Homeबॅक पेजराजेश खन्नाच्या मर्जीमुळे...

राजेश खन्नाच्या मर्जीमुळे डब्यात गेली ‘नौकरी’!

काळ बदलला.. अनेक गोष्टी बदलल्या… संदर्भ, तपशील बदलले. एकेकाळी एखादा चित्रपट काहीना काही कारणास्तव रखडला रे रखडला की, पब्लिकचा त्या चित्रपटातील रस उतरत, घसरत, संपत जात असे आणि असा एखादा चित्रपट पडद्यावर येई तो उतरण्यासाठीच! अशी उदाहरणे अनेक आहेत. एकच भारी नाव सांगतो, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी’ (१९७९). यात राज कपूर आणि राजेश खन्ना यांच्या भूमिका आहेत. बस्स एवढंही.. हा चित्रपट पडद्यावर कधी येतोय नि कधी पाहतोय असं अनेकांना झाले. राजेश खन्नाची काही काळ विशेष मर्जी बसलेली जाहिरा यात त्याची नायिका होती. (अशा अनेक जाहिरा, शीतल, श्यामली, सोनिया, प्रेमा नारायण यांची माहिती गुगलकडेही नसावी आणि असली तरी त्याचा उपयोग शून्य). हा चित्रपट ‘नमक हराम’ (१९७३)चे निर्माते आर एस जे कम्बाईन, हे होते. राजेश खन्ना तारखाच देईना. दिल्या तर रद्द करे. वापरल्या तर सेटवर उशिरा येई. एकूणच पिक्चरचं काय झाले हे वेगळे सांगायला नकोच आणि अशा रखडलेल्या चित्रपटात रसिकांना रस असण्याचे कारणच नसे.

चित्रपट आजही रखडतात. मग त्याची कारणे काहीही असोत. पण आता असा एकदाचा पूर्ण झालेला अथवा पूर्ण होऊनही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाला ओटीटी, हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तसं पाहिलं तर ओटीटी प्लॅटफॉर्म बरेच आहेत आणि त्याची चित्रपटाचे हक्क देण्याची किंमत वगैरे नियम वेगळे आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, असा ओटीटीचा का होईना, पण एकदाचा आपल्यासमोर आलेला चित्रपट आठवडाभरात पाहणारा चार-पाच लाख चित्रपटरसिक नक्कीच आहे. विद्या बालन आणि इरफान खान यांची भूमिका असलेला ‘द लास्ट

टेन्ट’ हा हिंदी चित्रपट अगदी असाच आहे. नीना दासगुप्ता आणि सार्थक दासगुप्ता निर्मित आणि सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट खरंतर २००१ साली एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता. (तेव्हा मल्टीप्लेक्स कल्चरची नुकतीच सुरुवात झाली होती.) पण, चित्रपट पूर्ण होऊनही काही तांत्रिक कारणांमुळे तो प्रदर्शित झाला नाही. विद्या बालन नुकतीच हिंदी मालिकांच्या जगातून चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर येत होती.‌ इरफान खानही स्थिरावण्यासाठी धडपडत होता. या चित्रपटात अन्नू खंडेलवाल, सौरभ अग्रवाल, सतीश कालरा, आनंद मिश्रा, सम्या साची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मध्यंतरी एक बातमी होती की, सार्थक दासगुप्ता हे अमोल पालेकर आणि रिंकू राजगुरू यांना घेऊन ‘हल्ला हो’ या नावाचा चित्रपट निर्माण करणार आहेत. चांगली वाटणारी ही कल्पना तशीच कागदावरच राहिली. असं अनेकदा होते. इरफान खानचे २९ एप्रिल २०२० रोजी आकस्मिक निधन झाले. एक वेगळा विचार करणारा असा हा कलावंत. त्याच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त हा चित्रपट ओटीटीवर येताच त्याला चक्क उत्तम प्रतिसाद मिळू लागला. हे काहीसं अनपेक्षित होते. विद्या बालन आणि इरफान खान यांच्यामुळे हे घडत असावे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी यू ट्यूबवर सतत‌ जगभरातील विविध गोष्टीतील काही ना काही शोधत असते. त्यात विद्या बालन आणि इरफान खान अशी जोडी दिसताच कुतुहल वाढले असणार. बरं.. अशा चित्रपटाच्या प्रमोशन, मार्केटिंग आणि प्रदर्शन यांचा अफाट खर्च नाही. त्याचं टेन्शन नाही. पूर्वी आपल्याला चित्रपटाकडे जावे लागे. आज चित्रपट आपल्याकडे (यू ट्यूब, ओटीटी) येतोय. त्यात रखडून रखडून एकदाच्या आलेल्या चित्रपटालाही थोडासा का होईना पण स्कोप आहे हे दिसतेय.. पूर्वी चित्रपट रखडला की कायमचा डब्यात जायचा. आणि सगळंच वाया जाई. आता तसं काही होत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही कृपा!

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आमिर खानकडून दादासाहेब फाळके चरित्रपट तूर्त स्थगित

निर्माता म्हणून आमिर खान प्रयोगशील आहे. व्यावसायिक चौकट, मनोरंजनमूल्य प्रभावी ठेवत वेगळा विषय रुपेरी पडद्यावर आणतो हे त्याच्या आमिर खान प्राॅडक्शनच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' (२००१)च्या वेळीच दिसून आले. 'लगान'ला ऑस्करच्या स्पर्धेत विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळाले आहे आणि...

८ तासांच्या शिफ्टनंतर दीपिका पदुकोणला हवा स्वतःसाठी वेळ!

चित्रपटाच्या जगात वावरण्यासाठी आपण दिवसातील किती तास द्यायचे आणि आपल्या घरासाठी/ कुटुंबासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित मांडता येईल का? स्पर्धात्मक युगात ते शक्य आहे का? अशी वर्गवारी करता आलीच तर बरे होईल असे दीपिका पदुकोण म्हणेल आणि कंगना...

आता मुंबईतला ‘मटका’ नागराज मंजुळेच्या हाती!

'मटका किंग' म्हणताच चित्रपटरसिकांच्या पन्नाशी ओलांडलेल्या पिढीला फिरोज खान अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित 'धर्मात्मा' (१९७५) आठवला असेल तर त्याच वयाच्या पण फारसे चित्रपट न पाहिलेल्या परन्तु सामाजिक भान असलेल्यांना ओरिजनल मटका किंग रतन खत्री आठवला असेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित...
Skip to content