मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांची महापौरपदी निवड झाल्यापासूनच त्यांच्यामागे काही ना काही वाद सुरु आहेत. खरेतर महापालिका निवडणुकीनंतर मूळ भाजपाच्या अनेक नगरसेविकांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी १० वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या रितू तावडे ह्यांची महापौरपदासाठी निवड केली. पण त्यांची काम करण्याची शैली आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कारनाम्यांमुळे फडणवीस ह्यांचीच कोंडी झाल्यासारखे वाटत आहे. महापौर झाल्यावर लगेचच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी सध्या बदल्या करू नयेत, असा आदेश दिल्यानंतरही रितू तावडे ह्यांनी महापालिकेत बदल्यांचे सत्र सुरु केले. त्यानंतर मित्रपक्षाला, म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी ह्यांना विश्वासात न घेता, पावसाळी कामांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र दौरे काढले. ते नाही होत तर भायखळा येथील जिजामाता उद्यानात असलेल्या महापौर निवासाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले. त्याला साडेतीन कोटी रुपये खर्च झाला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी त्या बंगल्याचे नूतनीकरण केले गेले होते. त्यावेळी त्याला ७५ लाख रु. खर्च आला होता. तरीही रितू तावडे ह्यांनी पुन्हा त्याचे नूतनीकरण केले. त्यानंतरही पुन्हा महापौर बंगल्याबाहेरील सुशोभिकरणासाठी नव्याने २ कोटी ८९ लाख रुपयांच्या निविदा काढल्या. ह्यावरून गदारोळ झाल्यानंतर तावडे ह्यानी सांगितले की ह्या कामाची त्यांना माहिती नव्हती आणि त्याचा महापौर बंगल्याच्या कामाशी काही संबंध नाही.
हे वादळ शमते न शमते तोवर पुन्हा महापौरांची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यासाठी, महापालिकेच्या जनसंपर्क खात्याने २५ लाख रुपयांची निविदा काढली. ह्यावेळीही रितू तावडे ह्यांनी हात वर केले. ही निविदा जनसंपर्क विभागाने मला अंधारात ठेवून काढली, असे त्या म्हणाल्या. स्थायी समितीच्या सभेत हा ठराव चर्चेला येणार होता. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे ह्यांनीही बैठकच रद्द केली. दरम्यान, रितू तावडे ह्यांनी ह्यापुढे माझ्याशी संबधित कुठलाही प्रस्ताव माझ्या परवानगीशिवाय पुढे पाठवू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच महापालिकेच्या जनसंपर्क खात्यासाठी सहआयुक्तांची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रितू तावडे ह्यांचा मतदारसंघ असलेला एन वार्ड, घाटकोपर येथे विकासकामांसाठी सर्वाधिक म्हणजे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ह्यावरूनही महापालिकेत वादंग झाले. ह्या विकासकामात भ्रष्टाचार झाला आहे, असाही आरोप झाला. माजी महापौर श्रद्धा जाधव ह्यांनी, त्या विभागात जाऊन काय विकासकामे झाली आहेत, ती पाहण्याची मागणी, एका प्रस्तावाद्वारे स्थायी समितीत केली. आता त्यांना ह्याबबतची सर्व कागदपत्रे भाजपच्याच काही नेत्यांनी पुरवली असे सांगितले जात आहे. खरेतर आमदार आणि खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी असतो.

हे कमी होते म्हणून की काय, माजी महापौर किशोरी पेडणेकर, ह्या तर सतत रितू तावडे ह्यांच्यावर टीका करायची संधीच शोधत असतात. त्यांनी आता महापौर बंगल्यात जाऊन, नूतनीकरणाची काय कामे चालू आहेत, हे बघण्याची मागणी केली आहे. ह्याबाबत उबाठा सेनेचे नगरसेवक तर पेटलेलेच आहेत. पण भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले ह्यांनीही सोशल मीडीयावर महापौर रितू तावडे ह्यांच्यावर टीका केली आहे. महायुतीचे सरकार जनसामान्यांचे आहे. मुंबई महापालिकेच्या खर्चाबद्दल पारदर्शकता असावी आणि सामान्य मुंबईकरांच्या मनात कुठलाही गैरसमज नसावा आणि म्हणूच सोशल मीडियाच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. उबाठाच्या माजी महापौर तर त्यांना पुन्हा महापौर होण्याची संधी न मिळाल्याने वैफल्य्ग्रस्त आहेत. त्यामुळे रितू तावडे ह्यांच्यावर तोफ डागण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. नुकताच त्यांनी, मला आता महापौरांबद्दल बोलण्याचा अगदी कंटाळा आला आहे, असे वक्तव्य केले. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी महापौरांवर टीका केली.
दरम्यान, स्थायी समिती सदस्यांनी नुकतीच रितू तावडे ह्यांच्या मतदारसंघातील एन वार्ड, घाटकोपर येथील विकासकामांची पाहणी केली आणि धक्कादायक माहिती समोर आली. एकूण २८ विकासकामांपैकी फक्त एकच काम पूर्ण झाले होते आणि तीन कामे चालू आहेत. मात्र उरलेली २४ विकासकामे अद्याप सुरूही झालेली नाहीत, तरीही ह्या कामांसाठी कंत्राटदारांना पैसे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये येऊ घातला आहे. ह्या प्रस्तावावर वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि इतर ७ समिती सदस्यांनी विकासकामांची पाहणी केली. ह्याबाबतचा अहवाल शिंदे ह्यांनी अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. आता स्थायी समिती चर्चेच्या वेळी शिंदे काय भूमिका घेतात ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधले मतभेद मिटवण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम ह्यांनी एक बैठकही घेतली. त्या बैठकीतच महापूर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर ह्यांच्यात वाद रंगला.
रितू तावडे ह्यांच्या पीएच्या पगारावरूनही वाद निर्माण झाला. खरेतर मुंबई महापालिकेत भाजप पूर्ण बहुमताने पहिल्यांदाच निवडून आला आहे. आज मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचे लक्ष असायला हवे. मग ती पाणीसमस्या असो, रस्त्यावरचे खड्डे, सांडपाणी निचरा, कचऱ्याचे ढीग, वाहतूककोंडी, पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठणे, हे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांच्यातील अंतर्गत वादच पुढे येत आहे. ह्या सगळ्या वादाबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना रितू तावडे ह्यांचे डोळे पाणावले. हे सगळे कटकारस्थान पक्षातीलच काही ज्येष्ठ नेते करत आहेत, असे त्या म्हणाल्या. ह्यानिमित्ताने मुंबई महापालिकेतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता रितू तावडे ह्या राजकीय कोंडीतून कशा बाहेर पडतात आणि पक्षांतर्गत विरोध मावळतो का, हे येणारा काळच ठरवेल.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

