Homeडेली पल्सपंतप्रधान मोदी करणार...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तांत्रिक नवोन्मेष आणि आधुनिक वाहतूक उपाययोजनांच्या माध्यमातून पुण्याच्या नागरी दळणवळण पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प, महत्त्वाचा आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

सुमारे 23 किलोमीटर लांबीची ही पिंक लाईन, माण ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक, अशी धावेल. या मेट्रो मार्गिकेमुळे हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगरदरम्यान मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एका ठिकाणी पोहोचणे अधिक सुलभ होईल तसेच हजारो आयटी व्यावसायिक आणि इतर प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होईल. ही मेट्रो मार्गिका, सध्याच्या मेट्रो नेटवर्कशी जोडली जाणार असून, त्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये अखंडित मेट्रो संपर्कव्यवस्था उपलब्ध होईल. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे, वाहतूककोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे तसेच प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ करणे, यासाठी ही मार्गिका उपयुक्त ठरेल. पिंक लाईनचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर देण्यात आलेला भर. या मार्गिकेवरच्या रेल्वेगाड्या पूर्णपणे महिला चालकांकडून चालवल्या जाणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. या प्रकल्पात पर्यावरणीय शाश्वततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 30 टक्के वीज सौरऊर्जेतून मिळवण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही करणार आहेत. सुमारे 13,500 कोटी रुपये खर्चून हा टप्पा विकसित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या 2अ, 2ब, 4 आणि 4अ या मार्गिकांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारेल आणि महत्त्वाच्या निवासी, व्यावसायिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधली संपर्कव्यवस्था अधिक मजबूत होईल. दुसऱ्या टप्प्यातल्या 2अ आणि 2ब या मार्गिकांची एकूण लांबी सुमारे 12.75 किलोमीटर असेल. 2अ ही मार्गिका वनाज ते चांदणी चौक, तर 2ब ही मार्गिका रामवाडी ते विठ्ठलवाडी, अशी असेल. त्यामुळे सध्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो जाळे विस्तारेल. सुमारे 25.52 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4 खराडी ते खडकवासला, अशी असेल. 6.12 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4अ नळ स्टॉप ते माणिकबाग, अशी असणार आहे.

या नव्या मेट्रो मार्गिकांमुळे खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, माणिकबाग, नांदेड सिटी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वारजे यांसारखी अनेक ठिकाणे एकमेकांना जोडली जातील. रामवाडी ते विठ्ठलवाडी या पूर्वेकडच्या विस्तारित मार्गिकेमुळे खराडी आणि वाघोलीतल्या झपाट्याने विकसित होत असलेल्या निवासी, व्यावसायिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांची संकुले अधिक सुलभपणे जोडली जातील. स्वारगेट, नळ स्टॉप आणि खराडी बायपास इथल्या अदलाबदल सुविधांद्वारे या मार्गिका आंतरशहरी बससेवा तसेच सध्याच्या पुणे मेट्रोशी जोडली जातील. त्यामुळे पुण्याच्या विविध भागांदरम्यान सहज प्रवास करणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...
Skip to content