Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्याच्या महापौर शर्मिला...

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना खुले पत्र!

नवनिर्वाचित महापौर शर्मिलाताई यांना सविनय प्रणाम.

शर्मिलाताई, प्रथम आपले अभिनंदन! आज आपण ठाणे शहराच्या महापौर म्हणून अधिकृतरित्या पदभार सांभाळला. त्याबरोबरच आपले अभिनंदन करण्याचा मान मी घेत आहे. महापौरपदाचा भार सांभाळल्यानंतर आपण शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजेच सत्तारूढ महायुतीचे सरकार ठाणे शहराचा विकास कसा करणार तसेच विकासाच्या काही योजनांची ‘गोडगोळी’ किंवा ‘गोडडोस’ ठाणेकरांच्या घशाखाली सोडणार आहातच! सरकारी अधिकारी तसेच पक्षश्रेष्ठींनी आखून दिलेल्या (खरेतर लिहून दिलेल्या) गोड गोड योजनांची ती जंत्रीच असेल जणू! या जंत्रीला वर्तमानपत्रांचे आकर्षक मथळेही मिळतील. परंतु तुम्ही अस्सल ठाणेकर व अनुभवी नगरसेविका आहात. आतापर्यंत तुम्हालाही अशी भाषणे म्हणजे मधुरपावा वाटली असतील, तसेच ही भाषणे व ठाणे शहरातील नेमकी स्थिती यात किती फरक आहे, वा असतो हे तुम्हीही अनुभवले असेल. पण ताई या गोड गोड शब्दांमागे नेमकी काय परिस्थिती असते ते माझ्यासारख्या पत्रकारांनी आपल्याला सांगावे असे त्यात काहीही नवीन नाही.

ताई, ठाणे शहर व ठाणे जिल्हा खरंतर राज्य सरकारला तगडा महसूल मिळवून देण्यात नेहमीच आघाडीवर राहिलेले असतानाही सरकार ठाणे शहराला साप्तन वागणूक देत असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. ठाणे महापालिका अस्तित्त्वात आल्यापासून येथे एकत्रित काँग्रेस पक्ष व नंतर सलग २५ /३० वर्षे एकत्रित शिवसेना व गेल्या तीन-चार वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचीच सत्ता हॊती. या काळात जनहिताची काहीच कामे झाली नाहीत असे मी म्हणणार नाही. परंतु लोकसंख्यावाढीमुळे वा लोंढ्यांमुळे हे जनहित जनतेपर्यंत पोहोचलेच नाही अशी परिस्थिती आहे. “The mark of great city isn’t how it treats the special places – everybody does that right – but how it treats its ordinary ones” या वचनानुसार जर विचार केला तर पदरी निराशाच येईल, तुमच्याही! ठाणे शहरातील सामान्य माणूस मग तो कोपरी, बाराबंगला, कोपरी कॅम्प, खाडीजवळचा भाग, नौपाडा, गावदेवी, घंटाळी, सर्व नगरे, घोडबंदर रोड उपवन, शिवाई नगर, ढोकाळी नाका, मनोरमा नगर, मानपाडा, पाटलीपाडा, कासारवडवली, वाघबीळ, पोखरण रोड, भिवंडीच्या दिशेने बाळकूम, नारपोलीपर्यंतच्या सामान्य माणसापर्यंत ठाणे महापालिकेचे काम खऱ्या अर्थाने पोहोचलेलेच नाही. महापालिकेतील चतुर अधिकारीवर्ग विविध आकडेवारी माझ्या तोंडावर फेकून मला गप्प करण्याचा प्रयत्नही करतील. परंतु आपण अनुभवी आहात. अधिकाऱ्यांची चतुराई आपण लगेचच ओळखाल अशी आशा नाही, खात्री आहे.

