Homeमाय व्हॉईसनव्या महापालिका आयुक्तांचे...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या ‘हौदा’कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो, दोन्हीच्या त्या सध्या प्रमुख असल्यामुळे काम व जबाबदारी टाळण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखविण्याची संधी त्यांना साधता येणार नाही. त्यामुळे आता स्वतःच स्वतःकडे बोट दाखवावे आणि मुंबईतल्या या गिरगावकरांना पावसाळ्यातल्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्याचे काम तडीस न्यावे, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.

गिरगांवच्या झावाबावाडी समोरील मोठा ‘हौद’ बुजवण्यासाठी मेट्रोला मोठा अपघात हवाय का?

मुंबईतील भुयारी रेल्वे सुरु होऊन आता नक्कीच काही महिने लोटलेले आहेत. गिरगांवकरांनी म्हणजेच सर्व दक्षिण व मध्य मुंबईतील नागरिकांनी गेली सुमारे आठ/नऊ वर्षे सर्वप्रकारचे त्रास सहन केलेले आहेत. (अनेक बसेसचे मार्ग बदललेत, काही रस्ते एकदिशा झालेले, वाहतूककोंडी तर पाचवीलाच पूजलेली!) भुयारी मेट्रो रेल्वे सुरु झाली आणि अंधेरीपासूनच्या थेट दादर, गिरगावपर्यंतच्या नागरिकांचा दररोजचा प्रवास काहीसा सहनीय झाला हे मान्यच केले पाहिजे. काहीसा सहनीय झाला असे मुद्दामच म्हटले कारण, मुंबईकरांना ‘अर्ध्या पोटावर’ समाधान मानायची बाळगुटी पाजली जातेय की काय अशी शंका निर्माण करण्याजोगी सध्या परिस्थिती आहे हे आपण सर्वजण जाणताच!

छायाचित्रात दिसणारा हा प्रचंड मोठा हौद गिरगाव येथील प्रसिद्ध गोरा राम व काळा राम मंदिराच्या अगदी मध्यभागी असलेल्या झावबावाडीच्या तोंडावरच आहे. अजूनही या परिसरात वाहतूक एकदिशा मार्ग पद्धतीनेच होत आहे. इतकेच नव्हे तर ऑपेरा हाऊस, प्रार्थना समाज, गिरगाव (झावबावाडी), चिरा बाजार, मेट्रो सिनेमा, हॅन्डलूम हाऊस, हुतात्मा चौक आदी अनेक स्थानकांचे काम काहीसे अर्धवट झालेले दिसते. काही स्थानकांचा एकच मार्ग खुला झालेला दिसतो. हुतात्मा चौकातील सरु न झालेल्या एका जिन्याला चक्क ‘टोपरे’ घालून झाकून ठेवले आहे. चिरा बाजार येथे तर अजूनही काही ठिकाणी गळती होत असते, या शंकेने अभियंते पाहणी करताना दिसतात.

मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी कोणताही सरकारी लावाजमा न घेता शास्त्री हॉल वा गिरगावातील काही नातेवाईकांना भेटायचे आहे असे सांगून खासगी पाहणी दौरा केला तर मॅडमना ‘जमिनीवरची पारिस्थिती’ जाणून घेता येईल. मुंबई सेंट्रल येथील एस. टी. कार्यालयानजिक असलेल्या स्थानकाचीही पाहणी केल्यास अनेक त्रुटी दिसून येतील, असेही काहींनी सांगितले. गिरगावकरांनी मात्र पावसाळ्याआधी झावबावाडीसमोरील मोठा हौद बुजवून टाकावा अशी मागणी केली आहे. नाहीतर पावसाळ्यात पोहण्यासाठी मुलांना आयता हौद मिळेल व काही अपघात होण्याचीही शक्यता आहे. ही शक्यता नव्या आयुक्त व संचालिका कशी निकालात काढतात हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...
Skip to content