Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धवजी.. आतातरी निष्ठेची...

उद्धवजी.. आतातरी निष्ठेची कदर करा!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची दिल्लीतल्या साहित्य संमेलनातील फटकेबाजी त्यांना राजकीय फायदा करून देणार की खड्ड्यात घालणार हे काळच ठरवेल. दिल्ली येथील साहित्य संमेलनात एका परिसंवादात बोलताना नीलमताईंनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर खळबळजनक आरोप केला. त्यामुळे साहित्य संमेलनापेक्षा नीलमताईंच्या आरोपाचीच चर्चा सुरू झाली. मातोश्रीवर दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळतात, अशा आशयाचा आरोप त्यांनी साहित्य संमेलनात केला. त्यामुळे या आरोपावरूनच चर्चा सुरू झाली.

उद्धव

खरे म्हणजे नीलमताईंना विधान परिषद केवळ शिवसेनेमुळे मिळाली. नीलमताईंनी प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ईशान्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी त्यावेळी लाखभरापेक्षा जास्त मते मिळवली. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात नीलमताईंचे मोठे सामाजिक काम होते. परंतु रिपब्लिकन पक्षात आपल्याला काही राजकीय पद मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. पुढे त्या शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेल्या. परंतु तेथेही आपल्याला काही राजकीय भवितव्य नाही हे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा उजव्या विचारसरणीच्या शिवसेनेकडे वळवला. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी दिवंगत पत्रकार हर्षद पाटील यांनी खूप मेहनत घेतली. केवळ त्यांच्यामुळेच नीलमताईंचा शिवसेनेत प्रवेश झाला.

उद्धव

2000 साली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नीलमताईंना अचानक 2002 साली उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद देण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या अनेक महिला शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेत पाठवले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना चांगला धडा मिळाला आहे. नीलमताईंनी शिवसेनेच्या रस्त्यावरील कोणत्या आंदोलनात भाग घेतला? आणि त्यामुळे त्यांना विधान परिषद दिली याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे. त्यांना मिळालेला धडा हा नियतीचा सूड आहे हे ठाकरे यांनी विसरू नये.

उद्धव

चार पक्ष फिरून आलेल्या नीलमताईंना उद्धव ठाकरे यांनी चार वेळा विधान परिषद दिली. गेल्यावेळी त्यांना विधान परिषदेचे उपसभापतीपदही दिले. या पदाला कॅबिनेट दर्जा असल्याने हे पद पुन्हा आपल्याकडेच राहवे म्हणून त्यांनी रंग बदलले. लगेचच त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या नाहीत. मात्र महायुतीचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढल्यानंतर लगेचच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे उपसभापतीपद कायम राहिले. अन्यथा त्यांना हे पद सोडावे लागले असते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या शिफारसीने भाजपमधून आलेल्या प्रा. मनीषा कायंदे यांना शिवसेनेत येताच लगेच विधान परिषदेवर पाठवण्यात आले. मात्र त्याही शिंदे सेनेत दाखल झाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेले धडे चांगलेच आहेत.

उद्धव

नीलमताईंच्या आरोपात तथ्य नाही. परंतु पक्ष चालवण्यासाठी पार्टी फंड लागतोच. नारायण राणे ते एकनाथ शिंदे हे काही कर्तुत्त्वावर मोठे झालेले नेते नाहीत. नारायण राणे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष असताना, महसूल मंत्री झाल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर सर्वाधिक पक्षनिधी दिला. त्यामुळेच ते सर्वांना डावलून मोठे झाले. 1990पासून आमदार आणि नेते असलेल्यांना डावलून 2004 साली निवडून आलेले एकनाथ शिंदे केवळ पक्षनिधीच्या जीवावरच मोठे झाले. त्यांची राजकीय क्षमता त्यांच्या वक्तृत्वावरून लक्षात येते. परंतु उद्धव ठाकरे यांना हे नियतीने दिलेले धडे आहेत. पक्षासाठी आणि संघटनेसाठी राबणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना मातोश्रीबाहेर तिष्ठत ठेवून केवळ पक्षनिधी देणाऱ्या कालच्या नेत्यांना मातोश्रीमध्ये महत्त्व आले. पण नियतीचा खेळ बघा. सर्वाधिक पक्षनिधी देणारे नेते सर्वांच्या अगोदर पक्षाबाहेर गेले. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 64व्या वाढदिवसाला 64 ॲम्बुलन्स देणारे गणेश नाईकसुद्धा पक्षाबाहेर गेले. सर्व निवडणुकांचा सर्वाधिक खर्च सांभाळणारे नारायण राणेसुद्धा पक्षाबाहेर गेले. ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक पक्षनिधी देणारे एकनाथ शिंदेही पक्षाबाहेर गेले. यापुढे तरी उद्धव ठाकरेंनी निष्ठेला प्राधान्य देत निष्ठावानांची कदर करायला हवी. नाही तर त्यांचा ‘हम दो, हमारे दो..’ तसेच ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी..’ व्हायला वेळ लागणार नाही!

संपर्क- 9820355612

Continue reading

वाचाळ पडळकरांची जीभ सारखी घसरते तरी कशी?

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वाचाळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगलीतील वक्तव्यावरून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शरद पवार यांंच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ नेहमीप्रमाणे घसरली. पडळकर यांनी थेट जयंत पाटील यांचे दिवंगत पिता राजाराम...

ठाकरे ब्रँडला धूळ चारत शशांक राव निघाले ‘डार्क हॉर्स’!

बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी ताब्यात घेण्यासाठी तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी महायुती सरकारचे भक्कम...

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी रश्मी वहिनींचाही झाला दिल्ली दौरा?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एकाचवेळी दिल्ली दौरे केले. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह...
Skip to content