Homeमाय व्हॉईसमजबूर धनखडांना सन्मान...

मजबूर धनखडांना सन्मान देण्यामागचा संघाचा हेतू तो कोणता?

जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांचे नागपूर येथील दसरा मेळाव्यातील भाषण समाजासाठी व सरकारसाठीही मोलाचे आहे. केंद्रात गेली बारा वर्षांहून अधिक काळ भाजपाप्रणित एनडीए सरकार आहे. एकवीस राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. बहुतेक मुख्यमंत्री, मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कट्टर संघ स्वयंसेवक आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, बिहार अशा काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि बरेच मंत्री आयाराम आहेत. कोणी इडीच्या नोटिसीनंतर तर कोणी सत्तेच्या लोभापायी भाजपाच्या आश्रयाला धावत आले. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस अशा विविध प्रादेशिक पक्षात झालेल्या तोडफोडीनंतर त्यांचे आमदार-खासदार एनडीएच्या छत्राखाली भाजपाचे मित्रपक्ष म्हणून नांदत आहेत. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना कसे कमजोर करतो, हे सर्व देशाने बघितले आहे. त्यात पुन्हा निवडणूक आयोगावर व्होटचोरीचा आरोप होत आहे. निवडणूक आयोगच भाजपाला सत्तेवर निवडून देतो, असा आक्रोश विरोधी पक्षांकडून केला जात आहे. काँग्रसचे नेते राहुल गांधी तर अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत आहेत. अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि नेहा बोरा हे युवा नेतृत्त्व रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणा देऊ लागल्याने देशातील वातावरण बदलले आहे. सत्तापालट करण्यासाठी देशात अराजक निर्माण केले जात आहे, असा आरोप भाजपाकडून सातत्याने केला जात आहे. महाराष्ट्रात मराठा नेते मनोज जरांगे यांना मित्रपक्षांमार्फत पाचशे कोटी पोहोचविल्याच्या भाजपाच्या तथाकथित ऑडिओ बॉम्बने राजकारण ढवळून निघाले आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर संघाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याच्या समारोपप्रसंगी मोहनराव भागवत काय बोलतात, याकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते.

मोहनराव भागवत राजकारणावर थेट बोलत नाहीत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय घडामोडींवर ते भाष्य करतात. दसरा मेळाव्यात त्यांनी वर्तमानातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीचे मार्मिक विश्लेषण केले. बांगलादेश व फ्रान्समध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती भारतात निर्माण करण्याचे  प्रयत्न सुरू आहेत. जगात अशा काही शक्ती आहेत की, त्या भारताला दाबून ठेऊ इच्छितात. त्यांचा उद्देश सत्तेत बदल घडवून परिस्थिती सुधारणे हा नसून स्वत:च्या हातातील बाहुल्यांना सत्तेत बसवणे हा आहे. हा मुद्दा त्यांनी मांडला. काही लोक भारत व हिंदू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीतआहेत आणि त्यांना काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे, हा संघाचा नेहमीचा मुद्दा त्यांनी भाषणातून पुन्हा अधोरेखित केला. भाजपासुद्धा विरोधी पक्षांवर आरोप करताना हाच मुद्दा मांडत आहे. केंद्रात बारा वर्षांहून अधिक काळ भाजपाचे सरकार आहे. मग एवढ्या मोठ्या काळात भारताचे व हिंदु समाजाचे तुकडे करू पाहणाऱ्या घटकांचे कंबरडे का मोडले नाही?

