राज्यसभेच्या ७ जागांसाठी महाराष्ट्रातून बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे. एप्रिलमध्ये होणार्या ह्या निवडणुकीचे बिगुल संजय राऊत ह्यांनी वाजवले आहे. शरद पवारांच्या राज्यसभा निवडणुकीचे बिगुलही त्यांनीच वाजवले होते. मात्र नंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली आणि पवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र आदित्य ठाकरे यामुळे नाराज झाले होते. कारण आमच्या पक्षाचे २० आमदार असल्याने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मात्र महाविकास आघाडीने शरद पवार ह्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने अदित्य ठाकरे नाराज झाले आणि ही नाराजी त्यांनी बोलूनही दाखविली. पण संजय राऊत ह्यांनी पवारांच्या नावाचा एव्हढा आग्रह धरला की, आदित्य ठाकरे ह्यांचे काही चालले नाही. अन्यथा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी ह्यांनाच पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचे संकेत त्यांनी दिले होते.
अर्थात राऊत ह्यांचा पवारांच्या नावच्या आग्रहामागे तसेच कारणही आहे. कारण २०२८ साली संजय राऊत ह्यांची राज्यसभेची मुदत संपत आहे आणि त्यावेळेस त्यांना महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची गरज लागेल. त्यामुळे आता पवारांना पाठिंबा दिला तर २०२८ सालच्या राज्यसभा निवडणुकीत राऊत ह्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी खेळलेली ही खेळी आहे. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचेही हसे झाले. कारण इथे वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे इतर नेते, आमचे १६ आमदार आहेत, त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषदेवर काँग्रेसचाच उमेदवार गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मात्र पवारांनी डायरेक्ट काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधून पाठिंबा मिळवला आणि हायकमांडने इथल्या काँग्रेस नेत्यांना पवारांना पाठिंबा देण्याचा आदेश दिला. खरेतर ह्यात मोठी खेळी भाजपची होती. जर पवार राज्यसभेसाठी उमेदवार नसतील तर सातवा उमेदवार देण्याचे महायुतीने ठरवले होते. आणि त्यासाठी शिवसेना शिंदे गटातून उमेदवाराची चाचपणीही चालू होती. त्यामुळेच महाविकास आघाडीने पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच चालू आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आता मुदत संपत असल्याने उद्धव ठाकरे ह्यांनाच महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी भावना राऊत ह्यांनी व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी शपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ह्यांनी सावध भूमिका घेत ह्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी चर्चा करून घेईल असे संगितले. खरेतर २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर निवडून जायचे होते. मात्र त्यांना मुख्यमंत्री होऊन ६ महिने होत आले तरीही विधान परिषदेची निवडूक जाहीर झाली नव्हती. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यानाच फोन केला आणि मग मोदीजींनी मध्यस्थी केली आणि ती निवडणूक जाहीर झाली.
येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ जागा रिक्त होत आहेत. ह्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचा पाहिल्या पसंतीचा मतांचा कोटा आहे 32 मतांचा. सध्या महायुतीकडे २३५ आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे ५०. त्यामुळे महायुतीचे ७ आमदार आरामात निवडून येऊ शकतात. मविआचा १ उमेदवार निश्चित निवडून येऊ शकतो. मात्र महायुतीकडे ११ तर माविआकडे १८ आणि अपक्ष ३ अशी अतिरिक्त मते आहेत. पण युती किंवा आघाडीकडे आणखी एक उमेदवार निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे एका जागेसाठी मतांची फोडफोडी नक्कीच होऊ शकते. अर्थात उद्धव ठाकरे सध्या विधान परिषद सदस्य आहेत. मात्र ह्या सहा वर्षांत ते किती वेळा सभागृहात आले, त्यांनी किती प्रश्न विचारले हा संशोधनाचा मुद्दा आहे. ते फारच कमी वेळा सभागृहात आले. आतल्यापेक्षा सभागृहा बाहेरील संचार त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. सभागृहाबाहेर केवळ पत्रकारांना मुलाखती द्यायच्या, फडणवीस सरकारवर टीका करायची, टोमणे मारायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, एव्हढाच त्यांचा अजेंडा असतो.
राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल ह्याची मात्र शक्यता कमी आहे. कारण २०२२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट झाली होती आणि त्याचा फायदा महायुतीला मिळाला होता. त्याच रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्यासोबत ४० आमदारांनी मुंबईतून पळ काढून बंडखोरी केली होती. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीतही मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून येऊ देतील असे वाटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे ह्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

