पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी ‘आवडता-नावडता’ अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’, या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात सिंग बोलत होते.
महेंद्र नारायण सिंग उपाख्य एम एन हे राज्याला लाभलेले अतिशय चांगले अधिकारी होत. त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील तसेच आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतरची कारकीर्द पाहिलेली आहे. उंचपुरे, शरीरयष्टीही उत्तम, ‘ही कॅर्रीस द युनिफार्म’, अशी ख्याती असलेल्या या अधिकाऱ्यास ‘पोलिसांतील अमिताभ’ असे खाजगीत म्हणत असत! मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावेळीही आपल्या कार्यकुशल तत्परतेने त्यांनी दीर्घकाळ चाललेले आंदोलन चांगल्या रीतीने हाताळले होते. अशा अधिकाऱ्याच्या तोंडून सल्लावजा काही विधाने आली की, त्या विधानांना आपसूकच वजन मिळते. यासाठीच एम एन यांच्याबाबतचे ‘दळण’ दळले!
आवडता-नावडता अधिकारी अशी वर्गवारी करू नये, कारण आयुक्त वा कोणताही अधिकारी नियम आणि कायद्याच्या आधारेच काम करत असतात. किंबहुना तसेच करणे त्यांच्याकडून अपेक्षित असते, अशी पुस्ती जोडून एम एन म्हणाले की, आयुक्तांची ‘टर्म’ त्यांना पूर्ण करू द्यावी. कारण, पवार यांच्या या पुस्तकात काही आयुक्तांना अत्यन्त कमी कालावधी मिळाल्याचेही नमूद केले आहे. पुस्तकातील या नोंदीचा उल्लेख करून ते म्हणाले की, आयुक्तांना नियमानुसारच काम करावे लागते. म्हणून त्यांना कमी कालावधी देणे, हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच आहे. सरकारविरुद्ध आंदोलन करणारे म्हणजे दुष्मन आहेत, असे समजून त्यांच्यावर लाठीमार वा गोळीबार करणे योग्य नाही. संवादातून मार्ग काढता येऊ शकतो असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख न करता सल्ला दिला. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दोन वेळा केलेल्या अटकेचा उल्लेखही केला. शिवसेनाप्रमुखांना अटक केली असली तरी त्यांचे व आपले मैत्रीपूर्ण संबंध होते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मैत्रीचे संबंध!
प्रभाकर पवार आणि आपले मैत्रीचे संबंध असल्याचे सांगून मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती म्हणाले की, पवार यांच्या वार्तांकनाची पद्धत आपल्याला माहित असल्यानेच मी सुरक्षित असतो! मुंबई पोलिसांच्या कामगिरीवरच पोलीस आयुक्तांची प्रतिमा उभी राहत असते. म्हणूनच संपूर्ण पोलीस दलच आमच्यासाठी महत्त्वाचे असते.
मुंबईत विविध प्रकारचे गुन्हे
मुंबईने नेहमीच विविध प्रकारची गुन्हेगारी पाहिलेली आहे, तसेच पोलिसांनी ती मोडीत काढलेलेही पाहिले आहे, असे प्रतिपादन करून खासदार संजय राऊत यांनी मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.
लेखक प्रभाकर पवार यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार संजय व्हनमाने यांनी आभारप्रदर्शन केले. पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आझाद मैदान पोलीसठाण्याच्या परिसरात असलेल्या पोलीस क्लबमध्ये होता. क्लबच्या सभागृहात चांगलीच गर्दी होती. महत्त्वाचे म्हणजे आजी-माजी पोलीस अधिकारी यावेळी आवर्जून उवस्थित होते. गुन्हे वार्तांकन करणारे आजी-माजी पत्रकारांनीही हजेरी लावली होती. जुन्या मित्रांचीही फार दिवसांनी भेट झाली होती.
‘The police commissioner is not just manager, they are like the custodian of a city’s peace’ तसेच ‘Anyone can hold the helm when the Sea is calm’ ही काहीशी परस्परविरोधी असलेली विधाने डोक्यात घोळ घालू लागली… मुंबई शहराला नियंत्रित करणे एकट्या पोलीसदलाचे काम नाही. यासाठी समाजानेही मोठं योगदान देण्याची गरज असते. म्हणूनच या दोन विधानांनी डोक्यात गोंधळ घातला. आपण छोटयाछोट्या गोष्टीसाठी पोलिसांनाच दोष देत असतो (यात मीही आहे). वाहतूक पोलीस हवालदाराने शिटी वाजवली वा फोटो काढला की आपण हुज्जत घालणारच. पण लाल सिग्नल पडला की, गाडी धाववण्याऐवजी बंद करण्याचा प्रयत्न मात्र आपण करणार नाही. गल्लीत काही वेगळेच घडत आहे याचा संशय येत असला तरी गप्प राहणे आपण पसंत करणार. शाळेशेजारील टपरीवर काहीतरी वेगळ्याच गोळ्या विकायला आल्या आहेत, याची कधीही शहानिशा करणार नाही (कारण आपल्याकडे वेळ कुठाय?). म्हणूनच आयुक्त देवेन भारती कुठेतरी म्हणाले होते ते आठवले- “जसे मुंबई शहर कधी झोपत नाही, तसेच मुंबई पोलीसही झोपत नाहीत.” काही पोलीस चुकत असतीलही, नव्हे चुकतातच. तरीही कर्तव्य करणारे हजारो पोलीस आहेत, म्हणूनच या दलाची शान आहे.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

