Homeमाय व्हॉईसआभासी माध्यमाद्वारे अमेरिकेतून...

आभासी माध्यमाद्वारे अमेरिकेतून भारतात हिट केले गेलेले स्लोगन ‘कॉक्रोच’!

प्रत्येक कालखंडात एखादे वाक्य, एखादी चमकदार शब्दरचना जनमन मोहवते. लोक त्याच स्लोगनभोवती विचार करतात. त्यातून त्या वाक्यार्थाचे वलयही वाढते. “इंदिरा इज इंडिया”, असे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष सत्तरच्या दशकात म्हणाले. तेव्हा त्याविरोधातील लोक, नेते, पक्ष एकत्र आले होते.  गरिबी हटाव, या अशाच एका घोषणेने देशभरात काँग्रेसच्या बाजूने लाट उसळली. त्या निवडणुकीत विरोधी पक्ष अक्षरशः वाहून गेला होता. २०१४च्या निवडणुकीआधी, “चायवाला पंतप्रधान होईल कसा” असे, मोदींना उद्देश्यून, काँग्रेसचे नेते म्हणाले तेव्हा खळबळ उडाली. राजकारण ढवळून निघाले. त्या निवडणुकीत जनतेने चायवाल्याला खरोखरीच पंतप्रधानपदावर बसवले. भाजपाने “चाय पे चर्चा” असे हजारो कार्यक्रम देशभरात घडवून प्रचाराची दिशाच बदलून टाकली. गुजरात राज्याच्या एका निवडणुकीत सोनिया गांधींनी प्रचारसभेत मोदींना “मौतका सौदागर” ठरवले. पण तेव्हाही उलटाच परिमाम दिसला. २०१९च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानांना उद्देश्यून म्हणाले, “चौकीदार चोर है” त्यावर उलटी मोहीम सुरु झाली की “मै हू चौकीदार!” लाखो लोकांनी मै भी चौकीदार, असे स्टेटस ठेवले. इंटरनेटवरून त्याचा जोरदार प्रचार झाला. निवडणूक प्रचारसभेतूनही त्याच वाक्याचा धुरळा उडवला गेला.

या साऱ्या शब्दांतून, वाक्यांतून जनमानस ढवळण्याची ताकद होती. सध्या अशाच एका शब्दप्रयोगाचा धुमाकूळ सुरु आहे. “मै-हूँ-कॉक्रोच” असा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आला होता. “बेकार तरुणांमध्ये काहींची वृत्ती झुरळासारखी असते. ते व्यवस्थेवर हल्ला करत राहतात, व्यवस्थेचा फायदा घेतात”, अशा अर्थाचे उद्गार देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सर्वोच्च न्यायालयात काढले. त्यावरून, बेकार तरुणांना झुरळ ठरवले हेच पुढे आले आणि त्यातून कुठेतरी लोकांच्या मनात एक ठिणगी पडली. कोणत्याही केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काही प्रमाणात असंतोष नेहमीच धगधगत असतो. सरकार चालवणाऱ्यांनाही त्याचा अंदाज असतोच. म्हणून मग असंतोष थंड करण्याचे, निदान कमी करण्याचे, “लाडकी बहीण” योजनेसारखे उपक्रम राबवले जातात. सध्या देशातली स्थिती थोडी विचित्र झाली आहे. आखाती युद्धाचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणे अपरिहार्यच आहे, हे सर्वांचा कळत होते. पटतही होते. लोक दरवाढीसाठी तयार होते. पण मोदी सरकारने महत्त्वाच्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर मुद्दाम स्थिर ठेवले आणि नंतर लगेचच तीन महिने ताणून धरलेले तेल कंपन्यांचे लगाम सरकारने सोडून दिले. आखाती देशांकडून येणाऱ्या तेलवाहू जहाजांचा ओघ मंदावला तेव्हा कंपन्यांनी इंधनाची पुरवठा साखळीही मंदावत गेली. लगेचच पेट्रोल पंपावर आणि गॅस दुकानांवर सिलेंडरच्या रांगा लागल्या. मोटारींचा गॅसही मिळणे मुश्कील झाले. मुंबई, पुण्यात नाही पण अन्यत्र, गावांत स्थिती बिकट होती व आहे. हीच स्थिती देशभरात आहे.

