बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत असले तरी मूळ हेतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोहरम करण्याचाच भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा असल्याचे मागेच लिहिले होते. आता अजितदादांसमोर वेगळाच पेचप्रसंग निर्माण झाला आहे आणि तो पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच निर्माण केला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
या पदाधिकाऱ्यांत बहुतांश पदाधिकारी पुणे शहर व जिल्ह्यातील असून याच पदाधिकाऱ्यांनी सरपंच हत्त्येतील प्रमुख संशयित वाल्मिक कराड याला पोलिसांपासून अनेक दिवस लपवून ठेवले होते. मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित आरोपी कराड यांचे हिडीस कारनामे जसेजसे बाहेर येऊ लागले तसतसे हे पदाधिकारी सावध होऊन बोलू लागले आहेत. त्यातच हे सर्व पदाधिकारी थोरल्या पवारांचे पाईक असल्याने आता त्यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातूनच नव्हे तर पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवा अशी उघड मागणी सुरू केली असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एरवी शांत बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही आवाज चढवून बोलण्यास सुरुवात केल्याने दादांना ही बैठक आवरती घ्यावी लागली होती. आपण जर मुंडे यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही तर नाईलाजाने आम्हाला पत्रकारांसमोर जावे लागेल असा अल्टीमेटमही या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. पक्षाच्या आदेशामुळेच आम्ही अनेक दिवस कराड याला लपवून ठेवले होते. आता पक्ष वा नेतृत्त्व आमचाच बळी देणार असेल तर आम्हीही सर्व प्रकार उघड करू अशी एकप्रकारे धमकीच दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संतोष देशमुख यांच्या हत्त्येचा तपास सीआयडीकडे सोपवल्यावरही भाजप आमदार सुरेश धस यांचे देशमुख आणि आका यांच्यावरील कीर्तन अजूनही अखंडपणे सुरु आहे. दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धस यांचे तोंडभरून कौतुक केल्याने पदाधिकाऱ्यांचा पारा अधिकच चढला असून धस यांची उघड टीका म्हणजे पक्षविरोधी सुपारीच असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आजपर्यंत धस यांच्या टिकेला काहीच प्रत्युत्तर दिलेले नसल्याने पदाधिकारी संतापलेले आहेत. धस हेही गेली २५/३० वर्षे मराठवाड्यातील राजकारणात आहेत. त्यांनी या सर्वाविरुद्ध आजपर्यंत का आवाज उठवला नाही असे त्यांना ज्येष्ठ नेत्यांनी विचारायला हवे होते, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. धस यांच्याविरुद्धही अनेक तक्रारी पोलिसांकडे आहेत. एफआयआरही नोंदवले गेलेले आहेत. याचीही चौकशी झाली पाहिजे, असे दादा का म्हणत नाहीत, असा सवालही पदाधिकाऱ्यांनी केला, असे समजते.

अजितदादांच्या राष्ट्रवादीतील यासंबंधातील स्मशानशांतता बरेच काही सांगून जाते आणि या चपखल ओळी आठवल्या…
” मनगटावरचे घड्याळ बंद पडले
तसेच दोनचार दिवस मी मिरवले…
मला वाटले…
कुणी मला रस्त्यात गाठून
टाइम विचारेल…
पूर्वी जसे बहुतेकजण विचारायचे
पण वेळ विचारायला
कुणाला वेळच नव्हता! (अशोक बागवे)