Homeब्लॅक अँड व्हाईटपाडायला घेतलाय अमिताभच्या...

पाडायला घेतलाय अमिताभच्या पिक्चरसाठी खास असलेला ‘अलंकार’!

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या. त्या खूपच रंजक. विशेषतः एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि लोकप्रिय चित्रपटाचा. त्यातील काहींचा कधी पंचवीस तर कधी पन्नास आठवड्यांचा (कधी त्याहीपेक्षा जास्त) मुक्काम. आणि त्यात काही जणू विक्रम ठरले. दक्षिण मुंबईतील अलंकार चित्रपटगृह‌ व अमिताभ बच्चन हेदेखील असेच सुपरहिट नाते. अलंकारला जावे तर बच्चनचा मसालेदार पिक्चर एन्जॉय करायला.. काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या या चित्रपटगृहाची इमारत आता पाडायला घेतलीय, म्हणून हा विशेष फोकस.‌

खेतवाडी परिसरातील हे चित्रपटगृह. खेतवाडी, कुंभारवाडा, गिरगाव, प्रार्थना समाज, भुलेश्वर या परिसरातील चित्रपटरसिकांना हे अगदी जवळचे. अमिताभपटाचे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले प्रगती पुस्तकच बघा. एस. रामनाथन निर्मित व दिग्दर्शित “बॉम्बे टू गोवा” (१९७२)चे रौप्य महोत्सवी यश. रमेश सिप्पीने “शोले”साठी अमिताभला साईन करण्यापूर्वी त्याचा फक्त हाच चित्रपट पाहिला होता, असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे. प्रकाश मेहरा निर्मित व राकेश कुमार दिग्दर्शित “खून पसिना”चे (१९७७) शंभर दिवसांचे यश. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “मुकद्दर का सिकंदर”चा (१९७८) पन्नास आठवड्यांचा खणखणीत सुपरहिट मुक्काम.‌ या‌ यशात विनोद खन्नाही वाटेकरी. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “लावारीस”चाही (१९८१) पन्नास आठवड्याचा मुक्काम. अमिताभ फुल्ल फॉर्मात. प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित “नमक हलाल”चाही (१९८२) चाही असाच सहज वाटावा असा पन्नास आठवड्यांचा मुक्काम.‌ हा चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन वन मॅन शो होता. अमिताभ वन मॅन इंडस्ट्री झाला होता. मनमोहन देसाई दिग्दर्शित “कुली”चा (१९८३) पन्नास आठवड्यांचा मुक्काम. कुली अनेक कारणास्तव चर्चेत होताच. अमिताभचा याच चित्रपटाच्या बंगलोर येथील सेटवरचा अपघात गाजला.

के. सी. बोकाडिया निर्मित व दिग्दर्शित “आज का अर्जुन”चा ( १९९०) रौप्यमहोत्सवी, पंचवीस आठवड्याचा मुक्काम. या दिवसात अमिताभला सुपरहिट चित्रपटाची गरज होती. ऐंशीच्या दशकातील उत्तरार्ध अमिताभला बराच आव्हानात्मक होता. चित्रपट फ्लॉप होत होते. राजकारणात अपयश आले होते. एक चित्रपटगृह, एक कलाकार आणि असे यश कौतुकास्पद. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून मी शिकत असताना आम्हा मित्रांना अमिताभचा धमाकेदार चित्रपट पाहावासा वाटला रे वाटला की, अलंकार चित्रपटगृहाची आठवण येई. आणि त्याचा पिक्चर हमखास हाऊसफुल्ल असल्याने काळ्या बाजारात तिकीट घेण्याची आर्थिक तयारी ठेवायचो. खरंतर त्या काळात अशा पद्धतीने ब्लॅक मार्केटमध्ये पिक्चरचं तिकीट काढणे हे मध्यमवर्गीय कुटुंबात चुकीचे मानले जात असे. असे तिकीट घेताना कोणी पाहिलं तर.. अशी सामाजिक भीतीदेखिल असे. पण अमिताभवरील प्रेमाखातर तेदेखील करीत असू.

लावारीसच्या वेळी अलंकारला बाल्कनीचे तिकीट सहा रुपये, अप्पर स्टॉलचे पाच रुपये व स्टॉलचे चार रुपये, असे होते. तेव्हा खिशात तिकीटापुरते पैसे असत. ते घट्ट धरुन ठेवायची सवय लागली होती. “लावारीस”च्या वेळचा अनुभव सांगितलाच हवा. अमिताभ बच्चनने गायलेले आणि वेगवेगळ्या स्त्री रुपात साकारलेल्या मेरे अंगमे तुम्हारा क्या काम है.. पडद्यावर सुरू होताच हाऊसफुल्ल गर्दीतील पब्लिक प्रचंड टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घेऊन ते एन्जॉय करणार हे ठरलेले. या लोकप्रिय गीत, संगीत आणि नृत्यासाठी अनेक फिल्मी दिवाने पुन्हापुन्हा थिएटरची वारी करत. रिपीट प्रेक्षक खूप महत्त्वाचा असतो.‌ तो टिकावा व वाढत वाढत राहावा. काही हौशी प्रेक्षक या गाण्याच्या वेळेस पडद्यावर नाणी उडवत.

आपल्या देशात चित्रपट पाहणे हे एकप्रकारचे सेलिब्रिशन असते. आणि अशाच फिल्मी दिवान्यांनी आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, जगवाला.‌ त्यानंतर प्रयोगशीलता वगैरे.. वगैरे.. येते. पटेल न पटेल. अलंकार चित्रपटगृह व अमिताभ बच्चन यांचे घट्ट नातेसंबंध हे असे. त्याचे आणखी काही चित्रपट येथे प्रदर्शित झाले. पण आपण यशाकडे पाहावे. असेच आणखी एक भारी उदाहरण, सत्तर व ऐंशीच्या दशकातील रॉक्सी चित्रपटगृह व राजेश खन्नाच्या चित्रपटांंचे आहे. त्यावर कधीतरी फोकस. म्हटलं ना, आपल्या देशातील चित्रपटरसिकांची व जुन्या काळातील अनेक चित्रपटगृहांची संस्कृती जगावेगळी आहे म्हणून!

Continue reading

८ तासांच्या शिफ्टनंतर दीपिका पदुकोणला हवा स्वतःसाठी वेळ!

चित्रपटाच्या जगात वावरण्यासाठी आपण दिवसातील किती तास द्यायचे आणि आपल्या घरासाठी/ कुटुंबासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित मांडता येईल का? स्पर्धात्मक युगात ते शक्य आहे का? अशी वर्गवारी करता आलीच तर बरे होईल असे दीपिका पदुकोण म्हणेल आणि कंगना...

आता मुंबईतला ‘मटका’ नागराज मंजुळेच्या हाती!

'मटका किंग' म्हणताच चित्रपटरसिकांच्या पन्नाशी ओलांडलेल्या पिढीला फिरोज खान अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित 'धर्मात्मा' (१९७५) आठवला असेल तर त्याच वयाच्या पण फारसे चित्रपट न पाहिलेल्या परन्तु सामाजिक भान असलेल्यांना ओरिजनल मटका किंग रतन खत्री आठवला असेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित...

होय, ती हेमा मालिनीसारखी दिसतेय, मग?

आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट‌ कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे 'दीवाने' (की येडे?) कमी नाहीत. ती वेडी मानसिकता वेगळी. राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझच्या युगात आमच्या गिरगावात...
Skip to content