होती, राजकारण होते आणि आता मात्र यशस्वीपणे नवी जवाबदारी घेण्यास त्या सज्ज झाल्या आहेत. महापालिका आयुक्तपदी नेमणूक झाली असली तरीही त्यांच्यापुढे मुंबईच्या समस्या जाणून त्या सोडवणे हे मोठेच आव्हान आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, अनेकांच्या  स्वप्नांची नगरी, कोट्यवधी मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत असलेली यंत्रणा, पायाभूत सुविधा निर्माण करणे, वाहतूकव्यवस्था सुधारणे, मुंबईकरांचे जीवनमान उंचावणे, पावसाळ्यातील पूरस्थिती, नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अनेक फ्लाय ओव्हर रस्त्यांचे बांधकाम, नवीन पूल बांधणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, आरोग्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था,सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेली प्रतिमा सुधारणे..  एक ना अनेक, असे अनेक प्रश्न आज भिडे ह्यांच्यासमोर आहेत. अर्थात त्यांच्या गाठीशी असलेला प्रशासकीय अनुभव लक्षात घेता त्या ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतील अशी अपेक्षा आहे. 2030मध्ये त्या निवृत्त होतील. तोपर्यंत मुंबईकरांना सुरक्षित आणि सुधारित जीवन देणे ही त्यांची जबाबदारी आहे असे त्या म्हणतात. अश्विनी भिडे ह्यांच्या कारकिर्दीला मनापासून शुभेछा.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

महापौर रितू तावडेंभोवती वादाचे जाळे!

मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांची महापौरपदी निवड झाल्यापासूनच त्यांच्यामागे काही ना काही वाद सुरु आहेत. खरेतर महापालिका निवडणुकीनंतर मूळ भाजपाच्या अनेक नगरसेविकांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी १० वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या रितू तावडे ह्यांची...

रस्त्यांवरच्या खड्ड्यांना वाली कोण? एकावर तरी कारवाई करा!

पावसाळा सुरु झाला की दरवर्षीच्या ठरलेल्या घटना आहेत. पाऊस मुसळधार झाला, दोन-तीन दिवस सतत पडला की, रस्त्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, जमीन-रस्ता खचणे, इमारती कोसळणे, नद्यांना पूर येणे, रस्त्यात पाणी साठणे, वाहतुकीचा बोजवारा, मग रस्त्यावरील वाहतूक असो की रेल्वेवाहतूक,...

पावसापाण्यात मुंबईकरांना आशा फक्त देवाभाऊंकडून!

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात अनेक भागात कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज तर कुठे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी बरसणार असे सगळे सांगत होते. मात्र...
Skip to content