काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशात जातील तिथे तरूणांची गर्दी खेचत आहेत. देशाच्या राजकीय पटलावर काँग्रेस पक्ष हा भाजपाचा शत्रू नंबर एक आहे. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करायचा व निवडून आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात आणायचे, अशी दुहेरी रणनिती भाजपाने अनेक वर्षे राबवली. काँग्रेस कशी कमकवुत होईल यासाठी भाजपाने सर्व उपाय योजले. गुजरात पॅटर्नचे स्वप्न दाखवून व सबका साथ सबका विकास, अशी घोषणा देऊन देशभरातील मतदारांना भाजपाने आकर्षित केले. पण बारा वर्षांत काँग्रेस नेस्तनाबूत झाली नाही. राहुल गांधी देशपातळीवर भाजपाशी एकाकी लढत आहेत. ते माघार घेत नाहीत. केंद्रीय चौकशीयंत्रणांना घाबरत नाहीत. भाजपाने त्यांची पप्पू म्हणून टिंगलटवाळी केली तरी त्यांनी मागे वळून बघितले नाही. भाजपाच्या दबावाच्या राजकारणापुढे न झुकणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. नव्या पिढीला भाषणबाजी आवडत नाही. ‘मन की बात’पेक्षा आमचे म्हणणे काय आहे, ते ऐकून घेणारा त्यांना नेता पाहिजे आहे. पोकळ वायदे, भंकस आश्वासने, कळसाला पोहोचलेला भ्रष्टाचार, हिंदु-मुस्लिम, राममंदिर, भारत-पाकिस्तान, वंदेमातरम, अशा मुद्द्यांचा राजकारणासाठी केला जाणारा वापर त्यांना पसंत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण, गुणवत्ता, रोजगार, कौशल्यविकास, नोकरी, शिक्षण संस्थांमधील सुविधा, साधनसामुग्री, या मुलभूत मुद्यांवर राजकारणात कोणाला रस नाही. आम्हाला समजावून घेणारे नेतृत्त्व नाही. आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आमच्या भावना, आमचे भविष्य यावर कुणाला विचार करायला वेळ नाही, अशी जेन झीची भावना झाली आहे. म्हणूनच मोठ्या आशेने छात्रों की गुंज, या राहुल गांधींच्या कार्यक्रमाकडे तरूणाईेचे लोंढेच्या लोंढे आकर्षित होत आहेत.
पुण्यातील कार्यक्रमात जवळपास पंचवीस ते तीस हजार महाविद्यालयीन विद्यार्थिंनी केवळ राहुल गांधींसाठी मोठ्या उत्साहाने आल्या होत्या. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कुठेही काँग्रेस पक्षाचा झेंडा, काँग्रेस पक्षाच्या नावाचा फलक, पक्षाचे चिन्ह असलेला पंजा कुठेही नव्हता. पाच तासांच्या कार्यक्रमात कोणीही काँग्रेस, असा शब्दही उच्चारला नाही. विद्यार्थिंनीचे मनोगत ऐकून घेणारा कार्यक्रम होता. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते संवाद साधतील, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात हेच नेते उशिराने येतात व भाषणबाजी करून निघून जातात. पण राहुल गांधींनी ‘छात्रों की गुंज’च्या निमित्ताने कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून टाकले. पत्रकार परिषद असो किंवा विद्यार्थी संवाद, व्यासपीठावर ते एकटेच हातात माईक घेऊन फिरत असतात, ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांना मंचावर बोलवले जाते व त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी देतात. तो किंवा ती बोलत असताना राहुल गांधी त्यांना मध्येच अडवत नाहीत, त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण मांडू देतात. त्यामुळेच आमचे म्हणणे ऐकून घेणारा देशातील पहिला नेता अशी विद्यार्थी-विद्यार्थिंनींची भावना राहुल गांधींविषयी निर्माण झाली आहे. राहुल गांधींना छात्रों की गुंज, कार्यक्रमाला तरूणाईचा मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाकडे भाजपा दुर्लक्ष करू शकत नाही.

