Homeबॅक पेजआसाम सरकारच्या पाठिंब्यावर...

आसाम सरकारच्या पाठिंब्यावर आहे मयंकच्या खेळाचे भवितव्य

भारताचा महान बुद्धिबळपटू जगजेत्त्या विश्वनाथन आनंदने‌ १९८८ साली पहिल्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर‌ मग दक्षिणेकडच्या राज्यांतून अनेक चांगले बुद्धिबळपटू पुढे प्रकाशात आले. काही काळानंतर या खेळाने इतर राज्यांतदेखील‌ चांगलं बाळसं धरले आणि त्या राज्यांतूनदेखील उत्तम बुद्धिबळपटू पुढे येऊ लागले. त्याचेच आताचे अलीकडचे चांगले उदाहरण म्हणजे आसामचा युवा बुद्धिबळपटू १७ वर्षीय मयंक चक्रवर्ती. मयंकने स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात झालेल्या हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ बायफस्टर्ट हॉटल चेस टॅलेंटस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवून‌ आपला तिसरा नॉर्म‌ मिळवला आणि आंतरराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर किताब मिळवून नवा इतिहास रचला. ईशान्य भारतातील ग्रॅन्डमास्टर किताबाचा मयंक पहिला मानकरी ठरला. या स्पर्धेत त्याने‌ २५०० एलो‌‌ रेटिंग‌ गुणांचा टप्पा पार करून आपल्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला. हा किताब मिळवणारा मयंक भारताचा ९४वा आंतरराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर बनला.‌ २०२४मध्ये मयंक इंटरनॅशनल मास्टर किताबाचा मानकरी ठरला होता. साहिल देवनंतर हा किताब मिळवणारा मयंक आसामचा केवळ दुसरा बुद्धिबळ खेळाडू ठरला.

आसाममध्ये हा खेळ फारसा लोकप्रिय नाही. तिथे फुटबॉल, मुष्टियुद्ध या खेळांकडे युवा खेळाडूंचा ओढा जास्त आहे. मयंकला बॅडमिंटन खेळाची लहानपणी आवड होती. पण त्यामध्ये जास्त दमछाक होत असल्याने त्याने बुद्धिबळ खेळाकडे आपला मोर्चा वळवला. आसाम क्लबमध्ये त्याने या खेळाचा श्रीगणेशा केला. चांगल्या प्रशिक्षकाची तिथे वानवाच होती. त्यामुळे त्याने सुरूवातीला युट्यूब आणि चेस बेसची मदत घेतली. नंतर काही वर्षांनी त्याला ग्रॅन्डमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी हे प्रशिक्षक लाभले आणि त्यांनी मग मयंकच्या खेळात चांगली सुधारणा घडवली. मयंकच्या यशात आई ‌मोनोमिता यांचा मोठा वाटा आहे. सुरूवातीला त्याच्यासोबत विविध स्पर्धांना वडील जायचे. पण नंतर त्यांना शक्य होत नसल्यामुळें ती जबाबदारी आईने घेतली. आई डॉक्टर असून ती सरकारी हॉस्पिटलमध्ये‌ जात असे. पण मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ‌‌ मयंकला देऊ लागली. त्याचा मोठा फायदा मयंकला झाला. त्याने सुरूवातीला ११ वर्षांखालील आणि नंतर १७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

२०२१मध्ये ज्युनिअर गटात तो आशिया खंडात अव्वल क्रमांकावर होता. त्याच वर्षी त्याने युरोपमधील विविध स्पर्धांत खेळून आपले यलो रेटिंग वाढवण्यास‌‌ सुरूवात केली. त्याने आपले रेटिंग १८००वरुन‌ २२००वर‌ नेले. कोविडचा काळ फुकट गेला. २० महिने तो कुठल्याच स्पर्धेत खेळला नाही. अन्यथा तो याअगोदरच ग्रॅन्डमास्टर किताबाचा मानकरी ठरला असता. चक्रवर्ती कुंटुबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. हा खेळ फारसा लोकप्रिय नसल्यामुळे आर्थिक मदत कोणाकडुन मिळवायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेवटी मुरलेधर जालान फाऊंडेशनचा मदतीचा हाथ मयंकला मिळाल्याने त्याची पुढची वाटचाल थोडी सुकर झाली. आक्रमक खेळायला त्याला आवडते. या वयात त्याचा खेळाचा अभ्यास चांगला आहे. नवनवी व्यूहरचना करण्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो. बुद्धिबळ विश्वात रशियाचे सर्वात जास्त २५५ ग्रॅन्डमास्टर आहेत. त्यानंतर अमेरिका आहे- १०१, जर्मनी तिसऱ्या- ९६, भारत- ९४ चौथ्या आणि युक्रेन ९३ पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय बुद्धिबळ पटावरील हा नवा राजा आपले साम्राज्य आणखी किती निर्माण करतो ते बघायचे. आसाम सरकारने मात्र‌ भक्कमपणे मयंकच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...
Skip to content