स्लोगन

नीट परीक्षेच्या गोंधळाने तरुणाई संतापलेली आहे. तेवीस लाख मुले व त्यांचे कुटुंबीय, असे करोडभर लोक नीटचे बळी ठरले आहेत. त्याविरोधातील राग खदखदतच होता. त्याचवेळी मोदींनी देशाला परकीय चलनाची बचत करण्याचा सल्ला दिला. त्याहीविरोधातील स्वर तीव्र होत गेला. बेकारी वाढलेली आहेच. ज्यांच्याकडे विशेष कौशल्य नाही असे करोडो तरूण-तरुणींचे तांडे अल्प पगारांच्या नोकऱ्यांत असमाधानी तर असणारच. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर सात दिवसांत सात रुपयांनी वाढवले गेल्याने महागाईची मोठी लाट येणार, यातही शंका असायचे कारण नाही. अशा स्फोटक क्षणीच सरन्यायाधिशांचे, “बेकांरांना झुरळ ठरवणारे” उद्गार आले व ते माध्यमांनी तीव्रतेने झळकवले. लोकांमधील संतापाला इंटरनेटवरून आवाज मिळाला तो, “कॉक्रोच जनता पार्टी”च्या अचानक अवतारामुळे. विनोदी भासणाऱ्या या नावाने व्यवस्थेच्या विरोधातील घोषणेचा सूर उमटत होता. इंटरनेटवर वणवा पेटला. दोनचार दिवसात ती वेबसाईट, एक्स व इन्स्टा अकाऊंट यावर करोडो लोकांचा सहभाग दिसू लागला. सहाजिकच भाजपाने सरकारविरोधातील विरोधकांची मोहीम, असे या झुरळ (कॉक्रोच) पार्टीचे चित्र रंगवायचा प्रयत्न केला.

खरेतर सरन्यायाधीशांनी सर्व तरुणांना, “बेकार आळशी झुरळासारखे” म्हटलेच नव्हते हेही लक्षात घ्यायला हवे. “दिल्ली उच्च न्यायालयाला आदेश द्या की, मला सिनियर कौन्सिल हे बिरूद दिले पाहिजे,” अशी फिर्याद घेऊन वकील संजय गुप्ता सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या सुनावणीत सूर्य कांत भडकले. “अनेक लोक कायद्याच्या संशयास्पद व बोगस पदव्या घेऊन फिरतात. त्यांची खरेतर सीबीआयने चौकशी केली पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या वकिलाला झापताना सरन्यायाधीश म्हणाले की, “काही बेकारांना मीडिया, सोशल मीडिया तसेच माहितीचा कायदा वगैरे साधनांनी व्यवस्थेवर हल्ला करायचा असतो. हे झुरळासारखे कुठूनही येतात!” असे सूर्य कांत साहेब केवळ वकिली व्यवसायातील लोंढ्यांविषयी म्हणाले. ते सरसकट बेकारांना झुरळ म्हणालेच नव्हते. पण कॉक्रोच शब्द बेकारांसाठी वापरला हेच टीव्हीवरून, इंटरनेटवरून आणि वृत्तपत्रांतील बातम्यांमधून 15 मे रोजी ठळकपणाने आले. दुसऱ्याच दिवशी अभिजीत दिपके याने “आय-एम-कॉक्रोच” हा हॅशस्टॅग सुरु केला. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून नेटवर, “कॉक्रोच जनता पार्टी” हा अवतार दिसू लागला. जी एक खदखद जनतेत विविध कारणांनी होती त्याला या शब्दांची ठिणगी पुरेशी ठरली. नऊ-दहा कोटी फॉलोअर्स दिपकेच्या अकाऊंटना दोनचार दिवसांतच मिळाले. मग भारत सरकारच्या सुरक्षायंत्रणा जाग्या झाल्या. त्यांच्या तक्रारीवरून कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट अचानक बंद झाले. त्याचा निर्माता अमेरिकेत बसून भारतातील जनतेला भडकवायचे काम करतो असे भाजपा प्रवक्ते, नेते सांगू लागले.

स्लोगन

कॉक्रोच जनता पार्टी, हे नाव घेऊन इन्स्टा खाते सुरु करणारा तरूण आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा मूळ रहिनवासी! अभिजीत दिपके आता अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी गेला आहे. त्याने इंटरनेटवर झुरळाची आग पेटवल्यानंतर त्याच्याही राजकीय पार्श्वभूमीवर प्रकाशझोत फिरला. तेही सहाजिकच आहे. दिपके हा दिल्लीतील आप सरकार व आम आदमी पक्षाच्या इंटरनेट आघाडीचा बिनीचा शिलेदार असल्याचे दिसले. त्याने 2024च्या दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या पक्षासाठी नेटवरील प्रचाराचे मोठे काम केले होते. बोस्टनला जाण्यासाठीही त्याला केजरीवालांचे नेते, माजी उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया यांनी मदत केल्याचे दिपकेच्या एक्स पोस्टमुळे कळले. म्हणजेच विरोधी पक्षातील एका तरुणाने सरकारविरोधात असंतोषाचा वणवा पेटवण्यासाठी सरन्यायाधीशांच्या उद्गाराचा आधार घेतला. त्याचे करोडो फॉलोअर्स दिसतात. त्यात बहुसंख्य आभासी आहेत, म्हणजेच खरे फॉलोअर्स नसून ते सारे “बोट्स” आहेत, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान अभिजीत दिपके याच्या संभाजीनगरातील घराबाहेर पोलीस तैनात झाले आहेत. कारण त्याला व कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असे त्यानेच सांगितले आहे.

