मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’, या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या मोठ्या व प्रसिद्ध स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्याची संधी मिळाली हे भाग्यच असून, स्वरांकुर संगीत विद्यालयाने यापुढेही त्यांनी असेच उपक्रम सुरू ठेवावेत, असे आवाहन कौशल इनामदार यांनी केले.
या दोन गाण्यांमधून स्त्रीशक्ती जागर आणि स्वराज्याचे संस्कार हा संदेश देण्यात आला आहे. ‘दुर्गा’ या गाण्यात ५८ महिलांनी सहभाग घेतला असून, ते स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि प्रत्येक स्त्रीच्या मनातील सामर्थ्याचा उत्सव साजरा करते, तर ‘शिवबाची मुले’ या गाण्यात ४१ बालगायकांचा समावेश असून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याचे संस्कार आणि मावळ्यांची जिद्द यांना समर्पित स्फूर्तीगीत असून या गाण्यांचे ध्वनिमुद्रण आजिवासन स्टुडिओज व यशराज स्टुडिओज येथे करण्यात आले. दोन्ही गाण्यांना सुप्रसिद्ध संगीतकार सिद्धांत करावडे यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘दुर्गा’ ह्या गाण्याचे लेखन केदार माईणकर यांनी, तर ‘शिवबाची मुले’ ह्या गाण्याचे लेखन दीप्ती माईणकर व केदार माईणकर यांनी मिळून केले आहे.
संगीताच्या माध्यमातून महिलांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ देणे आणि मुलांमध्ये प्रेरणादायी मूल्ये रुजविणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रतिपादन स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या संस्थापिका व सर्वेसर्वा सायली माईणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. २०१२ साली निव्वळ एका विद्यार्थिनीसोबत सुरु केलेल्या या स्वरांकुर संगीत विद्यालयाला १४ वर्षे पूर्ण झाली असून, सध्या १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी (यात अनेक आबालवृद्धांचा समावेश आहे.) सायली माईणकर यांच्याकडून संगीत शिक्षणाचे धडे घेत आहेत. यात काही परदेशी विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. या संगीत शिक्षण विद्यालयात पेटी, तबला यासारख्या वाद्यांचेदेखील शिक्षण देण्यात येत आहे.
हिंदुस्तानी संगीतात एम ए पदवीप्राप्त सायली सोमण माईनकर यांना पं. उत्तमराव अग्निहोत्री, मधुवंती पेठे, प्रख्यात शास्त्रीय गायिका अर्चना कान्हेरे ह्यासारख्या दिग्गज गुरूंचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून अजूनही सायली, सायली तळवलकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतातील पुढील शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा रंगमंचावरचा सादरीकरणाचा आत्मविश्वास वाढावा म्हणून नावाजलेल्या नाट्यगृहांमध्ये वार्षिक कार्यक्रम करण्याचा “स्वरांकुर संगीत विद्यालयाचा नेहमीच आग्रह असून संस्थापक सायली सोमण माईणकर यांनी मयूर सुकले, मधुवंती पेठे, मधुरा कुंभार यासारख्या दिग्गज आणि नावाजलेल्या असामींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. आपल्या या संगीत विद्यालयाच्या जडणघडणीत ब्राह्मण सेवा संघ, जयराज नगर, बोरिवली पश्चिम या संस्थेचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुर्गा व शिवबाची मुले, ही दोन्ही गाणी यू ट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर उपलब्ध असून, लवकरच ती सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

