Homeब्लॅक अँड व्हाईटफुटबॉलमधल्या 'जायंट' जर्मनची...

फुटबॉलमधल्या ‘जायंट’ जर्मनची वाताहात…

यंदाच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत एका जमान्यातील महासत्ता असलेल्या जर्मन फुटबॉल संघाला सलग तिसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात पॅराग्वेकडून जर्मन संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हार खावी लागली. या स्पर्धेच्या इतिहासात पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होण्याची नामुष्कीची पाळी जर्मन संघावर कधी नव्हे ती पहिल्यांदा आली. याअगोदर स्पर्धेतील चारही पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने बाजी मारली होती. तसेच पेनल्टी शूटआऊटमध्ये याअगोदर १८पैकी १७वर गोलदेखील‌ जर्मन संघाने केले होते. एका जमान्यात जर्मनीने या खेळावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. या स्पर्धेत बलाढ्य ब्राझिलनंतर सर्वात शानदार कामगिरी आहे ती जर्मन संघाची. १९५०पासून‌ जर्मन संघाने या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. आपल्या केवळ दुसऱ्याच स्पर्धेत त्यांनी ‌१९५४ साली झालेली ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर १९७४, १९९०, २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली. १९६६, १९८२, १९८६, २००२च्या स्पर्धेत ते उपविजेते होते. १९९४, १९९८मध्ये उपांत्यपूर्व फेरी तर २००६, २०१०मध्ये उपांत्य फेरी प्रवेश अशी चमकदार कामगिरी‌ करुन जर्मन संघाने जागतिक फुटबॉल स्पर्धेत स्व:ताचा एक वेगळा दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे तेव्हा अनेक संघ जर्मन संघाचा धसका घेत असत.

अनेक बड्या संघांना सहज नमवण्याचा पराक्रम जर्मनीने केला होता. त्यामुळे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जायच्या. किमान जर्मनीने उपांत्यफेरी तरी गाठावी. पण गेल्या काही वर्षांत चित्र बदलले. आता नवखे, दुबळे संघदेखील जर्मनीला पराभूत करु लागले आहेत. २०१४मध्ये जोकिम ल्वोव संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी शेवटी ही स्पर्धा जिंकली होती. पण त्यानंतर जर्मन संघाच्या अधःपतनाला सुरूवात झाली. गेल्या तीन स्पर्धांत संघाची कामगिरी‌ पार ढेपाळली. एका जमान्यातील या ताकदवान संघाची पडझड सुरू झाली. २०१८च्या स्पर्धेत जोकिम संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. पण जर्मन संघाला पहिल्या टप्प्यात साखळीतच गारद व्हावे लागले. त्याचीच प्रचिती पुन्हा जर्मन संघाने २०२२च्या स्पर्धेत दाखवून दिली.

यंदाच्या स्पर्धेत जर्मनीने पहिला साखळी टप्पा कसाबसा पार केला. पण दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच सामन्यात पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारुन जर्मन संघाचे पॅकअप करुन टाकले. यंदा स्पर्धेच्या‌ पहिल्या टप्प्यातदेखील जर्मनीची कामगिरी‌ फारशी समाधानकारक नव्हती. गटातील पहिल्या सामन्यात नवख्या कुरासाव देशाने जर्मनीविरुद्ध एक गोल केला. ही लढत जर्मनीने जिंकली. दुसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्टविरुद्ध जर्मन संघ पिछाडीवर होता. पण नंतर बरोबरी साधून‌ सामना संपायला थोडा वेळ बाकी असताना जर्मनीने विजयी गोल केला. शेवटच्या सामन्यात इक्वेडोरकडून जर्मनीला २-१ गोलांनी निसटता पराभव पत्करावा‌ लागला. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश दोन विजय मिळवल्यामुळे पक्का झाला होता. त्यामुळे इक्वेडोरविरुद्धच्या लढतीत जर्मन संघ फार सिरीयसली खेळला नाही. जोकिम, हान्सी, ज्युलियन हे तीन मुख्य प्रशिक्षक गेल्या तीन स्पर्धात होते. पण ते जर्मन संघाची भरकटलेली नौका किनाऱ्याला लावू शकले नाहीत. यंदा पॅराग्वेविरुद्ध सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीच्या लिओन, अँटोन, ब्राऊन, थियाव या चौघांनी पेनल्टी किक घेण्यास चक्क नकार दिला. लिओनने आतापर्यंत ७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कप्तान जोशुआ किमीचने लिओनला पेनल्टी किक घेण्यास बरीच गळ घातली. पण कप्तानाचे त्याने ऐकले नाही. त्यामुळे जर्मन संघाचा लढाऊ बाणा इतिहासजमा झालाय की काय अशी शंका येऊ लागली आहे.

शारीरिक फिटनेस अथवा रणनीती पुरेशी नाही. कठीण समयी संघाला तारुन नेणारे मानसिक धैर्य महत्त्वाचे. ती मानसिकता, कणखरता आणि जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती पुन्हा निर्माण करत नाही तोपर्यंत जर्मन संघाचे गतवैभव पुन्हा येणे खूप कठिण आहे. एका जमान्यात शारीरिक फिटनेस, फुटबॉलमधील कौशल्य, मानसिक कणखरता, पल्लेदार पासेस, प्रतिस्पर्धी गोल क्षेत्रात जोरदार आक्रमण, अचूक पासेस, भक्कम बचाव यासाठी जर्मन संघाचा लौकिक होता. पण आता तो लौकिक इतिहासजमा झालाय. अनेकदा पिछाडीवर पडूनदेखील अनेक सामने जर्मनीने आपल्या बाजूने फिरवल्याची अनेक उदाहरणे देता येतील. जर्मन फुटबॉल लिग, बुंडेसलीगा विश्वातील अव्वल फुटबॉल लीग‌मधील एक म्हणून ओळखली जाते. विश्वातील अनेक बडे फुटबॉलपटू या लीगमध्ये खेळतात. सध्या जर्मन संघात मेस्सी, रोनाल्डो, हॅरी केन, हॅलेड, एम्बापे, सलाह यांच्यासारखा तारणारा एकही खेळाडू नाही. चांगले युवा खेळाडू अभावानेच दिसत आहेत. सातत्याचा अभाव चांगलाच जाणवतोय. त्यामुळे आता पूर्णपणे नव्याने घडी बसवण्याची वेळ जर्मन संघावर आली ‌आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरी‌नंतर मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समान यांनी राजीनामा दिला आहे. आता जुर्गन‌ क्लाॅप यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. जर्मनी संघाला पुन्हा नावलौकिक मिळवून देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. हे शिवधनुष्य ते कितपत पेलतात ते येणारा‌ काळच ठरवेल.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content