Homeहेल्थ इज वेल्थआता देशातच बनणार...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित ‘व्होक्सेल ग्रिड्स’ या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय मशिन विकसित करण्यात यश मिळवले आहे. या क्रांतीमुळे देशातील सामान्य रुग्णांना होणारा एमआरआय चाचण्यांचा त्रास आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

“मेक इन इंडिया” एमआरआय मशीनचा थेट रुग्णांच्या खिशाला फायदा होणार असून तपासणी दर ७० टक्क्यांपर्यंत दर कमी होऊ शकतात. सध्या भारतात एमआरआय चाचणी करण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांत ५,००० ते १५,००० रुपये मोजावे लागतात. मात्र, स्वदेशी तंत्रज्ञानामुळे हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार झालेले हे एमआरआय मशिन भारताच्या आरोग्य क्रांतीचा केंद्रबिंदू ठरेल. आता ‘तारीख’ लांब असण्याचे आणि ‘खर्चाचे’ टेन्शन सामान्य रुग्णांच्या आयुष्यातून कायमचे निघून जाण्याचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे.

खर्च कमी होणार

जर भारताने या मशिनची स्वतःची इकोसिस्टम पूर्णपणे विकसित केली, तर एमआरआय चाचण्यांचे दर ५०% ते ७०%पर्यंत कमी होऊ शकतात.

ग्रामीण भागाला आधार

मशिनची किंमत कमी असल्याने निमशहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांनाही ही यंत्रणा बसवणे शक्य होईल, ज्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्यांच्याच गावात स्वस्त उपचार मिळतील.

पाच देशांची मक्तेदारी मोडीत!

आजच्या घडीला संपूर्ण जगात एमआरआय मशिन तयार करण्याची पूर्ण यंत्रणा (इकोसिस्टीम) केवळ चीन, जपान, जर्मनी, अमेरिका आणि युनायटेड किंगडम (ब्रिटन) या पाचच देशांकडे आहे. भारत दरवर्षी शेकडो एमआरआय मशिन्स आयात करतो, ज्याची किंमत ५ कोटींपासून १५ कोटी रुपयांपर्यंत असते. ‘व्होक्सेल ग्रिड्स’च्या या यशामुळे भारताने या ‘एलिट क्लब’मध्ये स्थान मिळवले असून, परदेशी कंपन्यांची मक्तेदारी आता मोडीत निघणार आहे.

स्वदेशी मशिनची वैशिष्ट्ये आणि ‘मेक इन इंडिया’चा हुंकार

१. टाटा ट्रस्टचे सहकार्य: हे संशोधन केवळ व्यावसायिक नसून सामाजिक दृष्टिकोनातून करण्यात आले आहे, ज्यात टाटा ट्रस्टचा मोलाचा वाटा आहे.

२. कमी वजनाचे आणि प्रगत: हे स्वदेशी मशिन वजनाने हलके आणि अधिक प्रगत असल्याचे सांगितले जात आहे, जे भारतीय हवामानाशी सुसंगत आहे.

३. देखभालीचा खर्च कमी: आयात केलेल्या मशिनचे सुटे भाग आणि देखभाल अत्यंत महाग असते. स्वदेशी मशिनमुळे देखभाल (मेंटेनन्स) स्थानिक पातळीवर आणि स्वस्त दरात होईल.

आरोग्य क्षेत्रातील नवी पहाट

तज्ज्ञांच्या मते, भारताने स्वतःची एमआरआय इकोसिस्टम विकसित केल्यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर ‘कॅन्सर’ आणि ‘न्यूरो’ संबंधित गंभीर आजारांचे निदान वेळेत आणि स्वस्त दरात करणे शक्य होईल. भारताची ही झेप केवळ तंत्रज्ञानातील प्रगती नसून सामान्य भारतीयांना परवडणारी आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने पडलेले ऐतिहासिक पाऊल आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content