Homeब्लॅक अँड व्हाईटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत ठाण्याचे वर्चस्व!

वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या वातानुकूलीत सभागृहात नुकतीच ६०वी वरिष्ठ गटाची राज्य कॅरम स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली. ४ दिवस चालेल्या या स्पर्धेचे देखणे आयोजन ठाणे जिल्हा कॅरम संघटना आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांनी संयुक्तपणे केले होते. ४८०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेला लाभला होता. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष एकेरी, वयस्कर महिला एकेरी आणि पुरुष, महिला सांघिक अशा एकूण ६ विविध गटांत सामने घेण्यात आले. सहापैकी ३ गटात ठाण्याने जेतेपदाचा मान मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या महिला संघाने पहिल्यांदाच सांघिक विजेतेपद मिळवले, तर महत्त्वाच्या पुरुष आणि महिला एकेरी गटात अनुक्रमे त्यांच्याच झैद अहमद फारूकी, समृद्धी घाडीगावकरने जेतेपदाचा मान मिळवला. वयस्कर पुरुष गटात पुण्याच्या संजय थिटे यांनी आपले पहिले अजिंक्यपद पटकावले, तर याच गटात महिलांमध्ये कोल्हापूरच्या शोभा कामत यांनी आठवे विजेतेपद मिळवले. पुरुष विभागाचे सांघिक अजिंक्यपद पुण्याने तिसऱ्यांदा पटकावले.

पुरुष गटात दुसरे मांनाकन देण्यात आलेल्या झैद अहमदने आपले पहिले जेतेपद मिळवताना पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा रंगतदार लढतीत पहिला सेट गमावून‌देखील पुढचे दोन सेट जिंकून बाजी मारली. झैदने दोन सेटमध्ये आपला खेळ चांगलाच उंचावला. चांगले “ब्रेक” करत त्याने सरळ सोंगट्या झटपट घेत अभिजितला दबावाखाली ठेवले. त्याने बचाव आणि आक्रमण याचा सुरेख मिलाफ साधला. झैद डावखुरा खेळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याच्या खेळाचा फारसा अंदाज येत नाही. त्याचा फायदा नेहमीच झैदला होतो. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत माजी विश्वविजेत्या जळगावच्या संदीप दिवेने मुंबईच्या सौरभ मतेचा सरळ दोन‌ सेटमध्ये पराभव केला. सौरभ मतेने या स्पर्धेत महम्मद गुफ्रान, अनिल‌ मुंढे या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नमवून साऱ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. अभिजित त्रिपनकरने उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्या आणि स्पर्धेत पहिले मानांकन देण्यात आलेल्या प्रशांत मोरेचा तीन सेटमध्ये सनसनाटी पराभव केला.

महिला एकेरीत अव्वल मांनाकन देण्यात आलेल्या ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने आपले प्रथम मानांकन सार्थ ठरवताना झैदप्रमाणेच पहिले अजिंक्यपद पटकावले. तिने निर्णायक सामन्यात पालघरच्या श्रुती सोनावणेचा सरळ दोन‌ सेटमध्ये पराभव केला. सुरूवातीपासून आक्रमक खेळ करुन‌ समृद्धीने श्रुतीला विजयाची बिलकुल संधी दिली नाही. आक्रमक खेळासाठी समृद्धी ओळखली जाते. त्याचीच प्रचिती अंतिम सामन्यात बघायला मिळाली. अनुभवाने आता तिच्या खेळात चांगली परिपक्वता आली आहे. ती आय.आय.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात नीलम घोडकेने ऐशा साजिद खानचा सरळ दोन‌ सेटमध्ये पराभव केला.

वयस्कर पुरुष गटात चौथे मांनाकन देण्यात आलेल्या पुण्याच्या संजय थिटे यांनी आपले पहिले जेतेपद मिळवताना मुंबईच्या सत्यनारायण दौतुलाचा सरळ दोन‌ सेटमध्ये पराभव केला. याच गटात तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्याच फैयाज शेख यांनी मुंबईच्या हेमंत पांचाळ यांनादेखील सरळ दोन‌ सेटमध्ये नमवले. याच गटात महिलांमध्ये कोल्हापूरच्या शोभा कामत यांनी आपले आठवे विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. दुसरे मानांकन देण्यात आलेल्या कामत यांनी अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या चौथे मानांकन देण्यात आलेल्या माधुरी तायशेटे यांचा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात कामत यांनी मुंबईच्या रोझिना गोदादचा तर तायशेटे यांनी ठाण्याच्या मीनल लेलेचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत रोझिनाने मीनल यांच्यावर विजय मिळवला.