ताई, ठाणे शहराची परिस्थिती पाहयची असेल तर ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत तैनात असलेल्या बसेसमधून प्रवास करा! बसमधून प्रवास केल्यास आपल्या शहराची नव्याने ओळख होते असे जाणकार म्हणतात! (आपल्याला बसमधून प्रवास करायला सांगून मी आपला अवमान निश्चितच करू इच्छित नाही.) महापालिकेच्या लव्याजम्याजम्यासह प्रवास केल्यास अधिकारी त्यांना हवा असलेला छान छान विभागच दाखवतील, अशी रास्त भीती वाटते आणि हल्ली बऱ्याच भागात वातानुकूलीत बससेवा असल्याने घामाघूम होण्याचा प्रश्नच नाही. शिवाय बससेवा कशी चालते हेही आपल्याला समजेल. ठाणे शहरातील कुठलीही बससेवा अर्ध्या-एक तासाशिवाय नागरिकांना उपलब्ध होत नाही. केवळ एक-दोन बसरूट वगळता कधीच बससेवा उपलब्ध नसते हे अघोरी सत्य आहे. ताई, एकदा संध्याकाळी पश्चिमेच्या सॅटिस पुलावरील बस टर्मीनसवर केवळ पाहणी करण्यासाठी दूरवर उभ्या राहा. तुम्हाला नोकरदार महिला, मुलींचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हाल डोळ्यांनी पाहता येतील. बसच्या रांगांसाठी शहरातील वाहतूककोंडीचे कारण नेहमीच पुढे केले जाते. ते तितकेसे न पटणारे आहे. लांब पल्ल्यावरून येणाऱ्या बसेससाठी कोंडी हे कारण असू शकते. परंतु सर्वांसाठी नाही. तसेच सॅटिस पुलावर राखीव बसेस उभ्या करण्यासाठी जागा नाही, हे एकवेळ मान्य केले तरी खालीच असलेल्या एसटी बसआगाराच्या रिकाम्या जागेत तीन-चार बसेस सहज उभ्या राहू शकतात. आगाराच्या पुढील बाजूसही रिकामी जागा आहे. तेथे रिक्शावाले व फेरीवाले गजाली करत असतात. याबाबत बरेच लिहिता येईल, पण पहिल्याच दिवशी मला सहनशिलतेचा अंत पाहयचा नाही.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षाxपासून प्रदूषण कमालीचे वाढलेले आहे या लेखाबरोबर प्रदूषणाचे एक छायाचित्र आहे. हे छायाचित्र ढोकाळी भागातील असून ते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घेतलेले आहे. ही केवळ झलक आहे. शहराच्या कुठल्याही भागात असे दृश्य पाहायला मिळेल. शहरात सुरु असलेली बेसुमार बांधकामे, अवजड वाहनांची वाढलेली वहतूक व मोटारगाड्यांची दररोज वाढत जाणारी संख्या या प्रदूषणाचे खरे कारण आहे. एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शहरातील रस्ते धुण्याचा प्रस्ताव दिलेला होता. काही दिवस ते कामही झाले. परंतु नंतर मात्र अधिकारीवर्गाने तो आदेश चक्क गुंडाळून ठेवला. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी बसवलेली यंत्रेही आता मूक झालेली आहेत नौपाडा, गोखले रोड, धोबी आळी, वागळे इस्टेट आदी अनेक भागात पुनर्विकासाची प्रचंड कामे सुरु आहेत. धोबी आळी व तालावपाळी भागातील कामाच्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाचा पत्ताच नाही. याकडेही एकदा लक्ष द्यावे ही विनंती.

ताई, तुम्हाला आठवंतच असेल की, गेल्यावर्षी पाऊस चिक्कार झालाय. ठाणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली असे मथळेही आले. तरी पाणीपुरवठायची किती दयनीय अवस्था आहे हे आपण जाणतच असाल. या पाणीकपातीमुळे अनेक निवासी संकुलात सोलर यंत्रणा चक्क ‘थंड’ झालेली आहे. काय विनोद आहे पाहा. महापालिकेचा आदेशच आहे की, सोलर यंत्रणा बसवा आणि पाणीच नाही. ती यंत्रणा धूळ खातेय. काही दिवसांनी ती गंजणारच. आमच्या इमारतीत तर आलटूनपालटून गेले सहा महिने सोलर गुलच आहे. ताई, तुम्ही कोपरी भागातून येता. या विभागात समाजकंटकांचा बराच राबता असतो, असे बोलले जाते. तसा तो इतरही भागात आहे. पण आता आपण महापौर होणार म्हणून सर्वप्रथम आजूबाजूला साफसफाई करा! थोडक्यात ब्राह्महत्त्या नको. तुम्ही सर्वसाधारण घरातून आलेल्या गृहिणी आहात. उपमुख्यमंत्री एकनाथरावांनी आपल्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवलेली आहे. त्याला कृपा करून गालबोट लागेल असं कुणाला वागू देऊ नका! आणि सर्वप्रथम सिद्धार्थ नगर चकाचक करा. कचराकुंड्या साफ होतील असे पाहा. कोपरीतील सार्वजनिक प्रसाधनगृहे दररोज साफ होतील याकडे जातीने लक्ष द्या. तेथील जनतेला कोणी वाली नसल्यासारखे जिणे असल्याचे तेथे फेरफटका मारला असता जाणवते. पाहा काय-काय जमतंय ते!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जेलवारी करणारे छगन भुजबळ होते ‘राजबंदी’?

महाराष्ट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपतून सरकारच्या इडी यंत्रणेने आरोपमुक्त केल्याची बातमी काल आली आणि इंग्रजीतील आघाडीचे साप्ताहिक 'आउटलूक'मध्ये 'Thou Shalt Not Dissent' ही मुखपृष्ठकथाही कालच बाहेर आली! तसा भुजबळ यांचा...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे...

आव्हान भाजप-शिवसेनेपुढचे!

राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई...
Skip to content