Homeमाय व्हॉईसमृत्यूच्या तांडवात धंदा...

मृत्यूच्या तांडवात धंदा कसला करताय?

व्यापाऱ्यांना मृत्यूच्या तांडवात कसला धंदा करायचाय? समाजातील प्रत्येक घटकाला हे सारे सहन करावे लागतेय, व्यापारी काही एकटे नाहीत. मग तेव्हा थाळ्या बडवणारे, दिवे पेटवणारे आता असा आततायीपणा का करतायत? राजकारण्यांच्या हातचे बाहुले होऊन, नको त्या विषयात राजकारण खेळावे, अशी आजची स्थिती आहे का? लॉकडाऊन कोण जाहीर करतं, यावर तुमच्या भूमिका ठरणार का? संवेदनशील असाल तर आजूबाजूला जीव गमावत असलेली माणसे पाहा. तुम्हाला धंदा महत्त्वाचा वाटतोय; पण मग लोकांच्या जीवाचे मोल कुणाला?

केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात आता कोरोना स्थिती भीषण झाली आहे. आपल्या राज्यात प्रामाणिकपणे चाचण्या, रुग्ण, मृत्यू यांचे आकडे जाहीर होतात; इतर राज्ये ते दडवतात. मात्र, आता तिथले बिंग फुटतेय. लोकांचे जीव जाताहेत, हॉस्पिटलात बेड नाही, आयसीयू फुल्ल, व्हेंटिलेटर नाही, रेमेडेसिविर नाही, लस संपलीय.. शवागारात जागा नाही, स्मशानात वेटींग आहे. आपल्याकडे अहमदनगर शहरात काल एकाचवेळी 42 चिता पेटल्या. आजूबाजूला अनेक परिचित मंडळी, तरुण यावेळी जीव गमावून बसले आहेत. बालकांना लागण होत आहे.

हा दुसऱ्या लाटेतील म्युटंट धोकादायक आहे.  अशावेळी धंद्याचा आणि स्वतःचा, इतरांचा जीव वेठीस घालण्याचा अट्टाहास का? सर्वसामान्य माणूस नोकरी गमावून, बेरोजगार होऊन, शेतकरी नुकसान सोसून, एखाद-दोन आठवड्यांची बेगमी करतात काहीतरी. तर मग एरव्ही नफा कमावणारे व्यापारी तर नक्कीच करू शकतात. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, यावेळी परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा भीषण आहे. मग गेल्यावेळी तुम्हाला घरात बसून राहणे जे राष्ट्रीय कर्तव्य वाटत होते, ते यावेळी नकोसे का वाटतेय? “ब्रेक दी चेन”ऐवजी तुम्हाला “ब्रेक दी रुल्स”चा खेळ का मांडावासा वाटतोय? विकृत राजकारण करणारे नालायक, काहीही शेण खावोत, कुणालाही फूस लावोत; पण मग समाजातील जबाबदार व्यापारी, व्यावसायिक घटक अशा राष्ट्रीय संकटात अशी भूमिका कशी घेऊ शकतो?

हा प्रश्न फक्त राज्यातच नाही. उलट आता गुजरातमध्ये तर हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले. त्यानंतर तिथे महाराष्ट्राच्या धर्तीवर संचारबंदी व इतर उपाययोजना करण्यात आल्या. दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातसुद्धा महाराष्ट्राच्या उपाययोजना लागू कराव्या लागल्या. किमान 9 राज्यांनी महाराष्ट्र मॉडेल आपल्या राज्यात लागू करून कोरोना रोखण्यासाठी पावले उचलली. मग महाराष्ट्र इतका आततायी आणि जीवावर उदार का होतोय? काही राजकारणी मंडळींची तर निव्वळ “नौटंकी” सुरू आहे; पण हे “महाराष्ट्रद्रोही” का आपल्याला ठाउक नाहीत.

लसीबाबत राज्यावर इतका मोठा अन्याय झाला तेव्हा या थयथयथाट करणाऱ्या नाच्यांच्या दाढा उठल्या नाहीत; तोंडाला मुंगसे लावून बसले. विकृत राजकारण्यांना त्यांचे नालायक खेळ करू द्यात. आपण आपले गाव, परिसर, शहर यात किती ओळखीची माणसे गमावून बसलोय, किती नातेवाईक मृत्यूच्या दाढेतून परत आलेत, याचे तर किमान आकलन करू शकतो. प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, की आपले गाव, शहरात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून धंदा करावा, अशी स्थिती आहे का?

फक्त भारतात नाही, युरोपातसुद्धा अनेक निर्बंध आहेत. आपण भान राखून आपल्या जबाबदारीचे पालन करणार आहोत की नाही? जिवापेक्षा जर आपल्याला धंदा महत्त्वाचा वाटत असेल तर खुशाल नियम मोडा, खुशाल धंदा करा. एखादा जवळचा, परिचित माणूस खुल्या व्यवहारांमुळे लागण होऊन जीव गमावून बसेल तेव्हा आपल्या हाती पश्चातापाशिवाय काहीही नसेल. ईश्वर करो, ती वेळ कुणावर न येवो. कुणाच्याही घरात कुठली वाईट बातमी न येवो. घरात राहा, सुरक्षित राहा. थोडी तडजोड करून सहज जगता येते काही दिवस. आपले अस्तित्त्व कायम राहणे महत्त्वाचे, धंदा काय आज नाहीतर उद्या करायचाच आहे, होणारच आहे. जान है तो जहाँ हैं.. सर सलामत तो पगडी पचास..

1 COMMENT

  1. आपण जेष्ठ पत्रकार आहात ?
    तर  सत्य नागडे असते त्याकडे पाहवत नाही काय? 
    लता दिदीचे अजरामर गाणे ” जण पळभर म्हणतील हाय हाय” विसरलात,
    की गीतेचा सल्ला ‘कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे’ हे आठवले नाही.?”श्रम आणि भाकर हेच अनंत सत्य आहे”
    आणि आणि सत्य हेच आहे की मानव नागडा येतों आणि नागडाच जातो. गेले ते गेले; आहेत त्यांचे काय?हे सत्य विसरणारे नकोत समाजाला आणि बहुसंख्य गरिबाला. जाणीव हरवून बसलो आहोत आपण!
    पण त्याची चाड कोणाला आहे?

Comments are closed.

Continue reading

सावधान! सर्रास घेतली जाणारी ‘पेनकिलर’ ठरू शकतात विष!!

आपल्याला थोडं जरी डोकं दुखलं, अंगदुखी जाणवली किंवा ताप आला की आपण लगेच घरच्या कपाटातील किंवा जवळच्या मेडिकल स्टोअरमधून एखादी 'पेनकिलर' घेतो. ही औषधं तात्पुरता आराम देत असली तरी, त्यांचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीचे सेवन जीवघेणे ठरू शकते. एका...

शेअर बाजारातून ३५ लाख गुंतवणूकदारांची ‘एक्झिट’! ‘एनएसई’ला मोठा झटका!!

गेल्या काही वर्षांत शेअर बाजाराची वाढलेली क्रेझ आता काहीशी ओसरताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय शेअर बाजारातून (एनएसई) तब्बल ३५ लाख सक्रिय गुंतवणूकदारांनी आपली पाठ फिरवली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का ठरला असून,...

लय बिघडली आणि स्वरसाज विखुरला…

आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी...
Skip to content