काही काही वास्तूऺचे काही काही जागांशी अतिशय घट्ट नाते जुळलेय, त्याला चित्रपटाचे जगही अपवाद नाही. ‘शोले’ म्हटलं की मिनर्व्हा चित्रपटगृह आणि मिनर्व्हा चित्रपटगृह म्हटलं रे म्हटलं ‘शोले’ हे जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये तब्बल पन्नास वर्षे रुजलेले नातं… आज भलेही मिनर्व्हा चित्रपटगृहाची भव्य इमारत पाडूनही दशकभराचा काळ झाला असेल, पण आजही तेथून जाताना गब्बरसिंगची दहशत जाणवते. वांद्रे येथील पाली हिल अथवा जुहू वर्सोवा म्हटले की जुन्या पिढीतील कलाकार आणि आजच्या काळातील सेलिब्रिटीज (दोन्ही एकच. पण आजच्या ग्लोबल युगात नट, अभिनेता, कलाकार असे न म्हणता सेलिब्रिटीज म्हणतात इतकेच!) आणि सेलिब्रिटीजचं घर म्हटले रे म्हटलं की पाली हिल, कार्टर रोड, जुहू, वर्सोवा असे समीकरण ठरलेले. तसेच आर. के. स्टुडिओ म्हटले रे म्हटलं की चेंबूर नाका हे नाते अतिशय घट्ट. बरं हे किती वर्षं वगैरे वगैरे विचारु नका.
राज कपूर चित्रपटरसिकांना आवडू लागला. त्याने अभिनयात जम बसवतानाच आपल्या आर. के. फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल टाकले तेच चेंबूर येथे आपला अनेक वैशिष्ट्यांसह आर. के. स्टुडिओ उभारला. तपशीलात जाऊन सांगायचे तर १९४८ साली आर. के. स्टुडिओची ऐतिहासिक वास्तू उभी राहिली. ‘आग’चे चित्रिकरण पहिले झाले आणि तेव्हापासून त्या वास्तूने मुंबई शहराच्या वाटचालीत स्वतःची ओळख निर्माण केली. मुंबईतील चित्रपट चित्रिकरण स्टुडिओ हे चित्रपटसृष्टीसह मुंबईच्या इतिहासातील महत्त्वाचे भाग ठरले. आज एकेक करत करत मुंबईतील असे अनेक स्टुडिओ काळाच्या पडद्याआड जात असले तरी काही स्टुडिओंची बसस्टाॅपना नावे आहेत. आर. के. स्टुडिओच्या एका बाजूला लागलेली आग, काही वर्षांनी झालेली त्याची विक्री अशा गोष्टी घडल्या. आर. के. स्टुडिओही दुर्दैवाने असाच जाऊन त्या जागेवर अतिशय भलीमोठ्ठी गोदरेज प्राॅपर्टीजची चकाचक इमारत उभी राहिलीय.

ते करताना फक्त आणि फक्त आर. के. स्टुडिओची ओळख असलेले प्रवेशद्वार मात्र आजही कायम आहे. अर्थात, बरसात, आग, श्री ४२०, संगम, मेरा नाम जोकर, बाॅबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, अशा अनेक चित्रपटांद्वारे आर. के. फिल्म आणि स्टुडिओचे अस्तित्त्व पडद्यावर आणि चित्रपट रसिकांमध्ये कायम आहे. याच स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकाना “हीना” दाखवण्यात आला आणि तो संपल्यावर स्टुडिओतच झाली आर. के. क्लासची पार्टी आणि त्याच पार्टीत रणधीर कपूरच्या अतिशय मनमोकळ्या गप्पा. मनमोहन देसाई यांचा हा अतिशय आवडता स्टुडिओ. आपण निर्माण करीत असलेल्या केतन देसाई दिग्दर्शित ‘अल्लारखा’ चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटींग रिपोर्टींगसाठी बोलावले असता मनजी सेटबाहेर दूरचित्रवाणीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पाहताना दिसले.
आर. के. स्टुडिओतील आठवणी अनेक आणि त्यात एक घट्ट समीकरण आर. के. स्टुडिओ म्हणजे चेंबूर. तोच आर. के. स्टुडिओ आता अंधेरी पूर्व येथील कनकिया वाॅल स्ट्रीट येथील पाच मजले, असा नवीन पत्ता… हे कसे वाटते? रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर हे भाऊबहिण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या आर. के. फिल्म आणि स्टुडिओचा सगळा कारभार सांभाळणार आहेत. त्यात राज कपूर टच नक्कीच नसणार. होळी वगैरे दूरच. आजच्या डिजिटल युगात चित्रपटात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर स्वाभाविकपणे होत असताना जुन्या पठडीतील मोठेमोठे सेट लावले जात असलेल्या स्टुडिओपेक्षा नवीन तंत्रज्ञानाचे स्टुडिओ हवेत, असे म्हणायचे तर आर. के. स्टुडिओचा बदललेला पत्ता योग्य आहे.
मुंबई कमालीची बदललीय, त्यासह चित्रपट स्टूडिओही बदलले आहेत. याबाबत भावनिक न होता, व्यावहारिक दृष्टिकोन हवा. चेंबूरच्या आर. के. स्टुडिओच्या वास्तूच्या विक्रीतून आलेल्या आर्थिक लाभातून अंधेरीतील स्टुडिओचे भाडे भरले जाणार आहे. महिना काही लाख निश्चित असेल… काही असो. १९७२/७३ सालापासून ठाणे खाडी पूलावरुन गाड्यांची येजा सुरु झाल्यावर कधीही चेंबूरला गेल्यावर आर. के. स्टुडिओवर नजर टाकण्याची किमान चार पिढ्यांना असलेली सवय यापुढेही कायम राहणार असली आणि त्यात आर. के.चे फक्त प्रवेशव्दार दिसत असले तरी चित्रपटरसिक तरी आर. के. स्टुडिओ, अंधेरी पूर्व हा नवीन पत्ता मनाने स्वीकारणार नाहीत. आपल्या देशातील चित्रपटरसिक संस्कृती, चित्रपटासह त्याचे लोकप्रिय स्टुडिओ आणि त्यांच्या जागा यावरही बेहद्द प्रेम करतात!
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

