एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार आता पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केलेल्या ताज्या आरोपांमुळे वादाचा केंद्रबिंदू अपघात की घातपात? या पलीकडे जाऊन तपास निपक्षपातीपणे होत आहे का? इथपर्यंत पोहोचला आहे. 16 नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक वि. के. सिंह यांना वाचवत असल्याचा आरोप केला. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत आरोप करताना तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत. तपासातील दिरंगाई, विमान कंपनीविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ आणि कंपनीच्या मालकांचे राजकीय संबंध हे मुद्दे घेऊन त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

साडेनऊ महिन्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही, त्याचबरोबर दिलेल्या माहितीच्या आधारे सीआयडीकडून अपेक्षित कारवाई होत नाही आणि प्रवासातील बदलांसारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असेही त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणले आहे. रोहित पवार यांची भूमिका केवळ भावनिक संशयाची नसून तपासप्रक्रियेच्या उत्तरदायित्वाची मागणी करणारी आहे. त्यांनी व्हीएसआरशी संबंधित आर्थिक व्यवहार, परदेशातील मालमत्ता आणि कथित संशयास्पद संपर्काचाही उल्लेख केला आहे. या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. हे आरोप प्रसिद्धीच्या हव्यासातून झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित कंपनीच्या विमानातून अनेक नेत्यांनी, स्वतः रोहित पवारांनी प्रवास केल्याचा त्यांचा युक्तिवाद होता. म्हणजे संबंधित कंपनीशी अनुचित राजकीय संबंध असणे नव्हे, असेही त्यांचे म्हणणे होते. परंतु अपघाताच्या तपासातील कथित विलंब, कारवाईची स्थिती किंवा विशिष्ट पुराव्यांच्या पडताळणीबाबत स्वतः बावनकुळे काहीच बोलले नाहीत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्रीविरुद्ध रोहित पवार, या वादात युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उडी घेतली. त्यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीचा दाखला देत ठोस आधाराशिवाय संवेदनशील घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असे म्हटले. निवडक छायाचित्रांवरून निष्कर्ष काढण्यास त्यांनी विरोध केला. तांबे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांना समाजमाध्यमांवर भाजप विरोधकानी जोरदार ट्रोल केले. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला समाजमाध्यमावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर प्रत्त्युत्तर देणेच बंद केले. त्यांचे मामा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये असले तरी सध्या सत्यजित तांबे विधान परिषदेत अपक्ष सदस्य आहेत. सध्या ते मुख्यमंत्र्यांच्या फारच प्रेमात आहेत. त्यालाही वेगवेगळी कारणे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथील कार्यक्रमात अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीचा अहवाल लवकर यावा म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केल्याचे सांगितले. दोषी असल्यास कारवाई व्हावी आणि अपघात असल्यास जनतेचा संभ्रम दूर होईल, अशी त्यांची भूमिका होती. मात्र फडणवीस यांचे हे भाषण रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेपूर्वी झाले होते. 20 नोव्हेंबरच्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी काही आमदार आणि मंत्री व्हीएसआरला घाईने निर्दोष ठरवत असल्याचा आरोप केला. एका मंत्र्याने आपली नार्को चाचणी मागितल्याचे सांगून संबंधितांचीही चाचणी करण्याच्या अटीवर आपण तयार आहोत, असे आव्हान दिले. परंतु या आरोपप्रत्यारोपापलीकडे काही घडलेच नाही. मात्र या वादातून रोहित पवार स्वतःला न्यायासाठी सातत्याने लढणारा नातेवाईक आणि विरोधी नेता म्हणून उभे राहत आहेत. सत्ताधारी त्यांची भूमिका राजकीय महत्त्वाकांक्षेशी जोडत आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची अस्वस्थता समजून घेत चौकशी अहवालाची वाट पाहण्याची भूमिका मांडली.

सध्या राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठे बहुमत असल्याने मुख्यमंत्री असो किंवा मंत्री, विरोधी पक्षांना फारसे गंभीर घेत नाहीत. त्यामुळे विरोधक थंडावले आहेत. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची कधीतरी सरकारविरोधात प्रतिक्रिया येते. भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद नाकारल्यापासून ते चिपळूणच्या बाहेर पडतच नाहीत. ते फक्त अधिवेशनात ऍक्टिव्ह असतात. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते बंटी पाटील कोल्हापूरमध्येच अडकले आहेत. त्यामुळे राज्याचे प्रश्न घेऊन सध्या तरुणतुर्क रोहित पवार लढत आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्यात 11 दिवस आंदोलन करून एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. आमदार विश्वजीत कदमसुद्धा त्यांच्यासोबत होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. परंतु याविरोधात विरोधी पक्ष कुठेही लढताना दिसत नाही. आता त्यांनी हा विषय हिवाळी अधिवेशनासाठी शिल्लक ठेवला आहे. तोपर्यंत रोहित पवारच किल्ला लढवतील, असे दिसते.
(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्कः 9892514124)

