Homeमाय व्हॉईसपाण्यासाठी दाहीदिशा.. का...

पाण्यासाठी दाहीदिशा.. का आम्हा फिरवीशी रे आयुक्ता?

गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची कल्पनाच केलेली नव्हती. ठाण्यासारख्या मुंबईनजीक असलेल्या महानगरात आजही अशी परिस्थिती असेल तर गावखेडयात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी!

जोरदार पावसामुळे पिसे येथील उदंचन केंद्रात गाळ साठला होता. तो साफ करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे, असा गुळमुळीत खुलासा महापालिकेने केला आहे. खरेतर हा खुलासाच गुळमुळीतच आहे, कारण याच व आजूबाजूच्या क्षेत्रातून मुंबई शहरालाही पाणीपुरवठा होत असतो. या जोरदार पावसाच्यावेळी भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या यंत्रणेतही मोठा बिघाड झाला होता. पाणी शिरून तेथेही चिखल झालेला होता हे वाचकांना आठवत असेलच. मुंबई महापालिकेनेही काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. परंतु तेथील जल अभियंत्यांच्या टीमने दिवसभर काम करून वा सर्वांना कामाला लावून पाणीपुरवठा अर्ध्या दिवसात पूर्ववत केला होता. हे सविस्तरपणे इतक्यासाठीच सांगितले की अधिकाऱ्यांचा नेता कार्यकुशल असला की त्याचे चांगले परिणाम दिसतातच! 

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याची एकदा झाडाझडती होण्याची गरज आहे. दुरुस्तीच्या नावाखाली ठाणे शहरात महिन्यातून दोनदा, तीनदा पाणीकपात केली जाते आणि नंतरचे चार दिवस कमी दाबाने पाणी सोडले जाते. म्हणजे ती अप्रत्यक्षपणे पाणीकपातच असते. शिवाय विजेच्या वापरात बचत व्हावी म्हणून सरकारने येथील इमारतींच्या बांधकामात सोलर पद्धतीचा वापर सक्तीचा केलेला आहे. अशी पाणीकपात होते तेव्हा या वीजबचतीला सपशेल हरताळ फासला जातो व गिझरचा वापर करावा लागतो.

या लेखाबरोबर एक छायाचित्र जोडण्यात आले आहे. आयुक्त विपीन वर्मा यांना हे ठिकाण माहीत आहे की नाही याची कल्पना नाही. नसली तर त्यांनी याची माहिती करून घ्यावी आणि कोणताही लवाजमा न घेता आणि विशेष म्हणजे खासगी गाडी घेऊन चालकही नवीन घेऊन बाळकुममार्गे साकेतला जावे. तेथे भल्यामोठ्या जल वाहिन्यांखाली असे टँकर शेकड्याने उभे असलेले दिसतील. तुमच्या (आयुक्तांच्या) मनात सहज प्रश्न निर्माण होतील.. अरे, इतके टँकर येथे कशाला?

आयुक्त महोदय याचे उत्तर सोपे आहे. ‘जनतेच्या सेवेसाठी आणि नंतर मेवा खाण्यासाठी..’ काही लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा पाण्याचा व्यापार या ठाणे शहरात खुलेआम सुरू आहे. पाणी महापालिकेचे.. तेही फुकट.. मात्र टँकरमध्ये ते पाणी जाताच त्याची किंमत वाढते. कधीकधी किंमत पाच हजारांपासून दहा हजारावर कधी पोहोचते ते मूळ मालकलाही कळत नाही. काही फेरीवाले कसे चेहरा पाहून पुडी सोडतात किंवा भाव लावतात.. अगदी तसेच! घोडबंदर रोड किंवा माजीवडा येथील पॉश निवासी संकुलातून पाण्याची मागणी आली की गुलाबी गांधी हटकून वाढतो.

थोडक्यात.. हा पाण्याचा व्यापार थांबवण्यासाठी काही करता आले तर पाहावे, आयुक्त महोदय! शिवाय आता किती प्रमाणात इमारत बांधकामांना परवानगी देता येऊ शकेल याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या ठाणे शहरात अशा शेकड्यांनी इमारती आहेत की, त्या गेली अनेक वर्षे टँकरवरच अवलंबून आहेत. आपल्या जलाभियंता विभागाला याची माहिती नक्कीच असेल. दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी मात्र, प्रमुख जल अभियंत्यांसह विभागातील अभियंत्यांना मुंबई महाप्सलिकेच्या दौऱ्यावर किमान 15 दिवस तर पाठवण्यात यावे, अशी माझी विनंती आहे. ठाणे शहरातील जनता नको इतकी सहनशील असल्यानेच नोकरशहा आणि नेते या शहराला त्रास देत आहेत की काय असे वाटू लागले आहे. ही जनभावना बळावू नये, याची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागणार. नाही का?

Continue reading

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....
Skip to content