श्री: आज मार्केटमध्ये पाहिले तर काय दिसते?
सौ: काय दिसते?
श्री: प्रचंड गर्दी झालेली आहे खरेदीसाठी.. चालायला जागा नाहीये..
सौ: पण, चालायला मार्केटमध्ये कशाला जायचं? गोल्फ क्लबवर जावं..
श्री: (उपहासाने) आपल्या कॉलनीत बागेला चकरा मारायलाही हरकत नाही.
सौ: आपलं वय बघा.. सिनेमातल्या हीरोसारखे जाल हिरॉईनच्या मागे… चकरा मारायला आणि याला गाल रंगवून..
श्री: अगं, मी काय म्हणत होतो आणि तू कुठे विषय नेलास!
सौ: बरं बोला..
श्री: तर मी म्हणत होतो, मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली आहे. किराणापासून मोबाइलपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून वाहनांपर्यंत. खरेदीच खरेदी!
सौ: हो. ज्वेलर्सच्याही दुकानात गर्दी दिसतेय ना… मग आपणही काहीतरी खरेदी करू या ना..
श्री: गर्दी तर घरखरेदीसाठीही झाली आहे, म्हणून आपण काय फ्लॅट खरेदी करणार का? आपल्याकडे आहे ना चांगला फ्लॅट.
सौ: मग?

श्री: अगं, खरेदी करायला हवी ती जीवनावश्यक वस्तूंची आणि जमलं तर चार पैसे गाठीशी बाळगायला हवे.
सौ: म्हणजे खरेदीला आळा घालायचा, असंच ना..
श्री: हो. शेअर बाजारात दोनचार दिवसांपासून तेजी दिसू लागली आहे. इराणचं युद्ध आता फार ताणलं जाईल असं वाटत नाही. युरोपही हळूहळू शांत होईल.. पण लगेच ‘अच्छे दिन’ आले म्हणून नाचत सुटायची गरज नाही. आणि माझ्यामुळे आले अशा भ्रमात तर कोणी छाती ठोकण्याची गरज नाही.
सौ: मग काय करायचं?
श्री: परिस्थिती बदलतेय. पण आपल्याकडच्या दुष्काळाचं काय करणार? सगळं ठीकठाक होईपर्यंत पेट्रोल आणि पाणी जपून वापरायचं..
सौ: पटतंय..
श्री: कोल्हापूरातलं ऊस उत्पादकांचं आंदोलन मागे घेतलं असलं तरी त्यांच्या हातात लगेच पैसा पडणार नाही.
सौ: मी आजच बातमी वाचली- एसटी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये बोनस मिळाला.
श्री: पण त्यासाठी त्यांना आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागला. हेच पैसे आधी देता आले नसते?
सौ: यांच्याकडे २०० व्होल्वो बसेस घ्यायला पैसे आहेत. पण गरीब कर्मचाऱ्यांना द्यायला नाहीत. राज ठाकरे म्हणतात ना- अकलेचा दुष्काळ तसा संवेदनशीलतेचाही दुष्काळ आहे.
श्री: नाही तर काय? रेल्वे कर्मचाऱ्यांना मागच्याच महिन्यात ७८ दिवसांचा बोनस जाहीर झाला. त्यासाठी २००९ कोटी रुपयांची तरतूद झाली. इतर ठिकाणीही चांगल्या बातम्या आल्या. इथेच का हात आखडता?
सौ: अहो, त्यांचंच काही चालत नसेल सरकारमध्ये.
श्री: स्वतःच्या पक्षाऐवजी दुसऱ्यासाठी हातात लाल रंगाचा डबा घेऊन उभे राहिल्यावर याना काय किंमत राहणार?
सौ: जाऊ द्या. उशिरा का होईना एसटी कर्मचाऱ्यांनाही चार पैसे मिळाले ना.. आता शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि ग्रामीण भापर्यंत सगळ्यांची दिवाळी आनंदात जातेयं ना! झालं तर…
(दोघे एकमेकांकडे पाहत)
(लेखक आप्पा नाशिककर ज्येष्ठ पत्रकार व ललित लेखक आहेत.)