अगोदर दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापुढे सरकारला माघार घ्यावी लागली होतीच. धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. देशभर जेन झी रस्त्यावर उतरल्याने सरकारला त्याचे गांभीर्य समजले. प्रत्येक मंत्र्याने विद्यापीठ – शिक्षण संस्थेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना पंतप्रधानांना द्याव्या लागल्या. ते स्वत: इंस्टाग्रामवरून पोस्ट करू लागले आहेत. आता मात्र राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ला कोटा, डेहराडून, प्रयागराज, नंतर पुण्यात रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाल्याने भाजपाची सारी यंत्रणा राहुल गांधींवर हल्लाबोल करण्यात गुंतली आहे. राहुल गांधी बोलतात, ते आम्ही गांभीर्याने घेत नसतो असे सांगणारे नेते गेले चार दिवस छात्रों की गुंजवर टीकेचा भडिमार करीत आहेत. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद मिळू नये, गर्दी होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाने खूप बंधने टाकली. कार्यक्रमाला परवानगी देताना जवळपास ३५ अटी घातल्या होत्या. प्रक्षोभक भाषणे करायची नाहीत, असे बजावले होते. नारळी पौर्णिमा व ईदचे कारण दाखवून पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला होता. पुण्यातला राहुल यांचा कार्यक्रम हा इव्हेंट मॅनेज होता व पैसेवाटप करून गर्दी जमवली होती, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे म्हटले. पैसेवाटप झाल्याची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ जाहीरही केले.
हा कार्यक्रम प्रमुख्याने महाविद्यालयीन मुलींसाठी होता. काँग्रेस नेत्यांच्या मालकीची कॉलेजेस आहेत. तिथे मुलींना कार्यक्रमाला जाण्यासाठी सक्ती केली जात आहे, असा प्रचार केला गेला. मुलींच्या वसतीगृहावर जाऊन त्यांना खोलीत कोंडून ठेवण्याच्याही बातम्या झळकल्या. काही मुलींना धमक्या देऊन मी तिकडे जाणार नाही, मी माफी मागते असे व्हिडिओ व्हायरल झाले. एवढेच नव्हे तर त्यात बोलणारी मुलगी घाबरून, मला आणखी काय बोलायचे आहे… असे विचारते आहे, असेही जगाला दिसले. गर्दी जमावी म्हणून विद्यार्थिनींना तीस ते पस्तीस हजार रूपये दिले, असा आरोप भाजपाने केला. तरीही तीस हजार मुली स्वत:हून आनंदाने राहुल गांधींसाठी ‘छात्रों की गुंज’मध्ये सहभागी झाल्या, हे सर्व आश्चर्यकारक होते. कार्यक्रमाला आलेल्या मुलींना तुम्हाला किती पैसे मिळाले, असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण आम्ही स्वत:हून तिकीट काढून आलोत, एक रूपयाही कोणी दिलेला नाही, असे ठणकावून विद्यार्थिनी सांगत होत्या.

छात्रों की गुंज, हा पेड इव्हेंट असेल तर लाडकी बहिण योजना काय होती? असा प्रश्न उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. राहुल गांधींबाबत विश्वास व आपलेपणा वाटतो, अशा प्रतिक्रिया अनेक विद्यार्थिनींनी बिनधास्तपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यक्त केली. माझ्या अंगात सकाळपासून ताप आहे, मांजरीत आदिवासी मुले गेल्या बारा दिवसांपासून उपोषणाला बसली आहेत, आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना भेटलो तर ते म्हणतात, सॉरी, मी काही करू शकत नाही, सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, असे एका आदिवासी तरूणीने सांगताच राहुल म्हणाले की, तुम्ही मला उपोषणासाठी का नाही बोलवत, मी येईन… एका तरूण मुलीने तर मी तुम्हाला मिठी मारू शकते का? असा प्रश्न विचारला. राहुल यांनी होकार देताच, हजारोंच्या साक्षीने त्या मुलीने राहुल यांना मिठी मारली. हे अलिंगन हे विश्वासाचे प्रतिक होते. मनुस्मृतीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, असा सल्ला राहुल यांनी विद्यार्थिनींना दिला. पण त्यावरून राहुल यांच्यावर भाजपा परिवाराने सोशल मीडियावर जोरदार हल्ला चढवला. हा सल्ला केवळ हिंदु महिलापुरताच मर्यादीत आहे का? असा प्रश्न त्याना विचारण्यात आला. पुण्याबद्दल काय सांगाल, असे राहुल यांना शेवटी विचारले तेव्हा ते चक्क मराठीत म्हणाले- पुणे म्हणजे प्रेम! या तीन शब्दांनी त्यांनी तरूणाईंची मने जिंकली. गेली बारा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशांत जिथे जातात, त्या कार्यक्रमात मोदी-मोदी अशा घोषणांचा निनाद घुमतो. पुण्याच्या ‘छात्रों की गुंज’मध्ये जेन झीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींनी राहुल-राहुल… अशा घोषणांचा दीर्घकाळ केलेला गजर भाजपासाठी इशाराघंटा तर नाही ना?
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

