गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीत गेल्या महिन्यापासून भोंदू बाबा अशोक खरातचे कारनामे, महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या कथा समोर येत आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे 15 गुन्हे दाखल झाले आहेत आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे. हे प्रकरण गाजत आहे, तेव्हड्यातच नाशिकच्याच भूमीतून कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. टीसीएससारख्या प्रथितयश कंपनीत हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना ह्या कंपनीत चालत होत्या आणि ह्याचा थांगपत्ता कंपनीच्या वारिष्ठांना नव्हता, ह्याचेच आश्चर्य वाटते. आणि ह्या मुलींनी त्यांच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला सांगायचा प्रयत्न केला. पण तिने ह्यांच्या तक्रारींची काहीच दाखल घेतली नाही. आणि हे सगळे घडवून आणणारी तिथली मॅनेजर निदा खान मात्र फरारी आहे.

दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाशी तिचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. हिंदू मुलींना कसे जाळ्यात ओढायचे, तिथल्या मुस्लिम मुलांना, ह्या मुलींना आपल्या जाळ्यात कसे ओढायचे हे सगळे कांड ही निदा खान घडवून आणत होती. मॅनेजरसारख्या उच्च पदावर असल्याने, तिला हे सहज शक्य होते. ज्या मुली विरोध करतील, त्यांना कसे छळायचे, हिंदू देव-देवतांबद्दल अपशब्द बोलायचे आणि त्या मुलींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करायचे, अशी तिची मोडस ओपेरेंडी होती. ह्या मुलींना पार्टीच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलमध्ये न्यायचे, तिथे त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्याचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे, असेच ह्या कंपांनीतल्या मुस्लिम मुलांचे धंदे चालत होते. ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी शफी आणि रझा मेमन ह्यांना अटक झाली आहे. आता हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिले आहे. ह्यापाठोपाठ अमरावती येथील परतवाडा येथेही असेच हिंदू मुलींचे अत्याचार आणि शोषणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. तिथेही ह्याच पद्धतीने मुलींना फसवून, त्यांचे व्हिडिओ काढून, त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. ह्याही प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अहमद आयानला अटक केली आहे आणि ह्याची चौकशी एसआयटीकडे दिली आहे.

ह्या आरोपीच्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने बुलडोझर फिरवला. त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे ह्यांनी सरकारवर टीका केली आहे. गंमत म्हणजे एका मुसलमान आरोपीच्या घराचे अवैध अतिक्रमण तोडले म्हणून ह्या विरोधी पक्षातील महिला आगपाखड करत आहेत. खरेतर ते त्याचे अवैध बांधकाम होते आणि महापालिकेने त्याला त्याबद्दल ह्याआधीच नोटीस दिली होती. पण वस्तुस्थिती लक्षात न घेता उगाच टीका करत सुटायचे, हा त्यांचा पक्षीय अभिनिवेश झाला. पण इतक्या हिंदू मुलींवर ह्या आरोपीने अत्याचार केले त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया नाही. नाशिकचे कॉर्पोरेट जिहाद असूदे किंवा परतवाडा येथील हिंदू मुलींवरच्या अत्याचाराची घटना, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेते का मूग गिळून गप्प आहेत? केवल मुस्लीम व्होटबँक जाईल म्हणून? आणि हिंदू मुलींवर अत्याचार झालेले चालतात, हे असे? राष्ट्रवादी शप पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्याही गप्प आहेत. खरेतर ह्या विषयाकडे राजकारण म्हणून बघायची गरज नाही. आज भाजपाच्या वतीने ह्या घटनेच्या निषेधार्थ बाइकरॅली काढण्यात आली होती आणि ह्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी द्या अशी मागणी केली गेली.

आता इन्फोसिससारख्या जगविख्यात कंपांनीतही असे प्रकार चालू आहेत, असे उघड झाले आहे. मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबातील मुले उच्चशिक्षण घेतात. सध्या आयटी आणि सॉफ्टवेयर कंपनीत चांगला पगार मिळतो. त्यामुळे अशा कॉर्पोरेट कंपन्यांकडे तरुणवर्ग आकर्षित होतो. पण तिथे जर अशाप्रकारची वागणूक मिळत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. पण असे केल्याने आपल्या नोकरीवर गदा येईल ह्या भीतीने सगळे गप्प बसतात. पण ह्यापुढे असे गप्प बसून चालणार नाही. टीसीएस ह्या कंपनीच्या अहवालातच माहिती दिली आहे की गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारच्या कार्यालयीन लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात भरमसाठ वाढ झाली आहे. मग कंपनीने ह्याबाबत आधीच पावले उचलण्याची गरज होती. जर टाटासारख्या नामवंत आणि विश्वसनीय कंपनीत असे प्रकार होत असतील, तर बघायलाच नको. अलीकडे प्रदर्शित झालेल्या केरळा फाईल्स 2 ह्या चित्रपटातही लव्ह जिहादचाच विषय आहे आणि कशाप्रकारे हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांचे शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केले जाते ह्याचेच चित्रण आहे. म्हणूनच हिंदू मुलींच्या पालकांनी तर सजग राह्यलाच हवे. मुलींनीही अशावेळी धीटपणे उभे राहिले पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. ह्यासाठी मुलींचे समुपदेशन करण्याची गरज आहे. त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, नाहीतर अशा घटना सतत होत राहतील. मुख्य म्हणजे ह्या मुली मनाने एव्हढ्या कमकुवत कशा? झालेल्या घटनेची माहिती त्या घरी का देऊ शकत नाहीत? घरच्यांना ह्याची काहीच माहिती कशी नाही? आजकाल कुटुंबीयही आपण मुलांना स्वातंत्र्य देतो अशा मताचे असतात. ते ठीक आहे. पण कुणीतरी आपल्या मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करते आहे आणि ह्यालाही मुलांचे स्वातंत्र्य म्हणायचे तर मग सगळ्यांचेच कठीण आहे.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