संघ

मोहनराव भागवतांनी त्यांच्या भाषणातून बोलताना, समस्यांमधून आंदोलने निर्माण होतात, आंदोलनाचा हेतू समस्यांवर उपाय शोधण्यासाठी असला पाहिजे. समाजात फूट पाडणे किंवा दुफळी निर्माण करणे नव्हे. अनेकदा आंदोलने इतर अजेंडा राबवण्यासाठी वापरली जातात आणि ती केवळ राजकारणाची साधने बनतात, असे म्हटले. त्यांनी देशातील कोणत्याही आंदोलनाचे नाव घेतले नाही. मग ते कोणत्या आंदोलनाविषयी बोलले? एसआयआर (मतदार नोंदणी सर्वेक्षण)विरोधात चालू असलेल्या आंदोलनाबद्दल की ज्ञानेशकुमार हटाओ, व्होट चोर गद्दी छोड… या आंदोलनाविषयी? जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या आंदोलनाविषयी की जेन झी रस्त्यावर उतरली म्हणून? जेन झीच्या नेत्यांना केली जाणारी अटक व शांतताभंग होणार नाही म्हणून घेतले जाणारे हमीपत्र याविषयी किंवा पोलिसांनी आंदोलकांवर केलेला निर्घृण लाठीमार याविषयी त्यांनी कोणतेही मतप्रदर्शन केले नाही. सत्ता बदलल्यामुळे परिस्थिती बदलेल, असे भूतकाळात घडले नाही आणि भविष्यातही कधी घडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आपण एकजूट राखली तर कोणीही आपले नुकसान करू शकत नाही, असे सर्वमान्य विचार सरसंघचालकांनी भाषणातून मांडले. लॉर्ड कर्झनने बंगालची हिंदु-मुस्लिम आधारावर फाळणी केली होती. ती चार वर्षांनंतर रद्द करावी लागली. मात्र १९४७ देशाची फाळणी रोखता आली नाही, याची त्यांनी आठवण करून दिली. आपला समाज विविधतेने नटलेला वाटत असला तरी तो आतून एकसंघ आहे. आपल्या भाषा, पंथ, चालिरीती वेगवेगळ्या असल्या तरी आपले ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे, असाही त्यांनी उपदेश केला. संघाच्या २०२१च्या दसरा मेळाव्यात घुसखोरी, सुरक्षा, लोकसंख्या व राष्ट्रीय एकात्मता हे मुद्दे सरसंघचालकांनी मांडले होते. २०२२मध्ये सामाजिक समता, शिक्षण व लोकसंख्या, २०२३मध्ये जी २०, सनातन मूल्ये, २०२४मध्ये बांगलादेशातील हिंदु, घुसखोरी, सलोखा आणि २०२५मध्ये राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, आत्मनिर्भरता या मुद्यांवर सरसंघचालकांनी भर दिला होता. केंद्रात व बहुसंख्य राज्यांत भाजपाचेच सरकार आहे, तरीसुद्धा दहशतवाद, सुरक्षा, लोकसंख्या, हिंदु-मुस्लिम हे प्रश्न ऐरणीवर का राहात आहेत? म्हणूनच सरसंघचालकांचे प्रबोधन हे समाजासाठी आणि सरकारसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. सरसंघचालकांचे प्रबोधन देशाला प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या दसरा मेळाव्यास यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश, इस्त्रायलचे वाणिज्यदूत यानिव्ह रेवाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी याच जगदीप धनखड यांना अपमानास्पद पद्धतीने उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन पायऊतार व्हावे लागले. त्यांनी कोणत्या कारणावरून मोदी सरकारची नाराजी ओढवून घेतली हे गूढ कायम आहे. खरेतर राज्यसभेत सभापती म्हणून काम करताना ते सरकारला नेहमी झुकते माप देत असत. विरोधकांना सरकारवर टीका करायला फारसा वाव देत नसत. पण अचानक आजारपणाचे कारण देऊन धनखड बाहेर पडले. दिल्लीत राहण्यासाठी त्यांची व्यवस्थाही सरकारने केली नाही. नंतर त्यांची कोणी आठवणही काढली नाही. सरकारची मर्जी खप्पा झाल्याने उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा धनखड यांना द्यावा लागला होता. अशा स्थितीत त्यांना सन्मानाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले, यामागे काय कारण असावे?

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतला दसरा मेळावा आणि आता…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेचे स्थापना केली. याच शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दादर येथील शिवाजीपार्क मैदानावर झाला. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्क गर्दीने ओसंडून वाहत होते. यावर्षी २०...

एसआयआरकडून सत्तापालटाकडे…

सन २०१४मध्ये काँग्रेसप्रणित युपीए सरकारला सत्तेवरून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले. सत्तापालटानंतर तब्बल तीस वर्षांनी एका राजकीय पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ खासदार निवडून आणण्याचा विक्रम केला. २०२४च्या लोकसभा...

रोज नव्याने होत आहे निवडणूक आयोगाचे वस्त्रहरण!

इंडियन एक्स्प्रेसच्या दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकार रितिका चोप्रा यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल करणारा वृत्तांत प्रसिद्ध केला आणि देशभरातून संविधानात्मक दर्जा असलेल्या या संस्थेवर हल्लाबोल सुरू झाला. भारताच्या इतिहासात यापूर्वी निवडणूक आयोगावर एवढी मोठी चिखलफेक कधी झाली नव्हती. सर्व विरोधी...
Skip to content