भाजप (भारतीय जनता पक्ष) आणि एकेकाळी प्रभावी, प्रसिद्ध असलेली त्यांचा आयटी सेल व संशोधन शाखा काँग्रेस आणि तिच्या डाव्या-उदारमतवादी (Left-Liberal) परिसंस्थेकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या कथानकांना (False Narratives) सुरुवातीलाच का रोखू शकत नाही? भाजपचा आयटी सेल आणि एकेकाळी प्रभावी, अभ्यासू व प्रभावीपणे मांडणी करणारे प्रवक्ते आज शांत का आहेत? काही नेत्यांना वाटते की तेच सर्वांत शहाणे आहेत आणि त्यामुळे विरोधकांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर देणे हे त्यांचेच काम आहे. माध्यमांमध्ये सतत झळकून प्रसिद्धी मिळवणे आणि राजकीय अजेंडा ठरवणे यालाच त्यांनी प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, जे नेते प्रभावीपणे बोलत होते आणि विरोधकांच्या कथानकाला समर्थपणे प्रत्युत्तर देत होते, ते आज गप्प बसले आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, विशेषतः उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यातूनही भाजपने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. भाजपला विरोधकांनी पसरविलेल्या “भाजपला ४०० जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील..” या प्रचाराला प्रभावीपणे उत्तर देता आले नाही. आताही सीजेपीच्या (कॉक्रोच जनता पार्टी) नीट (NEET) आंदोलनाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही वरिष्ठ मंत्र्यांनाच प्रशासनाची जबाबदारी सांभाळत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही उत्तरं द्यावी लागत आहेत. भाजपच्या अनेक सहयोगी संघटना आहेत. त्यामध्ये अभाविप (ABVP)सारखी विद्यार्थी संघटनाही आहे. मात्र त्या सर्व जवळपास शांतच राहिल्या. फारतर त्यांनी एक औपचारिक आणि सावध भूमिका मांडणारे निवेदन प्रसिद्ध केले. युवा वर्गातील संताप, वेदना आणि नैराश्य समजून घेऊन विद्यार्थी आणि सरकार यांच्यात संवादाचा दुवा बनण्याचा प्रयत्न ना सहयोगी संघटनांनी केला, ना पक्षाने. केवळ एक निवेदन जारी करून प्रश्न सुटत नाहीत, हे या आंदोलनाच्या फलितातून स्पष्ट होत आहे.

आजच्या काळात लोकांना असे अहंकारी नेते आवडत नाहीत, ज्यांना वाटते की ते एकहाती सर्व काही सांभाळू शकतात आणि पक्षाच्या प्रवक्त्यांना केवळ प्रेक्षक बनवून ठेवतात. राजकारणात असे अनेक नेते झाले आहेत, जे केवळ अहंकारीच नव्हते तर स्वतःच्या लोकप्रियतेबद्दल आणि निवडून येण्याच्या खात्रीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगत होते. अखेरीस त्यांचा पराभव तुलनेने कमी परिचित उमेदवारांकडून झाला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही पूर्णविराम मिळाला. आज भाजपच्या आयटी सेल आणि संशोधन शाखेचे नेतृत्त्व नेमके कोण करत आहे, हेच अनेकांना माहित नाही. सोशल मीडियाचे प्रभावी व्यवस्थापन आणि त्यातील बारकावे जाणणाऱ्या अनेकांना बाजूला सारण्यात आले आहे किंवा ते पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. निवडणुका जिंकणे हेच सर्वकाही नसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि थेट संवादाद्वारे तळागाळातील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. आज असे वाटते की भाजपने सोशल मीडिया आणि जनसंपर्क हे आपले मुख्य बळच विसरले आहे; किंवा पक्षातील प्रभावी वक्ते नेतृत्त्व नाराज होण्याच्या भीतीने बोलण्याचे टाळत आहेत, कारण नेतृत्त्व वास्तवापासून दूर गेले असल्याची भावना निर्माण होत आहे. आशा आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून योग्य तो शहाणपणा दाखवला जाईल, आवश्यक सुधारात्मक पावले उचलली जातील आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जाईल. वेळ हातातून निसटण्यापूर्वी…
(लेखक प्रशांत हमिने ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

