Homeमाय व्हॉईसदिल्ली पोलिसांचे आता...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची ‘प्रतिमा’ बदलणार! दरवेळेस ‘पिछवाडा’ काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे ‘पिछवाडा’, ‘मादxxx’, ‘घुसा देंगे’, ‘दादीके मय्यतमे नहीं आये भोसxxxx’ ‘मारो सालोंको..’ हीच भाषा पोलिसांनी वापरलेली पाहिली आहे, ऐकली आहे आणि आता एकदम ‘यु टर्न’ बात कुछ हजम नहीं हो रही… पण तुमच्याआमच्या नशिबाने हे खरं आहे. अलीकडेच दिल्ली मुक्कामी जंतरमंतर येथे जेन झी, कॉक्रोच जनता पार्टी व विद्यार्थ्यांच्या निदर्शनाच्या वेळी पोलिसांनी जे बेछूट वर्तन केले व विरोधी पक्ष तसेच आम जनतेचा प्रचंड रोष ओढवून घेतल्यानेच दिल्ली पोलीस प्रशासनाने ही नियमावली जाहीर केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पोलिसावाले बाबू दंडा…

या आंदोलनातील पोलिसांच्या वर्तनाविरुद्ध ‘पोलिसावाले दादा दंडा चला दे’ हे गाणे सध्या विद्यार्थीवर्गात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. देशातील सर्व पोलिसांनी एकदातरी हे गाणे ऐकावे, अशी आमची विनंती राहील. जंतरमंतरवर झालेल्या या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटल्याने सरकार तसेच पोलीसयंत्रणा कधी नव्हे इतकी खडबडून जागी झाली व ही पोलिसांसाठीची नियमावली बाहेर आली. पोलिसांसाठी केलेली ही नियमावली संपूर्ण दिल्ली राज्यासाठी असून निदर्शने, हरताळ, मोर्चे आदी आंदोलनाच्या सर्व प्रकारांच्या वेळी असेच वर्तन अपेक्षित असल्याची समजही सर्वाना देण्यात आल्याची समजते! ही नियमावली म्हणजे सुचिन्ह आहे. दिल्ली पोलिसांचा हा कित्ता सर्वांनीच गिरवण्याची गरज आहे.

प्रत्येकाकडे कॅमेरा

जंतरमंतर आंदोलनाच्या वेळेस पोलिसांचे प्रत्येक वर्तन विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यात टिपून समाजमाध्यम, विशेषतः इन्स्टाग्रामवर सरकार व पोलिसांना उघडे पाडले होते. याचा धसका पोलिसांनी घेऊन निदर्शनावेळेस प्रत्येकाच्या हातात कॅमेरा असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी हात जोडून त्यांचे स्वागत करावे. जवळ जाऊच नये, असे सक्त आदेशवजा सूचना देण्यात आल्या आहेत. भाषा ही संयमाची व मृदू असावी, जसे की ‘छोरे, इतना आवाज नहीं करते’, ‘बेटी जरा धीरे से’ ‘मौसी कुछ हुआ है क्या’ ‘चाचाजी आवाज मत बढाईये’… पोलीस अशी आर्जवे करत असतानाची दृश्ये विलोभनीय असतील नाही. निदर्शने करत असताना आंदोलक आजारी झाल्यास त्वरित पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्याने सर्व चित्रित करावे. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांची काळजी घेणे वगैरे गोष्टी समंजसपणे पार पाडाव्यात! मुख्य म्हणजे या आंदोलनाच्या काळात पोलिसांनी शांत राहून पाहवे व अगदीच हिंसा किंवा जमाव अनावर होऊन काही विपरीत करायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हीही तुमचे कॅमेरे तयार ठेवा. हे सर्व करत असताना तुम्ही तुमचा संयम ढळू देऊ नका!

उचकावू नका

तरुण निदर्शकांना उगाचच उचकावू नका. त्यांच्यासमोर शांत राहा. नेहमीप्रमाणे त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही अरे म्हटलेत की ते कारे म्हणणारच, हे पक्के लक्षात ठेवा.

“मंत्री हा जुल्मी गडे, यास पुन्हा निवडू नका

छळीतो हा फार तुम्हा, यास मत देऊ नका।।

साधूचा आव जनी

सत्तेची हाव मनी

मागील दारी घुसूनी

खातो हा भाव फुका!

मारी उड्या टना टना

नच अंगी नम्रपणा

मग्रुरी दावी जना

यास भीक घालू नका (केशवकुमार)

असे विडंबनकाव्य असेल तरीही निदर्शकांवर कारवाई नको. आजच या नियमावलीबाबत उलटसुलट काही लिहीत नाही. पण मनात जरूर शंका आहे. या एका नियमावलीने दिल्ली पोलिसाचे मत परिवर्तन होईल?

“दुनिया जिसे कहते हो,

जादू का खिलोना है

मिल जाये तो मिट्टी है,

खो जाये तो सोना है” ( निदा फाजली)

अशी काहीशी अवस्था नाही झाली तरी मिळवले!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

Continue reading

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ...

पूर्णेकरांवर झाडलेल्या गोळ्या पप्याच्या ‘घोड्या’तूनच!

प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या 'घोड्या'तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे. "थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू...

ठाण्यात पोलिसांसमोरच तुडवले जाते तर नेते पाहतही नाहीत सूर्योदय!

एखादी ओटीटीवरील सिरीज पाहतोय असं तर वाटतं नाही? मलाही प्रथम असच वाटत होतं. पण ठाणे शहरात घटनाच अशा घडत आहेत की ओटीटी निर्मात्यांनीही तोंडात बोटे घालावीत! कालच्या गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे पोलिसांचे जणू ग्रहच बदललेत असं वाटतं. शुक्रवार-शनिवार गणपती विसर्जनात...
Skip to content