सांघिक स्पर्धेत पुरुष गटात पुण्याने आपले तिसरे जेतेपद मिळवताना ठाण्याचा २-१ सामन्यात पराभव केला. अनिल मुंढे, रहिम खानने पंकज पवार, समीर अंसारी जोडीचा पराभव करून पुण्याला आघाडी मिळवून दिली. झैद अहमदने अभिजित त्रिपनकरचा पराभव करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या निर्णायक सामन्यात माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीने कुणाल राऊतचा रंगतदार लढतीत तीन सेटमध्ये पराभव करून पुण्याचा विजय पक्का केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात रत्नागिरीने बलाढ्य मुंबईचा २-१ असा पराभव केला. रियाझ अकबर अलीने अनुभवी विकास धारियाचा पराभव करून रत्नागिरीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या प्रशांत मोरेने अभिषेक चव्हाणचा पराभव करून मुंबईचे आव्हान कायम राखले. पण निर्णायक दुहेरी सामन्यात मात्र‌ रत्नागिरीच्या राहुल भस्मे, योगेश कोंडविलकर जोडीने गिरीश तांबे, निलांश चिपळूणकर जोडीला पराभूत करुन आपल्या संघाचे जेतेपद निश्चित केले. महिला गटाचे जेतेपद मिळवताना ठाण्याने सर्वात जास्त गुण मिळवले. महत्त्वाच्या मुंबईविरुद्धच्या लढतीत त्यांनी ३-० असा सहज विजय मिळवून आपले विजेतेपद पक्के केले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या सोनाली कुमारीचा, मधुरा देवळेने अंबिका हरिथचा, दुहेरीत चैताली लवाटे, वीणा चव्हाणने ऐशा खान, मिताली पाठक जोडीचा पराभव केला. ठाणे संघाला प्रदीप साटम यांचे मार्गदर्शन मिळाले.

पुरुषांप्रमाणे महिला गटातदेखील रत्नागिरीने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेत एकूण ३८ व्हाईट आणि‌ ३ ब्लॅक स्लॅमची नोंद झाली. एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके स्पर्धेत ठेवण्यात आली होती. ४५०पेक्षा जास्त खेळाडूंचा प्रतिसाद स्पर्धेला लाभला. ३०पेक्षा जास्त कॅरम बोर्डवर सामने रंगले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आशिष बागकार, रमेश चव्हाण यांनी काम पाहिले. तर आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांनी तांत्रिक संचालक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली. सिस्का कंपनीचे बुलेट शॉट कॅरम बोर्ड आणि बुलेट शॉट सोंगट्याचा वापर स्पर्धेत केला गेला. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष विजय एस पाटील, सचिव विजय आर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेला मिळाले. स्पर्धेला नवी मुंबईतील कॅरमप्रेमींचा छान प्रतिसाद लाभला. राज्यातील सर्वच बडे कॅरमपटू सहभागी झाल्यामुळे कॅरम चाहत्यांना या खेळाची जणू काही मेजवानी मिळाली. विजय एस पाटील स्वतः चांगले कॅरमपटू असून भविष्यात राष्ट्रीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...

एक-एक बोट छाटून काढणाऱ्या सर गॅरी सोबर्सना सलाम!

वेस्टइंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाने २०व्या शतकातील एक सर्वोतम अष्टपैलू खेळाडू गमवला आहे. एक आर्कषक, शैलीदार फलंदाज, प्रभावी गोलंदाज आणि चपळ, दक्ष क्षेत्ररक्षक या खेळाच्या तीनही प्रमुख अंगात सोबर्स यांनी स्वतःचा एक वेगळा...

अशी घातली स्पेनने फुटबॉल विश्वविजेतेपदाला गवसणी!

गेले सव्वा महिना सुरु असलेला फुटबॉलचा विश्वचषकाचा महाकुंभ आता संपला आहे. फुटबॉलविश्वाला आता स्पेनच्या रुपाने पुन्हा फुटबॉलसम्राट मिळाले. २०१० साली आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनने तब्बल १६ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या...
Skip to content