दिल्लीत एकाने कॉक्रोच जनता पार्टी, हे अधिकृत नाव व पक्षचिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे, हीही बाब लक्षणीय ठरते. पण खरोखरीच असा राजकीय पक्ष निघाला तर लोक त्याला विचारणारही नाहीत, हेही उघड आहे. इंटरनेटवर झालेल्या गर्दीत हास्यविनोद करणारेच अधिक दिसले. मीम्स निघाल्या. त्या व्हाटसपवरून जोरात फिरल्या. पण त्या साऱ्याचा परिणाम प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणार का? त्यासाठी केजरीवाल, राहुल गांधी, सेना उबाठाचे युवराज आदित्य, असे सारे नेते त्या आभासी वणव्याची प्रत्यक्ष ठिणगी जनतेत दिसावी याचे प्रयत्न नक्कीच करत आहेत. पण  झुरळ पार्टीचा तसा फायदा विरोधकांना होणार नाही. दिपकेने कॉक्रोच बाहेर काढल्यावर अन्य तरुणांनी झुरळाचा नायनाट करणाऱ्या ओगी मांजराच्या नावाने, “ओगी जनता पार्टी” इंटरनेटवर सुरु केली. युरोप अमेरिकेत “ओगी अगेन्स्ट कॉक्रोच” ही लोकप्रिय कार्टून मालिका पूर्वी चालली होती. तो संदर्भ ओगी नावात उचलला आहे. भारत सरकारने तक्रार केल्यानंतर इन्स्टा एक्सवरून झुरळ पार्टीचे अकाऊंट हटवले गेले. पण लगेचच कॉक्रेच इज बॅक असे अकाऊंट सुरु झाले. आभासी जगात एखादा नवा ट्रेंड आला की जुना आपोआप बाजूला पडतो. तसे हे झुरळ हळुहळू चर्चेतून अदृष्य होईल का? केजरीवाल आणि राहुल यांना झुरळाने बराच उत्साह दिला. मोदी सरकार पडणार असे भाकित दोघांनीही करून टाकले आहे. पण कोणीही केलेली शिविगाळ वा दिलेली दूषणे जनमोहिमेत परावर्तीत होणे हेही अवघड असते. खरे मुद्दे असतील तरच आंदोलन पेटते. जसे अण्णा हजारेंचे आंदोलन पंधरा वर्षांवूर्वी देशाला हादरवून गेले होते. शेतकरी व ग्रामीण भारताचे प्रश्न, नागरिकत्वाचे मुद्दे आदींवर चार वर्षांपूर्वी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरु झाले. पण अशी कोणतेही राजकीय मोहीम  मोदी-शाहांच्या भाजपाविरोधात प्रत्यक्ष मतदानात मात्र निष्फळ ठरते. म्हणून मग “श्रीलंका आणि नेपाळप्रमाणेच भारतीय तरुणांनी रस्त्यावर उतरायला हवे” असे आवाहन केजरीवाल करत आहेत. काँग्रेसनेही देशभर इंधन दरवाढी व महागाईविरोधात मोर्चे, सभांना सुरुवात केली आहे. तेही “जेन झी”ला आवाहने करत आहेत. पण नेपाळ, श्रीलंका व बंग्लादेशातील स्थिती भारताच्या सध्यस्थितीच्या मानाने शतपटीने बेकार झालेली होती. तिथे महागाईने कळस गाठला होता. अनागोंदी झाली होती. तसले काही सुदैवाने भारतात झालेले नाही. तरीही तसे काही घडवावे यासाठीच तर ही झुरळे सोडलेली नाहीत ना?

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश््लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सत्तेपाठोपाठ ममतांची तृणमूलवरची पकडही गेली!

देशाच्या राजकारणात तब्बल पन्नास वर्षांनंतर अशी स्थिती आली आहे की, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एकाच पक्षाचे राज्य आले आहे. १९७७मध्ये पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे, हे मुख्यमंत्री होते तर दिल्लीत इंदिरा गांधींचे काँग्रेसचे राज्य सुरु होते. त्यानंतर...

पुस्तक पानसरेंचे, थयथयाट गायकवाडांचा! महाराज वेठीला!!

कम्युनिस्ट विचारवंत व लेखक गोविंद पानसरेंनी ८०च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तिका प्रकाशित केली. पंच्याहत्तर पानी सुधारित आवृत्तीची किंमतही फक्त पाच रुपये ठेवली होती. पहिली आवृत्ती हातोहात विकली गेल्यानंतर पहिल्याच वर्षी १९८८मध्ये तीन वेळा पुस्तक छापले गेले. नंतर...

गोष्ट तुकडा पडलेल्या एका सफरचंदाची!

सफरचंदाचा एक तुकडा कोणीतरी दातांनी चावून तोंडात टाकल्यावर उरलेले सफरचंद जसे दिसते ते आहे एपल कंपनीचे प्रतीकचिन्ह. एक ट्रिलियन डॉलर्स एव्हढी महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था झालेली नाही. तो टप्पा गाठणे हे सध्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे ध्येय्य आहे, प्रयत्न आहे. आणि...
Skip to content