Homeबॅक पेजआत्मचरित्र लिहायचंय.. लिहू...

आत्मचरित्र लिहायचंय.. लिहू ना? की…

गेल्या आठ-दहा दिवसांपासून घरात दुसरा विषयच नाहीये. बायकोचं एकच टुमणं मागे लागलंय. तुम्ही आत्मचरित्र लिहा. नुसतं आत्मचरित्र लिहायचं नाही. तर त्याचा प्रकाशन समारंभही जोरदार व्हायला पाहिजे. टीव्हीवर त्याच्या बातम्या यायला पाहिजे आणि आत्मचरित्रामुळे तुमचं नाव व्हायला पाहिजे. मी तिला सांगून पाहिलं. अगं, आत्मचरित्रामुळे नाव होत नाही. ज्यांचं नाव असतं तेच लोक आत्मचरित्र लिहितात. पण नाही. तिचं म्हणणं आहे, रोज मेलं एकच. तेच दुकान, तीच नोकरी. तेच आयुष्य. जरा म्हणून वेगळं नाही. तुम्ही लिहून तर बघा. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. मग मलाही मिरवायला मिळेल.

दुकानातून दुपारी जेवायला घरी गेलो तेव्हा तर ताट वाढण्याआधी ‘काय झालं आत्मचरित्र लिहिण्याचं?’

मी म्हटलं विचार करतोय..

पण एक दिवस तिने सरळ धमकीच दिली. तुम्ही लिहिताय की मी लिहू आत्मचरित्र?

आता मी पुरता घाबरलो. माझ्याच आयुष्यात लिहिण्यासारखं काही नाही. तर ही बया (हा शब्द हळूच मनात उच्चारला. तरीही तिला ऐकू गेलेला नाही याची तिच्या चेहऱ्याकडे बघून खात्री करून घेतली.) काय लिहिणार?

तिचं मार्गदर्शन सुरूच होतं, काही तरी सिरिअस लिहा. मी (मनात) म्हटलं, हा शब्द सिरिअस असा लिहायचा की सिरीयस लिहायचा इथून माझी सुरुवात.

मग म्हणाली, थोडं विनोदीही असू द्या.. मी म्हटलं (पुन्हा मनातच), मज्जारज्जू म्हणजे शाळेत जाता जाता शेजारच्या रज्जुबरोबर केलेली मज्जा एवढीच आमच्या (दळभद्री) विनोदाची पातळी. आणखी विनोदी कुठून लिहिणार..

नंतर म्हणाली, संपूर्ण आयुष्यच येऊ द्या थोडं थोडं..

मग मी विचारात पडलो. काय होतं माझ्या आयुष्यात? सामान्य कुटुंबात जन्म. चार भावंडं. म्हणजे त्यातही वेगळेपण काही वाट्याला आलं का, तर नाही. बालपण कसं गेलं? तर सगळ्यांसारखं. एकदा शाळेत जाताना रडल्याचं आठवतंय. एकदा केव्हातरी शाळेत सहामाही परीक्षेत पहिला नंबर आला होता, हा आपल्या शालेय जीवनातला सर्वात मोठा पराक्रम.. बाकी रोज गृहपाठ न केल्याबद्दल मिळालेले दणके काय लिहायचे? घरात एकदा सायीचं पातेलं खरवडून खाल्लेलं आठवतंय.

आत्मचरित्र

खरंतर पातेल्यातली साय खाल्ली होती. पण हिचं म्हणणं, खरवडलं पातेलंच. साय खाल्ली! वरून म्हणाली. पायात चप्पल घालता की चपलेत पाय?

