राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी पक्षाचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
उमेश पाटील यांच्याविषयी थोडेसे..
उमेश पाटील यांची ही नियुक्ती म्हणजे पक्षात त्यांचे वाढलेले राजकीय वजन म्हणून पाहिले जात आहे. पार्थ पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा उमेश पाटील यांची द्विधा मनःस्थिती झाली होती. अजितदादांबरोबर राहायचे की शरद पवारांबरोबर जायचे अशा स्थितीत ते होते. पण नंतर त्यांनी अजितदादांबरोबर राहणे पसंत केले. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकीय गणिते आणि उमेदवारीवरून अजितदादांबरोबर त्यांचे मतभेद झाले. यानंतर त्यांनी पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला. हा विरोध टोकाचा झाल्याने शरद पवार यांनी उमेश पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला नाही. दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षाकडूनदेखील त्यांना पक्षप्रवेशासाठी गळ घालण्यात आली. पण, त्यांनी पुन्हा अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचे ठरवले आणि पक्षप्रवेश केला.

घरवापसीनंतर अजितदादांनी उमेश पाटील यांची पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. सोलापूरमधले पक्षाचे नेते राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हाही उमेश पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावरून अजित पवार यांनी उमेश पाटील यांना कडक शब्दांत सुनावले होते. विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांच्यावरही वादग्रस्त टिपण्णी केल्याबद्दल उमेश पाटील चर्चेत आले होते. अजितदादांच्या निधनानंतर उमेश पाटील पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत राहिले. मधल्या काळात त्यांनी, पक्षातले काही नेते अजितदादांच्या कुटुंबाला टार्गेट करत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती.
कोण आहेत झिशान सिद्दीकी?
आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. बाबा सिद्दीकींनी आपली राजकीय हयात काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी झिशान मात्र काँग्रेससोबतच राहिले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत झिशान काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्या काळात ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीतल्या कथित क्रॉस व्होटिंगच्या वादानंतर ऑगस्ट २०२४मध्ये त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४मध्ये त्यांनी अधिकृतपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ऑक्टोबर २०२४मध्ये त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. तेव्हापासून झिशान सिद्दीकीही हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जाते. या स्थितीतही त्यांनी पार्थ पवारांच्या साथीने आपला राजकीय प्रवास सुरु ठेवला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मे २०२६मध्ये झालेल्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी बिनविरोध निवडून आले. त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२६ ते १३ मे २०३२ असा असेल.

