महाराष्ट्राला अगदी लाज आणणारे स्त्रियांच्या शोषणाचे भयानक प्रकरण समोर आले आहे. तेही नाशिकसारख्या पवित्र भूमीत, जी भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे, तिथे आणि शिर्डीसारख्या दुसर्या पवित्र ठिकाणी ह्या खरातने सगळ्या मर्यादा, लाज, लज्जा, शरम गुंडाळून शेकडो स्त्रियांचे शारीरिक शोषण केले. उपलब्ध माहितीनुसार शेकडो स्त्रियांना त्याने, तुझे ठरलेले लग्न मोडेल, तुझ्या पतीचे निधन होईल.. अशा धमक्या देऊन हे विकृत चाळे केले आहेत. ह्या सगळ्या प्रकाराच्या आता 200हून अधिक चित्रफिती पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यावरून अधिक माहिती बाहेर येईल.
पण मुळात स्त्रिया, अशा भोंदू बाबाच्या नादी का लागतात, हा मुख्य प्रश्न आहे. कुणाचे लग्न जमत नाही, कुणाच्या नवर्याचे बाहेर लफडं असते, कुणाला सासूचा छळ सहन करावा लागतो, तर कुणाला मूल होत नाही, आर्थिक तंगी हे आणखी एक कारण. ह्या सगळ्या समस्यांवर स्त्रिया उपाय शोधत असतात. त्यासाठी त्यांना मानसिक आधाराची गरज असते. पण कुटुंबातील कुणीही व्यक्ती असा आधार देत नाहीत. उलट तिची घरात निर्भत्सनाच केली जाते. अशा कमकुवत मनाच्या स्त्रिया मग अशा भोंदू बाबाच्या नादी लागतात. त्याला हवे तेव्हढे पैसे देतात. त्याने सांगितलेले उपाय करतात आणि मग त्याचे शारीरिक अत्याचारही सहन करतात. अशावेळी कितीही वाटले तरी तक्रार कुठे करणार, कुणाकडे करणार असा प्रश्न पडतो. त्यामुळेच ह्या भोंदू बाबांचे फावते. अगदी सत्य साईबाबांपासून, असाराम बापूंपर्यन्त अनेक बाबांवर असे आरोप झाले आहेत. असाराम बापू तर तुरुंगातही गेला. ह्या सगळ्या भोंदू बाबांवर आधारित सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा ह्यांनी आश्रम नावाची वेबसिरीज काढली, ती खूप गाजलीही.

सगळ्यात कहर म्हणजे हा खरात, आलेल्या भाविक महिलांना कसल्याश्या औषधाचा वास देऊन बेशुद्ध करत असे आणि त्यांच्यावर अत्याचार करत असे. त्याच्या कार्यालयात, केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही, तो आतमध्ये असे प्रकार करत असे. प्रसंगी, त्या स्त्रीबरोबर आलेल्या, तिच्या पती आणि मुलांनाही बाहेर थांबवून, आतमध्ये असे गालिच्छ प्रकार करत असे. ह्या खरात बाबाचे एकएक कारनामे बाहेर येत आहेत. अनेक राजकीय पुढार्यांचीही त्याच्याकडे येजा असे. अनेक पुढार्यांचे, मंत्र्यांचे त्याच्याबरोबरचे फोटोही प्रसिद्ध होत आहेत. ह्या राजकीय नेत्यांनाही कुठल्या तरी बाबाची गरज भासते. मला निवडणुकीचे तिकीट मिळणार की नाही इथपासून, मी मंत्री होणार की नाही, इथपर्यंत त्यांच्यापुढे अनेक प्रश्न असतात. मग अशा बाबांचा आधार ते घेतात. त्यांनी सांगितलेले उपाय लाखो रुपये खर्चून करतात. त्यांना त्या उपायांचा फायदा होतो की नाही, हे त्यांचे त्यांना माहित. पण ह्यामुळे बाबा मालामाल होतात. खरातची करोडोची संपत्ती बाहेर आली आहे. कुठे फार्महाऊस, कुठे जमिनी, सोने, दागिने अशी करोडोची संपत्ती त्याने ह्या मार्गाने मिळवली आहे.
अनेक राजकीय नेत्यांची त्याच्याकडे उठबस होती. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचेही खरातबरोबरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे आणि त्यामुळेच ह्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. विरोधकांच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी 15 दिवस आधीपासूनच ह्या खरातबाबाच्या मुसक्या बांधण्याची तयारी केली होती आणि नाशिक पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने त्याला घरी जाऊन अटक केली आहे. ह्या राजकारणाचा पहिला बळी पडला आहे तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकाणकर ह्यांचा. चाकणकर ह्या खरातच्या ट्रस्टवर संचालक होत्या. खरातची पाद्यपूजा करतानाचे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि त्या ह्या वादात सापडल्या. खरात ह्यांना मी व माझे कुटुंबीय गुरु मानत होतो आणि आम्हाला त्याची ही दुसरी बाजू माहित नव्हती असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. पण ह्याआधीही अनेक प्रकरणात चाकणकर अडचणीत आल्या होत्या. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण, संपदा मुंडे आत्महत्त्या प्रकरणात महिला आयोगाने काहीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर टीका होत होती.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. चाकणकर आणि राष्ट्रवादीच्या दुसर्या नेत्या रूपाली ठोंबरे, ह्या दोघींमधून विस्तावही जात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे, जसे हे खरात प्रकरण बाहेर आले आहे तेव्हापासून रूपाली ठोंबरे सर्व न्यूज चॅनेलवर चाकणकरांवर टीका करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचीच नही तर त्यांना सहआरोपी करून त्यांच्या अटकेची मागणीही त्या करत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, चाकणकरांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. मात्र ह्या राजकीय वादात भाबड्या महिलांच्या शारीरिक शोषणाच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणजे झालं.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