महाविद्यालयात जाण्याआधी कामाला लागलेलो होतो. (कारण दहावीत दोनदा नापास. पण हे लिहायचं नाही.) महाविद्यालयात कशीतरी पाच वर्षे काढली. लहानपणी कुठल्याही शाखेत (काँग्रेस सेवादल, राष्ट्र सेवा दल हेही शाखा भरवायचे आणि आजची प्रसिद्ध शाखासुद्धा (तेव्हाही प्रसिद्धच) होती.) गेलो नव्हतो. त्यामुळे महाविद्यालयातही कोणत्याही विद्यार्थी संघटनेशी संबंध येण्याची शक्यता नव्हती. (नाही म्हणायला एक मुलगी फार आवडली होती. म्हणजे अगदी दिल तो पागलच. पण तिच्याशी बोलण्याची हिंमत कधी झाली नाही. परवा दुकानात औषधं घ्यायला आली. तेव्हा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनमुळे तिचं नाव समजलं.. अर्थात ते आताचं असेल का? पण जाऊ द्या.. हा विषय लिहायचा नाही. उगाच हिच्या पन्नास चौकशा सुरु व्हायच्या.) तर कॉलेज संपल्यावर मालकांनी विचारलं, दुकानातच काम करणार आहात की अन्य काही विचार आहे? मी फक्त मान डोलावली. उभी की आडवी ते आठवत नाही. होकारार्थी की नकारार्थी ते मालकांनी समजून घेतलं. तेव्हापासून पुलंच्या शब्दात सांगायचं तर टपालाला जसा स्टॅम्प चिकटतो, तसा मी नोकरीला चिकटलेलो आहे. मालक बरं वागवतात. ते घरी भांडून आले असतील तर माझा पाणउतारा करतात. पण दिवाळीला एक पगार जास्त देतात. मग मी हिला एक साडी घेतो. दिवाळी मजेत जाते.

आणखी काय लिहायचं?

हं. आम्ही हल्ली घरी दोघेच असतो. मुलीचं लग्न झालंय आणि मुलगा अजून शिकतो(च) आहे. ती एक गंमतच आहे. मी कॉलेजात असताना बाबा देवाघरी गेले. माझं लग्न झाल्यावर आम्ही बाहेरच्या खोलीत झोपायचो आणि आई माजघरात. थोडा म्हणून आवाज झाला तरी ‘झोपा आता..’ म्हणून तिचा आवाज यायचा. तरी दोन मुलं झाली. संपलं..

एकदा लिहून हिला (कंसातली वाक्य सोडून) वाचून दाखवलं. म्हणाली छान आहे. वाड्यातच राहतात म्हणून प्रकाशक ओळखीचे होते. त्यांना दाखवलं. म्हणे यात काही दम नाही. काहीतरी मसाला घाला. माझ्या घशाला कोरड पडली. मी जेवायला घरी गेलो तरी आम्ही समोरासमोर बसतो. मध्ये पोळ्यांचा डबा, वरणाचं पातेलं, लोणच्याची बरणी, मिठाचा सट, झालंच तर सांडशी असते हिच्या हाताशी. मग मांडीवर काय, जवळ घेण्याची तरी कोण हिंमत करणार?

हे कसं लिहिणार..

खरंतर मी हिला चांगलं म्हणत होतो. अगं माझ्याकडे आत्मचरित्र लिहिण्यासारखं काही नाही. तरीही मी लिहिलं तर छापणार कोण? बरं त्यांनी छापलं तर वाचणार कोण? पण नाही. आता प्रकाशकांनी नकार दिल्यावर हिचं म्हणणं आहे, हे तुमच्या पुरुषांचं कामच नाही.

थोडक्यात.. आता तिने आत्मचरित्र लिहिण्याचं ठरवलंय….

(लेखक आप्पा नाशिककर ज्येष्ठ पत्रकार आणि ललित लेखक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

धनी.. थोडा किराणा भरता का?

कारभारीण: धनी, थोडा किराणा भरायचा होता. धनी: अगं, आता पाच तारीखला सामान आणलंतं ना... कारभारीण: आणलंतं. पण संपलं. धनी: एवढ्यात? संपलं पण? कारभारीण: तरी पालेभाज्या, फळभाज्या घरच्या शेतातल्या हाय म्हणून बरं.. पण रवा, साखर, पोहे, तेल, तूप, डाळी, कणिक, तांदूळ सगळे डबे रिकामे...

काय दिसतं गं आज मार्केटमध्ये?

श्री: आज मार्केटमध्ये पाहिले तर काय दिसते? सौ: काय दिसते? श्री: प्रचंड गर्दी झालेली आहे खरेदीसाठी.. चालायला जागा नाहीये.. सौ: पण, चालायला मार्केटमध्ये कशाला जायचं? गोल्फ क्लबवर जावं.. श्री: (उपहासाने) आपल्या कॉलनीत बागेला चकरा मारायलाही हरकत नाही. सौ: आपलं वय बघा.. सिनेमातल्या हीरोसारखे जाल...
Skip to content