Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांची...

महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांची राष्ट्रीय पातळीवर दखल

मुंबईसह महाराष्ट्रात लव्ह जिहादची एव्हढी प्रकरणे बाहेर येत आहेत. भोंदू अशोक खरात आणि त्याच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या, शोषणाच्या, फसवणुकीच्या कथा गेला महिनाभर बाहेर येत आहेत, त्याच्या व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. नाशिकमधील टीसीएस, ह्या नामवंत कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण गाजते आहे. तेथे काम करणार्‍या महिलांना  धमक्या, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापाठोपाठ परतवडा येथील महिलांच्या, तरुण मुलींच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अर्थात आरोपींना अटकही झाली आहे आणि आता मुंबईतही कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण घडले आहे. त्याची  पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. आता पोलिस ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सगळी प्रकरणे बघता, महाराष्ट्रात काय चालले आहे असा प्रश्न पडतो. पोलिस आणि गृहखाते काय करत आहे? राष्ट्रीय महिला आयोगाने ह्या प्रकरणांची दाखल घेतली असून, महिला आयोगाचे पथक नाशिक येथे जाऊन पीडितांना भेटून, त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. आता ह्या घटनांचा अहवाल महिला आयोगाकडून अपेक्षित आहे.

ह्या पार्श्व्भूमीवर राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र सरकारचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान ह्या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर ह्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. माध्यमांनी महिलांचे प्रश्न केवळ गुन्हेगारी घटनापुरते मर्यादित न ठेवता, सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मीडिया ट्रायल टाळणे, न्यायप्रक्रियेचा सन्मान राखणे आणि वंचित आणि तळागाळातल्या महिलांच्या आवाजाला मुख्य प्रवाहात आणणे, ही माध्यमांची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे त्या म्हणल्या.

महिला

घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, नव्याने लागू झालेल्या कायदेशीर तरत्तुदी, पोश आणि पोकसो कायद्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. पत्रकारांनी वृत्तांकन करताना पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे, तथ्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ह्या कार्यशाळेत राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव, नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता, लेखिका विद्या सूद आणि माहिती आणि जनसंपर्क खात्याचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह ह्यांनीही सहभाग घेतला. नवी दिल्लीतील ज्येष्ठ  पत्रकार स्वाती सूद ह्यांनी फेक न्यूज आणि सार्वजनिक हिंसा ह्यांचा परस्पर संबंध आहे असे सांगून पत्रकारांनी जेंडर सेंसिटीविटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर न्यूट्रल भाषा वापरणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

वेगाने बदलणार्‍या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्वाचे बदल घडवत आहे. ह्या बदलांकडे संधि म्हणून पाहत, महिला पत्रकारांनी अधिक तंत्र स्नेही  व्हावे , असे  मत माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह ह्यांनी मांडले. बदलत्या काळात समृद्ध पत्रकारिता आणि आघाडीवर राहण्यासाठी महिलांनी एआय टूल्सचा वापर करणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. महिला अत्याचार घटनांबाबत वार्तांकन करताना संवेदानशीलता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असे सांगून लेखिका रिचा सूद म्हणाल्या की, संपूर्ण वार्तांकनामध्ये पीडितेच्या नावाची गुप्तता पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच तिचे वैयक्तिक आयुष्य उघड न करणे, तिच्यावर दोषारोप टाळणे आवश्यक आहे. तसेच तिला व्हिक्टिमऐवजी सर्व्हयायवर म्हणावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

माध्यमांनी महिलाविषयक कायदे, योजना आणि उपक्रमाच्या वार्तांकनावर भर द्यावा असे मत राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे ह्यांनी व्यक्त केले. महिलांच्या प्रश्नाकडे बघण्याचा माध्यमांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय महिला आयोगाने महिला पत्रकारांसाठी एआय तंत्रज्ञानाबद्दल कार्यशाळा घ्यावी असे ब्रिजेश सिंह ह्यांनी सुचवले. पाहुया यामुळे सध्याच्या परिस्थितीत कितपत सुधारणा होते ती…

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

खरात ते कॉर्पोरेट जिहाद! पवित्र भूमीत चालले तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीत गेल्या महिन्यापासून भोंदू बाबा अशोक खरातचे कारनामे, महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या कथा समोर येत आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत....

महाराष्ट्रातली तरुणाई नशेत धुंद!

मुंबईतील गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये परवा गाण्याच्या एका लाईव्ह कार्यक्रमात अवघी तरुणाई बेधुंद नाचत नशेत धुंद झाली होती. इतकी की, त्या ड्रग्जसेवनाने एमबीए झालेल्या दोन तरुणांचा, एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिथे ८० टक्के मुलांनी ड्रग्जचे (अंमली पदार्थ)...

मुंबई महापालिकेत महिलाराज!

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ह्यांची नेमणूक झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे ह्यांची नेमणूक झाली आणि महापालिकेत एकप्रकारे महिला राज सुरू झाले. कारण महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर,...
Skip to content