Homeमाय व्हॉईसडिजिटल पिढीला हवंय...

डिजिटल पिढीला हवंय सेलिब्रिटींच्या लग्नाचंही लाईव्ह कव्हरेज…

खात्रीने सांगतो,‌ तेलगू आणि कोडवा अशा दोन्ही रितीरिवाजानुसार उदयपूर येथे पार पडलेले विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मन्दाना यांच्या शाही ग्लॅमरस लग्नाचं लाईव्ह कव्हरेज तुम्हाला नक्कीच आवडले असते.‌ (साऊथच्या फिल्मवाल्याचे उत्तर भारतात लग्न हादेखील यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अथवा ॲन्गल आहे.‌ तात्पर्य, साऊथच्या चित्रपटासह आता सेलिब्रिटींचे लग्नदेखील हिंदीभाषिक पट्ट्यात) अतिउत्साही चाहत्यांनी तर आपल्या प्रशस्त हाॅलमधील सव्वीस-तीस इंचाच्या टी. व्ही.वर लग्न लागताना अक्षतादेखील टाकल्या असत्या. आणि आपल्याच घरातील आईस्क्रीम खाल्ले असते.

आजच्या डिजिटल युगात सेलिब्रिटीजचे लग्न घरबसल्या पाहता यायला हवे. मग ते फिल्मवाले असोत, रिल स्टार असोत, क्रिकेटर्स असोत, हाय प्रोफाईल उद्योजक असोत, पाहू देत हो आम्हाला तुमच्या लग्नातील थाटमाट, श्रीमंती, महागडे दागिने, स्टायलिश लूक, खानापिना इतकेच नव्हे तर विविध राज्यांमधील, भाषांतील भिन्न प्रकारची लग्नसंस्कृती आणि परंपरा
वगैरे दिसू देत.‌ तरी बरं अशा बहुचर्चित लग्नाच्या गोष्टी नि फोटो लगोलग सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. देश-विदेशात कुठेही लग्न लागताच त्याचे फोटो पाहायला मिळताहेत, कधी उखाणाही पाहायला मिळतोय. हेच जर लाईव्ह कव्हरेज असेल तर? विरोश लग्ननिमित्ताने हे सांगायलाच हवे. विजय आणि रश्मिका यांचं लग्न विरोश म्हणून ओळखले जात आहे. त्यात साऊथ संस्कृतीनुसार भलेभले मोठेमोठे फुलांचे हार आहेतच. पुष्पगुच्छ आहेत.

क्रिकेट, फूटबाॅल यांच्या सामन्याचे मल्टीप्लेक्सच्या भव्यदिव्य दिमाखदार पडद्यावरचे लाईव्ह कव्हरेज तिकीट काढून पाहिले जातेय तसेच सेलिब्रिटीजचा लग्नसोहळा, त्याचा चमकदार स्वागतसोहळा हेदेखील मल्टीप्लेक्सच्या आलिशान संस्कृतीत पडद्यावर दिसू देत. काय सांगावे, हा लाईव्ह खेळ हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केला जाईल. अजून तृप्ती डिमरी, श्रद्धा कपूर अशा अनेक सेलिब्रिटीजची लग्ने व्हायचीत. तेव्हातरी असा लाईव्ह योग येऊदेत. लग्नाची व्हिडिओ कॅसेट म्हणून थट्टा झालेला राजश्री प्राॅडक्शन निर्मित व‌ सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (१९९४) महागडे तिकीट काढूनही त्या काळात पहिल्या शोपासूनच सुपरडुपर हिट‌ झाला आणि‌ रुपेरी पडद्यावरील हा लग्नसोहळा पाहण्यासाठी चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांची पुन्हापुन्हा वारी केली. तेव्हाच स्पष्ट झाले, पडद्यावरील लग्ने पाहण्यातही एक प्रकारचा आनंद असतो.

छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही भरजरी लग्न पाहायला रसिकांची पसंती मिळाली. अंधेरीतील द क्लब येथील माधुरी दीक्षित आणि डाॅ. श्रीराम नेने यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आज तक, या उपग्रह वाहिनीवरील काही मिनिटांच्या लाईव्ह कव्हरेजला प्रचंड दाद मिळाली होती. त्यांनी अमेरिकेत लग्न करून आश्चर्याचा धक्काच दिला होता आणि माधुरीचा नवरा दिसतो ग कसा, याची बरेच दिवस उत्सुकता होती. ही गोष्ट १९९९ची. आज आपण बरेच पुढे आलो आहोत. लाईव्ह क्रिकेट पाहायला सरावलोय, हल्ली कुठलीकुठली भाषणेही वृत्तवाहिनीवर लाईव्ह असतात. बरेचसे राजकारण आज लाईव्ह असते. (पण दिसत नाही हा भाग वेगळा) अशा प्रगतीत हाय प्रोफाईल लग्नाची गोष्ट लाईव्ह असू देत. आज सेलिब्रिटींचे अलिबागमधील फार्महाऊस अथवा रिसॉर्ट असू देत, काही सेलिब्रिटीजचा हाॅटेल उद्योग असू देत, त्या बातम्यांमुळे ते चित्रपटात नेमकं काय करतात हे दुय्यम होत चाललेय की काय असे वाटते. नवीन चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तसं जाणवत नाही. तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला सेलिब्रिटींच्या अभिनयशैली, भूमिकेसाठी निवड, मग त्यानुसार तयारी अशा गोष्टींपेक्षा अन्य गोष्टींतच म्हणजे त्याचे काही कोटींचे बावीस अथवा तिसाव्या मजल्यावरील हजार – दीड हजार स्क्वेअरफूटचे घर, त्यातील सजावट (त्यामुळेच आपलं घर हे एक हाॅटेल अथवा कॅफे वाटू नये याची घेतली जात असलेली काळजी), एखाद्याचे रिसोर्ट, काहींची नवीन माॅडेलची चकाचक गाडी अशाच गोष्टीत विशेष रस आहे. त्याचीच कन्टिन्युटी म्हणजेच त्यांच्या लग्नाचेही लाईव्ह कव्हरेज असू देत, दिसू देत.

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

रिमेक बनवताय? सावधान! जेन झी बघतोय!!

तुम्बाडची मंजुळा पाहणाऱ्या काही जणांनी लगोलग समाजमाध्यमावर म्हटलं, हा मराठी चित्रपट 'सु फ्राॅम सो' या लोकप्रिय कन्नड चित्रपटाची रिमेक आहे. कोणी म्हणालं, अगदी असाच हा चित्रपट आहे (खरंच का), तर कोणी म्हणालं, मूळ गोष्टीला कोकणच्या पार्श्वभूमीवर अगदी छान मांडलंय....

सलमानचं ‘ते’ रुपडं आहे तरी कसलं द्योतक?

दादा कोंडके द्वैअर्थी संवादासाठी ओळखले जात होते तरी कधीकधी ते एखादं सत्य सहज बोलून जात असत. दादा कोंडके यांच्या कामाची एक पद्धत होती. आपला चित्रपट पूर्ण झाल्यावर ते मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना गोव्याला फिरायला नेत. या प्रवासात ते जे...

कोईम्बतूरला रंगला ट्रेलर लाँच आणि मग …

जग जवळ आले आहे हे आता बोलायची, सांगायची, ऐकायची गरज नाही. ते घडताना दिसतेय. आता तुम्हीच बघा ना, तमिळनाडूच्या कोईम्बतूरला दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या 'जी डी एन' (नायडू) या मल्याळम चरित्रपटाचा रंगतदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडतोय न पडतोय...
Skip to content