सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या १3व्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. ह्यावर्षी शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही. कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. मात्र ती जास्तीतजास्त ३५ मिनिटांची असावी. ह्या शॉर्ट फिल्म्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील. ह्याव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतील शॉर्ट फिल्म्सना सबटायटल्स असावेत.

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी गूगल फॉर्मवर फिल्म सबमिशन आणि पेमेंट करून ३० नोव्हेंबरपर्यन्त पाठवायच्या आहेत. प्रवेशमूल्य रु. १००० /- आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला रु. १५,००० /-, द्वितीय क्रमांकाला १०,००० /- आणि तृतीय क्रमांकाला रु. ७,५०० /- अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. ह्याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणास पारितोषिक देण्यात येईल. ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक राजन वाघधरे, जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क- विहान आपटे (९७६९३३१२८७)

