डीआरडीओ आणि भारतीय नौदलाची ओदिशाच्या किनारपट्टीवरून व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी केली.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने, VLSRSAMच्या एकापाठोपाठ एक यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. सलग दुसरी चाचणी काल, 13 सप्टेंबरला ओदिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर दिसू न येणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर हल्ला केला आणि लक्ष्य निष्प्रभ करण्याची अचूकता आणि क्षमतेचे दर्शन घडवले.
त्याआधी 12 सप्टेंबरला पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हाही VLSRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद यशस्वीपणे पूर्ण केला. सलग घेण्यात आलेल्या या चाचण्या केवळ शस्त्रप्रणालीची विश्वासार्हता दर्शवत नाहीत तर प्रणालीतील विविध घटकांमध्ये अलीकडील काळात करण्यात आलेल्या सुधारणादेखील प्रमाणित करतात.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि सर्व संबंधित चमूंचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी चालना मिळेल, असे ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनीही VLSRSAM प्रणालीच्या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या चमूचे अभिनंदन केले.