Homeब्लॅक अँड व्हाईटयंदाच्या विश्व बॅडमिंटन...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी रंकी रेड्डी, चिराग शेट्टी यांच्यावरच असणार आहे. तब्बल १७ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा विश्व बॅडमिंटनमधील मानाची समजली जाणारी ही स्पर्धा भारतात होत आहे. याअगोदर २००९मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे भारताने यशस्वी आयोजन केले होते. पाच गटात होणाऱ्या या स्पर्धेत यजमान असल्यामुळे भारताला प्रत्येक गटात एक, एक जादा खेळाडू खेळवण्याची संधी मिळणार आहे. त्याचा लाभ युवा भारतीय खेळाडू कसे घेतात तेदेखील बघणे महत्त्वाचे ठरेल. सिंधु, सेन, रेड्डी, शेट्टी यांनी यंदाच्या नव्या मोसमात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सातत्याने चांगली कामगिरी‌ केली आहे. त्यामुळे यांच्याकडून पदकांची आशा बाळगायला काहीच हरकत नाही.

सध्या विश्व क्रमवारीत सिंधु ९व्या स्थानावर आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुने जपान ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आपला पावणेदोन वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. ३१ वर्षीय सिंधुला ही स्पर्धा पुन्हा जिंकण्याची शेवटची संधी आहे. तिने २०१९मध्ये जिंकून भारतासाठी नवा इतिहास रचला होता. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. या स्पर्धेत तिची भारतातर्फे सर्वोतम कामगिरी झाली आहे. तिने आतापर्यंत या स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके मिळवली आहेत. जपान स्पर्धेतील जेतेपदामुळे तिचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती आपला सर्वोतम खेळ करेल यात शंका नाही. चीनी, जपान, दक्षिण कोरिया, मलेशियाच्या खेळाडूंचे जोरदार आव्हान सिंधुसमोर असेल. त्यांचा ती कसा मुकाबला करते यावर तिचे जेतेपद अवलंबून असेल.

सिंधुपाठोपाठ युवा लक्ष्य सेनकडून पदकाची आशा करुया. या स्पर्धेत त्याने अगोदर कांस्यपदक मिळवलेय. आता त्या पदकाचा रंग बदलायला सेनला नक्की आवडेल. दुखापतीमुळे या युवा खेळाडूची कामगिरी मध्ये काही काळ ढेपाळली. पण आता सध्या तो या दुखापतीतून बऱ्यापैकी सावरला आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीतदेखील त्याची बरीच घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या क्रमवारीत अव्वल १० खेळाडूंत असलेला सेन सध्या १४व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी‌ करुन त्याला पुन्हा अव्वल १० खेळाडूंतदेखील स्थान मिळवण्याची संधी आहे. सध्या तो या स्पर्धेसाठी हैद्राबाद येथे गोपीचंद यांच्या अकादमीत जोरदार सराव करत असून फिटनेसवरदेखील भर देत आहे.

बॅडमिंटन

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या रंकी रेड्डी, चिराग शेट्टी या जोडीकडून सुवर्णपदकाची अपेक्षा भारतीय बॅडमिंटन चाहते करत असतील. गेल्या काही वर्षांत या जोडीने बॅडमिंटन विश्वात स्वतःचा वेगळा दरारा निर्माण केला आहे. विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना यांनी नमवले आहे. काही प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. दोघांचा ताळमेळ छान जमला आहे. जागतिक स्पर्धेत मात्र‌ दोघांची मजल कांस्यपदकापर्यंतच गेली आहे. यावेळी घरच्या मैदानावर येथील वातावरणाचा आणि आपल्या चाहत्यांचा पांठिब्याचा फायदा ही जोडी घेईल, अशी आशा करुया. सिंधुनंतर या स्पर्धेत दोन पदके जिंकणारी हीच एकमेव भारतीय जोडी आहे. यांचा अपवाद वगळता भारतीय संघातील गायत्री गोपीचंद, त्रेसा जॉली, आयुष‌ शेट्टी, उन्नती हुडा या इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी होते हेदेखील बघणे महत्त्वाचे ठरेल. गायत्री ही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या गोपीचंद यांची कन्या आहे. ती त्रेसा जॉलीसोबत महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीत विश्व क्रमवारीतील अव्वल प्रत्येकी ६४ खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे. पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी विभागात जगातील अव्वल स्थानावर असलेल्या प्रत्येकी ४८ जोड्यांचा सहभाग असेल. १९७७ साली या विश्व स्पर्धेला सुरूवात झाली. १९८३पर्यंत ही स्पर्धा दर ३ वर्षांनी होत होती. नंतर ही स्पर्धा दर २ वर्षांनी घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २००५पासून‌ ही स्पर्धा ऑलिंपिक सामने असतील ते वर्ष सोडून‌ दरवर्षी होऊ लागली. आतापर्यंत भारतातर्फे एकूण ११ खेळाडूंनी या स्पर्धेत १५ पदके मिळवली आहेत. भारताचे नामवंत बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी या स्पर्धेत पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकून या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकण्याचा पराक्रम केला तर, ‌महिला विभागात हा मान सायना नेहवालने रौप्यपदक जिंकून मिळवला. त्यानंतर सिंधुने तब्बल ५ पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोतम कामगिरी केली आहे. ती ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. पुरुष एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करणारा के. श्रीकांत पहिला भारतीय ठरला. अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुताने महिला दुहेरीत तर रंकी रेड्डी, चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीत कांस्यपदके मिळवली. साई प्रणीत, एच. एस. प्रणाय, लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली.

या स्पर्धेवर चिनी खेळाडूंचाच मोठा दबदबा राहिला आहे. त्यांची स्टार महिला खेळाडू झाओ युन लेईने या स्पर्धेत सर्वाधिक १० पदके मिळवली. पुरुष गटात त्यांच्याच लीन ऑडनने ५ वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. चीनने या स्पर्धेत सर्वाधिक एकूण २०८ पदके मिळवली आहेत. त्यामध्ये ७२ सुवर्ण, ५२ रौप्य, ८४ कांस्यपदकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर इंडोनेशिया असून त्यांनी एकूण ८१ पदके पटकावली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, चौथ्यावर डेन्मार्क आणि पाचव्यावर जपान आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या स्पर्धेचा शुभांकर पिकोचे अनावरण केले. या स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेल्या चॅम्पियन्स गाण्याचादेखील प्रारंभ केला. या गाण्यात १६ भारतीय दिग्गज बॅडमिंटनपटू दिसणार आहेत. त्यामध्ये सिंधु, सेन, चिराग, रेड्डी हे आहेत. अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा असून त्यांनी ही स्पर्धा भारतात झालेल्या गेल्या विश्व स्पर्धेपेक्षा आधिक चांगल्याप्रकारे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यजमान भारत या स्पर्धेत आपली आजवरची सर्वोतम कामगिरी करेल अशी आशा करुया.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content